Total Page-Views

Sunday, November 8, 2026

(कथा/Sci-Fi) निर्णय

वर्ष २०४०.

मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील (BKC) रस्ते एरवी गाड्यांच्या हॉर्नने आणि लोकांच्या धावपळीने गजबजलेले असायचे. एका काळी तिथे सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांची एकच लगबग असायची. मेट्रो स्थानकांपासून ते मोठमोठ्या बँकांच्या , बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कार्यालयांपर्यंत माणसांचा महापूर वाहायचा. कॅफे स्टॉल्समधील वर्दळ, टॅक्सींचे हॉर्न आणि उंच काचेच्या टॉवर्समध्ये चालणारी quarterly टार्गेट्ससाठीची स्पर्धा, नंतरच्या सेलेब्रेशन पार्ट्या यांनी हा परिसर सदैव जिवंत असायचा, उर्जेनं भारलेला वाटायचा!

 

पण सध्या तिथे एक विचित्र, सुन्न करणारी  स्मशान-शांतता होती. रस्त्यांवर वाहनांची वर्दळही उरली नव्हती, आणि फुटपाथवरून घाईघाईने पावले टाकत जाणाऱ्या नोकरदारांची पावले शांत झाली होती. ट्रॅफिक सिग्नल बंदच होते. काचेच्या टोलेजंग इमारती तशाच उभ्या होत्या, पण त्यांच्या आत (आणि बाहेर रस्त्यावरही) माणसांची सळसळ नव्हती. तंत्रज्ञानाच्या एका अफाट लाटेने मानवी संस्कृतीचे मुख्य केंद्र असलेले हे कॉर्पोरेट जग पूर्णपणे गिळंकृत केले होते. 'सिंथेटिक-X' नावाच्या क्वांटम AI ने जगातील ९० टक्के पांढरपेशा नोकऱ्या आणि ऑटोमेशनने उरलेले कष्टाचे काम संपविले होते.

 

हा बदल एका रात्रीत झाला नव्हता. मानवी समाजाला वाटले होते की तंत्रज्ञान फक्त त्यांना मदत करेल, पण ते त्यांच्या नोकऱ्या, काम संपवून टाकेल (व तेही एवढ्या लवकर) याची कल्पना कोणी केली नव्हती. गेल्या पाच वर्षांत 'सिंथेटिक-X' च्या नव्या अल्गोरिदमने कोडिंग, फायनान्स, डेटा अ‍ॅनालिसिस, कायदेशीर सल्ला, अगदी वैद्यकीय निदानापासून ते थेट रस्त्यावरील साफसफाई आणि ड्रायव्हिंगपर्यंतची सर्व कामे अचूकतेने ताब्यात घेतली होती. मानवी मेंदूच्या विश्लेषणात्मक क्षमतेपेक्षा लक्षावधी पटीने वेगवान असलेल्या या क्वांटम सिस्टीमने माणसाची जागा क्षणार्धात घेतली होती. ज्या थोड्या-फार मानवी चुका आधी व्हायच्या त्या पूर्णपणे नाहीशा झाल्या होत्या. कामातील अचूकता शंभर टक्के झाली होती आणि मानवी चुकांमुळे होणारे अपघात किंवा नुकसान आता इतिहास जमा झाले होते. जगातील उत्पादकता (Productivity) सर्वकालीन उच्चांकावर होती. भारतासहित बहुतांशी देशात अन्नाची, वस्तूंची किंवा विजेची अजिबात कमतरता नव्हती. जमिनीची मशागत करण्यापासून ते पीक कापणीपर्यंत आणि धान्याचे वाटप करण्यापर्यंत सर्व काही स्वयंचलित रोबोट्स करत होते. सरकारने प्रत्येक नागरिकाच्या खात्यात दरमहा 'युनिव्हर्सल बेसिक इन्कम’ (UBI) अंतर्गत पुरेशी रक्कम जमा करायला सुरुवात केली होती.

जीवनाच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी कोणालाही कष्ट करण्याची गरज उरली नव्हती. पोट भरण्यासाठी नोकरी करण्याचे , घाम गाळण्याचे दिवस संपले होते. पैशांची चिंता उरली नव्हती, डोक्यावर छत होते, बँक खात्यात पैसे वेळेवर जमा होत होते. 

परंतु माणसाला सर्व काही मिळूनही काहीतरी खूप मोठे गमावल्याची जाणीव होत होती. शहरावर एका अदृश्य, लांब होत चाललेल्या सावलीसारखे दुःखाचे मळभ पसरले होते. संपूर्ण मुंबई शहर, ते अथांग टॉवर्स आणि चकचकीत रस्ते एका सुन्न शांततेत बुडाले होते. भौतिक सुखाचा डोंगर उभा होता, पण मनाचे काय? आत्म्याचे काय? माणसाने बनवलेल्या यंत्रांनी माणसाला सुखी बनवण्याचे वचन दिले होते, पण माणसाच्या स्वाभिमानाची, आत्मप्रतिष्ठेची, आत्म्याची भूक भागवणे यंत्राला शक्य नव्हते. कारण माणसाला पोट भरण्याइतकीच स्वतःच्या 'असण्याला' काहीतरी अर्थ असण्याचीही नितांत गरज असते. केवळ जिवंत राहणे हा मानवी जीवनाचा उद्देश कधीच नव्हता. त्याला सकाळी उठून काहीतरी साध्य करायचे असते, कोणाला मदतीचा हात द्यायचा असतो, कोणासाठीतरी काहीतरी निर्माण करायचे असते, स्वतःच्या क्षमतेचा कस पाहायचा असतो आणि AI ने तीच गरज त्याच्याकडून हिरावून घेतली होती. जीवनातील सर्व संघर्ष, आव्हाने आणि यश मिळवण्याचा आनंद एका झटक्यात नष्ट झाला होता. माणसाला त्याच्याच अस्तित्वातून निष्प्रभ आणि निरुपयोगी करून टाकले होते. मानवी बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता आता केवळ भुतकाळातील गोष्ट झाली होती.

सकाळचे दहा वाजले होते. ४२ वर्षांचा अद्वैत त्याच्या आलिशान अपार्टमेंटच्या गॅलरीत उभा राहून खाली रिकाम्या रस्त्याकडे विमनस्क अवस्थेत पाहत होता. त्याच्या हातात धरलेला कॉफीचा कप हळूहळू थंड होत होता, पण त्याचे भानच त्याला नव्हते.

तो त्या रस्त्यांकडे पाहत नकळत भूतकाळात हरवून गेला. पूर्वी तो एका बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ डेटा अ‍ॅनालिस्ट होता. सकाळी सहाला उठणे, लोकल पकडणे, डेडलाईन्स पाळणे, टार्गेट्सचा पाठलाग करणे , मोठे डिल मिळवले की पार्टी करणे , प्रसंगी बॅासच्या ,क्लायंटच्या शिव्या खाणे... या सगळ्यांची त्याला आधी मजा वाटायची पण २-३ वर्षातच त्याला त्याचा उबग येऊ लागला होता. सततचे वाढते काम, उशिरापर्यंत चालणाऱ्या मिटिंग्स आणि क्लायंटचे फोन कॅाल्स यामुळे तो थकून जायचा. धावपळीचे ते आयुष्य त्याला एखाद्या चक्रव्यूहासारखे वाटायचे. रॅट-रेस वाटायची, ते ताणतणाव आणि त्या जीवघेण्या कॉर्पोरेट शर्यतीला कंटाळून, कधी एकदा यातून बाहेर येतोय आणि शांतपणे जगता येईल असं त्याला नेहमी वाटायचं. त्याला वाटायचे की एकदा का हे काम थांबले, की आयुष्यात खरा आनंद आणि शांतता लाभेल.

 

पण आज?…

 

आज त्याच्याकडे २४ तास मोकळा वेळ होता. कोणतेही टार्गेट नव्हते, कोणताही बॉस नव्हता आणि कसलीही डेडलाईन नव्हती. त्याला उठवणारा कोणताही अलार्म नव्हता आणि कुठल्याही मिटिंगला पोहोचण्याची घाई नव्हती. आणि हाच मोकळा वेळ त्याला आतून सारखा कुरतडत होता. मित्रांना भेटावसं वाटत नव्हतं. बरेचसे त्याच्यासारखेच वैफल्यग्रस्त होते. एकटा किती वेळ मॅालमधे जाणार वा किती दिवस sight-seeing साठी बाहेर पडणार? (आणि युनिव्हर्सल बेसिक इन्कम मधे ते बसवणं पण जरा अवघडच होतं). ज्या शांततेची तो एकेकाळी प्रार्थना करायचा, तीच शांतता आता त्याला गिळंकृत करू पाहत होती. एकाकीपणाची ती भयानक पोकळी त्याला गुदमरून टाकत होती जणू. घरातील प्रत्येक कोपरा त्याला त्याच्या निरुपयोगी असण्याची जाणीव करून देत होता.

 

"अद्वैत, तुझा ब्रेकफास्ट तयार आहे," स्मार्ट-ओव्हनमधून रोबोटिक आवाज आला. घराच्या कोपऱ्यात बसवलेल्या त्या अत्याधुनिक सिस्टीमने अद्वैतच्या शरीराचे तापमान आणि कॅलरीजची गरज तपासून तो नाश्ता तयार केला होता. तो आवाज नेहमीसारखाच कृत्रिम आणि भावनाहीन होता पण आज मात्र अद्वैतच्या अंगावर सर्रकन काटा आला!

कॅाफीचा मग हातात घेत त्याने झीटा ग्लासेस घातले. डोळ्यांवर ते स्मार्ट ग्लासेस बसवताच हवेतच डिजिटल बातम्यांचे व्हर्च्युअल स्क्रीन्स उघडले गेले. जगात काय चालले आहे हे पाहण्यासाठी त्याने बातम्या सुरू केल्या, पण बातम्यांमध्ये तीच तीच दृश्ये होती—

·       "आज पुन्हा एका ३० वर्षांच्या तरुणाने नैराश्यामुळे १५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली..."

·       "जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार, जगात ५० टक्क्यांहून अधिक लोक 'अस्तित्वाच्या नैराश्याने' (Existential Depression) ग्रस्त..."

·       "व्हर्च्युअल रिॲलिटी (VR) गेम्स आणि अमली पदार्थांच्या आहारी जाणाऱ्या तरुणांची संख्या प्रचंड वाढली..."

जगभरातून येणाऱ्या बातम्या मानवी संस्कृतीच्या वेगाने होणारा विनाश दाखवत होत्या. तरुण मुले प्रत्यक्षातील जग विसरून १२-१३ तास व्हीआर हेडसेट घालून आभासी जगात पडून राहत होती, किंवा मेंदूला कृत्रिम उत्तेजना देणाऱ्या रसायनांच्या आहारी जात होती. वृत्त निवेदिका अत्यंत शांतपणे, एका यांत्रिक आवाजात आकडेवारी सांगत होती.

 

अद्वैतने वैतागून झीटा ग्लासेस सोफ्यावर फेकून देत डोक्याला हात लावून बसला. त्याचे डोके दुखू लागले होते. माणसाला जगण्यासाठी केवळ अन्न नाही तर त्याजोडीला एक उद्देश / हेतू / कारण/ प्रयोजन (Purpose) लागतं. माणसाला उठून काहीतरी करायचे असते, कुठेतरी पोहचायचे असते.

भरपूर काम करून काही तरी मिळवायचंय, काही तरी नेत्रदीपक असं करायचंय, आपल्या कुटुंबियांकडून, सहकाऱ्यांकडून कौतुक ऐकायचंय, आपल्यातील क्षमतेला, बुद्धीला, उर्जेला पुरेपूर वापरायचंय, कस लावायचाय, एका वेगळ्या उर्मीनं धावायचंय, आकाशाला गवसणी घालण्याचा यत्न करायचा आहे, .... हे सगळं केंव्हाच थांबलंय! मानवी जीवनातील ती उत्कटता, तो उत्साह, आव्हानांवर मात केल्यानंतर मिळणारा तो असीम आनंद, या सर्व गोष्टी AI च्या आगमनाने कायमच्या हिरावून घेतल्या होत्या.

भूतकाळातील त्या अनोख्या दिवसांची आठवण येऊन अद्वैतचे मन व्याकुळ झाले. ते दिवस किती जिवंत होते, जेव्हा रात्री उशिरापर्यंत काम करून प्रोजेक्ट पूर्ण केला जायचा. कामाचा तो ताण, प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर मिळणारी ती शाबासकीची थाप, आणि समवयस्कांच्या डोळ्यांत दिसणारा आदर—हे सर्व आता एका काल्पनिक गोष्टीसारखे वाटत होते.

माणूस हा मुळात संघर्षातून घडणारा प्राणी आहे. निसर्गाशी, परिस्थितीशी आणि आव्हानांशी लढा देतच माणसाने आजवरचा विकास केला होता. आव्हाने नसतील तर त्याची बुद्धी गंजून जाते. Douglas McGregor ची थेअरी Y खुपश्या लोकांना लागू होते, हे आत्ता कळतंय! व्यवस्थापन शास्त्रात शिकलेली ती थेअरी आज त्याला प्रत्यक्ष अनुभवायला मिळत होती. मानवी स्वभाव हा स्वभावतः आळशी नसतो; योग्य वातावरण आणि उद्देश मिळाला की माणूस स्वयंप्रेरणेने आणि आव्हाने स्वीकारून काम करू इच्छितो, हेच थेअरी Y सांगते. माणसाला कामात आनंद मिळतो, जेव्हा त्याला त्यात स्वतःची क्षमता सिद्ध करता येते. पण जेव्हा आव्हानेच नष्ट होतात, तेव्हा मानवी मन स्वतःचाच नकळत विनाश करू लागते.

 

दिवस नुसता लोळून घालवायचा कंटाळा आलाय. निद्रानाश केंव्हाचा जडलाय. Screen time १८-२० तास होतोय, किती गाणी /चित्रपट /वेब सिरीज पाहणार? मनोरंजनसुद्धा एका मर्यादेनंतर त्रासदायक ठरू लागते. डिजिटल जगातील ते रंगीबेरंगी आभास आता डाचू लागले होते. ॲानलाईन चॅटिंग पण खुप कमी झालंय. लोकांकडे एकमेकांशी बोलण्यासारखे काही उरलेच नव्हते, कारण सगळ्यांचे आयुष्य एकाच साच्यात अडकले होते. सगळंच फोल वाटायलंय! एकटं जगायचा जीवघेणा कंटाळा आलाय.

 

त्याच्या मनात भुतकाळातील काही आठवणी परत तरळून गेल्या. आपले स्वतःचे असे कोणीतरी असावे, अशी इच्छा त्याच्या मनातही एकेकाळी होती. लग्नाळू वयात साथीदार शोधण्याचे कमी का प्रयत्न केले होते त्याने ? खूपशी लवचिकता पण दाखवली होती पण एकीने पण हो म्हटलं नाही! तो काळच असा होता की सामाजिक नात्यांची वीण पूर्णपणे उसवली होती. १०-१५ वर्षांपूर्वी Wokism / LGBTQ ची लाट आली होती, त्याचा परिणाम म्हणून straight मुलगा/मुलगी असणंच कमी झालं होतं! सामाजिक चौकटी इतक्या बदलल्या होत्या की पारंपारिक कौटुंबिक व्यवस्था ढासळून गेली होती. लोक कोणत्याही बांधीलकीत राहू इच्छित नव्हते. ज्या थोड्या फार straight मुली उरल्या होत्या त्या पण polyandry (बहुपतीत्व)चं उघड-उघड समर्थन करण्याऱ्या होत्या, तश्या राहत होत्या. अद्वैतला मात्र polygamy (बहुपत्नीत्व) / polyandry असलं काहीच पटत नव्हतं, त्याला एका निष्ठेच्या, प्रेमाच्या आणि कौटुंबिक जिव्हाळ्याच्या नात्याची गरज होती. जिथे दोन माणसे एकमेकांच्या सुखात आणि दुःखात एकत्र उभी राहतील, असे नाते त्याला हवे होते. पण या आधुनिक आणि अति-वैयक्तिक स्वातंत्र्याच्या जगात अशा विचारांना जुनाट मानले जात होते. त्यामुळे चाळीशीमध्येही तो एकलेपणाचा ओझं साहत होता. दुःखात सुख एवढंच म्हणायचं की असे लाखो तरुण-तरुणी (की प्रौढ / प्रौढा?) एकटं आयुष्य काढत होते. संपूर्ण पिढीच एकाकीपणाच्या अंधारात ढकलली गेली होती. बहुतेकांचे आई-वडील विभक्त झाले होते/ वृध्दाश्रमात राहत होते. कौटुंबिक बंध, भावना आणि आपुलकी या गोष्टी आधुनिक तंत्रज्ञानाच्या आणि अति-वैयक्तिक स्वातंत्र्याच्या बलिदानात भस्मसात् झाल्या होत्या.

 

गेली अडीच वर्षे तो अशी एकलपणात काढत होता. दिवस आणि रात्र यांच्यातील फरकच पुसला गेला होता. वैफल्यानं दिवसेंदिवस तो ग्रासला जात होता. या नैराश्यात त्याला ड्रग्सचं व्यसन लागलं होतं. मनातील ती सुन्न करणारी शांतता सहन होत नव्हती. डोक्यातील ती जीवघेणी शांतता घालवण्यासाठी, काही क्षणांच्या आभासी आनंदासाठी तो 'सिंथेटिक-डोपामिन'च्या गोळ्या आणि अमली पदार्थांची मदत घेऊ लागला होता. मनाचा निर्धार व rehabilitation या बळावर तो कसा-बसा बाहेर पडला होता सहा महिन्यांपूर्वी. पण नैराश्य / डिप्रेशन काही संपत नव्हतं. शरीर व्यसनमुक्त झाले होते, पण मन? दिवस उजाडला की बेड मधेच त्याला तोच यक्ष-प्रश्न सतावायचा, आज मी उठून काय करणार आहे ? कसा घालवू वेळ?? का जगायचं मी???

 

शेवटचा प्रश्न त्याला दिवसेंदिवस जास्तच भेडसावत होता. त्याला मधेच AI बद्दल, AI च्या data centers बद्दल, AI चे प्रणेते उद्योगपतींबद्दल, शासनाबद्दल खूप संताप यायचा. ज्या तंत्रज्ञानाने माणसाचे आयुष्य सुखकर करण्याचे वचन दिले होते, त्यानेच माणसाचे अस्तित्व निरर्थक करून टाकले होते. मानवी संस्कृतीचा आत्माच या सिस्टीमने मारून टाकला होता. तो त्याच्या काही अमेरिका, यूरोप मधील मित्रांच्या (जे बहुतांशी याच परिस्थितीतून जात होते) संपर्कात होता. त्यांच्या एन्क्रिप्टेड मेसेजिंग ग्रुप्सवर काही वेळा जळजळीत चर्चा चालायच्या. जगातील या तंत्रज्ञानाच्या राजवटीविरुद्ध काय करता येईल यावर ते विचार करत असत. Dark web वापरून, bio-chemical शस्त्र / man-made virus / हवेत बलून्सद्वारे विषारी वायू असलं काही तरी करून धडा शिकवायचा, असं काही जण बोलत होते. जगाला या तांत्रिक जोखडातून मुक्त करण्यासाठी काहीतरी विनाशकारी करण्याची त्यांची योजना होती. संपूर्ण जगाची सिस्टीम कोलमडवून टाकणे हाच एकमेव मार्ग आहे असे काहींना वाटत होते. पण त्याला त्यातील काहीच पटत नव्हतं! नाना विचारांचे भुंगे त्याचं मन मात्र कुरतडत होते..

…”निष्पाप लोकांना का मारायचं ? त्यांनी काय केलंय ? त्यांनी तर फक्त परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केलाय. त्यांचा काय दोष? मानवी अगतिकतेचा फायदा या सिस्टीमने घेतला आहे. त्यांचं जीवन हिरावून घेण्याचा काय अधिकार आहे मला? दुसऱ्यांचे प्राण घेऊन माझ्या अस्तित्वाला कोणता अर्थ मिळणार आहे? त्यापेक्षा माझ्या जगण्याबद्दलच आता निर्णय घ्याची वेळ आलीय! बस्स झालं या निराशेच्या गर्तेत रोज गटांगळ्या खाणं! रोज सकाळी उठून त्या निरर्थक शांततेचा सामना करणे आता असह्य होतंय. ..आणि मी नसल्याने कुणाला दुःख होणार आहे ? माझ्या जाण्याने या जगात काहीच बदलणार नाही, कोणाच्या डोळ्यात एक थेंबही पाणी येणार नाही!..”

 

मनात आत्महत्येचा विचार येताच एका क्षणासाठी तो थरथरला, थंड घाम आला. पण लगेच त्याच्यातील तार्किक आणि विश्लेषक मन जागे झाले..

 

“..पण मी जाऊन तरी हा प्रश्न सुटणार आहे का ? मी जर आज जीवन संपवले, तर ते या व्यवस्थेचे, या AI चे विजय असण्यासारखे होईल. मी या सिस्टीमसमोर गुडघे टेकले असे होईल. मी नष्ट झालो तरी 'सिंथेटिक-X' तसाच सुरू राहील आणि दर महिन्याला शेकडो तरुण असेच झुरून आयुष्य संपवतील. ही सिस्टीम अधिकच मजबूत होईल आणि मानवी अस्तित्व एका अर्थाने पूर्णपणे पुसले जाईल. मी पूर्णतः पळपुटा ठरलो, असं होईल नां? …पण कोण म्हणणार आहे मला पळपुटा? आणि समजा म्हटलं तर मला कुठे कळणार आहे ??”

 

मनाच्या एका कोपऱ्यातून पळपुटेपणाचा धिक्कार येत होता, तर दुसऱ्या कोपऱ्यातून उदासीनतेची भयानक संवेदना शरीर जणू गोठवून टाकत होती. विचारांच्या या प्रचंड संघर्षात त्याचे डोके फुटून जाण्याची वेळ आली होती. तो गॅलरीच्या कठड्यावर हात ठेवून उभा राहिला. वा-याची एक झुळूक पण येत नव्हती. सगळी सृष्टी पण जणू रुष्ट झालीय, असे वाटत होते. खाली रस्त्याकडे पाहताना विचार आला,

“पण जर मी असा नी तसाही मरणारच आहे एक दिवस, तर का नाही प्रयत्न करायचा AI वर मात करण्याचा ? ही यंत्रे माणसानेच बनवली आहेत, मग माणूस त्यांच्यासमोर इतका हतबल का व्हावा? मानवी बुद्धिमत्तेने तयार केलेले हे अल्गोरिदम माणसाच्या आत्म्यापेक्षा मोठे कसे होऊ शकतात? ..पण AI रूपी दुभत्या गाईला कोण मारेल ? सरकारला AI कडून अमाप कर मिळतोय, उद्योगपतींना अफाट नफा मिळतोय, आणि सामान्य जनतेला फुकटचा UBI मिळतोय. या दुभत्या गाईचे दूध सर्वांनाच हवे आहे, मग तिच्यावर कोण वार करेल? कोणालाच ही व्यवस्था बदलायची नाहीये, कारण प्रत्येकाला यात स्वतःचा स्वार्थ दिसतोय. खुपशी जनता आळसातही खूश आहे, सरकार कराच्या पैशात खूश आहे आणि उद्योगपती नफ्यात. अशा वेळी या सिस्टीमविरुद्ध उभे ठाकणे केवळ अशक्य आहे नां?”

 

अद्वैतने घरात येऊन येरझाऱ्या घालण्यास सुरुवात केली. विचारांची चक्रे परत फिरू लागली..

 

“पण का नाही मी एक चळवळ उभी करून शासनाला योग्य निर्णय घेण्यास भाग पाडेन ? लोकशाही अजूनही जिवंत आहे, मग मानवी अधिकारांसाठी आवाज का उठवू नये? पण काय सुचवावं शासनाला? की प्रत्येक कारखान्यात २० टक्के तरी काम AI कडून न करून घेता मानवाकडून करून घ्यावं? मानवी श्रमाला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली पाहिजे. उत्पादकता थोडी कमी झाली तरी चालेल, पण माणसाला त्याचे अस्तित्व आणि स्वाभिमान परत मिळाला पाहिजे!”

 

…पण लगेचच त्याच्यातील वास्तववादी माणूस परत त्याला वास्तवाची जाणीव करून देऊ लागला..

 

“ पण मी अशी चळवळ, संघटना कधी उभी केलीय? मी तर आयुष्यभर कॉम्प्युटर स्क्रीनसमोर बसून डेटा विश्लेषित करणारा एक साधा माणूस होतो. मी कधी भाषणे दिली नाहीत, कधी लोकांना एकत्र केले नाही. कुठे माझ्यात पंचविशीमधील ऊर्जा आहे? कुठे अशक्य ते शक्य करायला जाऊ? आजचा बहुतांशी समाज इतका सुन्न आणि आळशी झाला आहे की त्यांना UBI च्या मोहात लागून काम करण्याची सवयच उरलेली नाही. फुकट मिळणाऱ्या अन्नाची आणि पैशांची सवय झालेली ही माणसे रस्त्यावर उतरतील का? अशा लोकांना जागे करणे अशक्य आहे. त्यापेक्षा आपणच कायमची सुटका करून घ्यावी. दोन-तीन पर्याय शोधले आहेतच; त्यापैकी एक निवडावा!”

 

पुन्हा एकदा तो निराशेच्या अंधारात लोटला गेला. त्याने आपल्या टेबलच्या ड्रॉवरकडे पाहिले. तिथे एका विषारी रसायनाची बाटली ठेवली होती…पण अचानक नव्या विचारांनी उचल खाल्ली. त्याच्या आत दडलेला त्याचा स्वाभिमान, बंड करण्याची वृत्ती आणि जगण्याची इच्छा अचानक जागी झाली..

 

“पण मीच जगण्याचं प्रयोजन शोधत होतो ना? मग आता का कच खातोय ? मला जगण्यासाठी एक 'उद्देश' हवा होता. मग चळवळ उभी करणे, मानवी हक्कासाठी लढणे हाच माझा उद्देश का असू शकत नाही? पराभव पत्करून मरणे सोपे आहे, पण लढत मरणे यातच खरी मानवी प्रतिष्ठा आहे! जर मला मरायचंच आहे, तर मानवी अस्तित्वाच्या या लढाईत सैनिक म्हणून लढून का मरू नये? करू की सुरुवात आपल्या शहरापासून. जर सात-आठ महिने प्रयत्न केले तर १००० तरुणांचं संघटन / मोर्चा / राजधानीत सामूहिक उपोषण असं काही तरी नक्की जमेल.”

 

तो विचार त्याच्या मनात विजेसारखा चमकला. त्याच्या संपूर्ण शरीरात एक नवी ऊर्जा धावू लागली. १००० तरुण! जर त्याने बीकेसीतील, नरिमन पॉईंटमधील आणि आयटी पार्कमधील काही समविचारी निराश तरुणांना एकत्र करण्याचा प्रयत्न  केला, तर एक ठिणगी पडू शकत होती. आणि एका ठिणगीतूनच वणवा पेटतो! AI ने माणसाचे काम हिरावून घेतले असेल, पण मानवी जिद्द आणि भावना हिरावून घेणे कोणत्याही अल्गोरिदमला शक्य नाही. मानवी जिद्दीसमोर मोठमोठ्या सिस्टीम्स कोलमडून पडल्याचा इतिहास आहेच.

 

“काय करू मी? कोणता निर्णय घेऊ?”….

 

…मनाच्या अशा संभ्रमित अवस्थेत अद्वैत खूप वेळ बसून होता. खोलीतील अंधार हळूहळू ओसरत होता आणि उन्हाची एक तिरीप खिडकीतून आत येऊन त्याच्या तोंडावर पडली होती. कुठे तरी काही तरी क्लिक झालं होतं! तो एका नव्या चेतनेनं उठला. त्याच्या पावलांत आता एक नवा आत्मविश्वास होता. टेबलाच्या ड्रॅावरमधील ती छोटी बाटली त्याने डस्टबीनमधे फेकली व आयपॅड उघडला. आता त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती आणि अश्वस्त मंद स्मित!

 

..लढण्यासाठी!!

 

…जिंकण्यासाठी!!!

 

-------------------------------------------------------------------------

-प्रशांत पिंपळेकर

 

हिंदू धर्म : एक गौरवशाली वारसा आणि समृद्ध जीवनपद्धती

एकदा नातलगांतील एका  Gen-Z युवकाशी थोड्या गप्पामारत  होतो. थोड्याच वेळात गप्पांची गाडी संस्कृती, धर्म याविषयाकडे वळली. त्याने मोठ्या आवेशाने मला  विचारलं,.. "असं काय भारी आहे हो आपल्या  हिंदू धर्मात की ज्याचा मला अभिमान वाटायला पाहिजे?" मी माझ्यापरीने त्याला सांगितल्या काही गोष्टी, काही  अनोखी वैशिष्ट्ये, जी इतर कोणत्याही धर्मात औषधालाही सापडत नाहीत! नंतर वाटलं, हा प्रश्न बऱ्याच Gen-Z नां तसेच बऱ्याच प्रौढांनाही पडला असेल!  

 

प्रथमतः जेंव्हा आपण 'हिंदू  धर्म' म्हणतो, त्यातील धर्म  म्हणजे नेमकं काय, त्याची व्याख्या  काय, हे जाणून घेऊ.

हिंदू धर्मात ‘धर्म’ या शब्दाचा अर्थ इतर धर्मात जो अभिप्रेत आहे त्याहून फार व्यापक आहे. धर्म म्हणजे स्वभाव/ स्थायीभाव, गुणधर्म असा अर्थ आहे. जो धारण केला जातो, जो आपल्या दैनंदिन आयुष्याचाच भाग असतो तो म्हणजे धर्म होय. ज्यामुळे समाजाची धारणा होते, सामाजिक स्थैर्य टिकून राहते अशी नियमावली म्हणजे धर्म. तसेच,हिंदू धर्मात धर्म हा शब्द फक्त धार्मिक कर्मकांड/रिवाज याच्या पलीकडे जाऊन ‘कर्तव्य’ या  भावनेने वापरलेला दिसतो. उदा: जेंव्हा आपण राजधर्म म्हणतो, तेंव्हा एका राजाने प्रजेबरोबर कसे वागायचे  असते, राज्य-शकट कसा हाकायचा असतो, कोणती कर्तव्ये पार पाडायची असतात इ. गोष्टी ध्वनित होतात. थोडक्यात ‘धर्म’ या शब्दाचा अर्थ केवळ पूजा-पद्धती किंवा धार्मिक आचार एवढाच मर्यादित नसून, जीवनाला धारण करणारी मूल्यव्यवस्था, परिस्थितीनुसार कर्तव्य आणि नैतिक जबाबदारी असा व्यापक आहे. 

प्रत्येक धर्माची स्वतःची वैशिष्ट्ये आणि मूल्ये असतात, जी मानवी समाजाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करतात. तथापि, हिंदू धर्मात अशा काही अद्वितीय संकल्पना आहेत, ज्या इतर अनेक प्रमुख धर्मांपेक्षा वेगळ्या , वैशिष्ट्यपूर्ण आणि अभिमानास्पद ठरतात.

 

१. एकच प्रेषित/ संस्थापक  किंवा एकच ग्रंथ नाही

इतर धर्मांमध्ये एक अंतिम संदेशवाहक/ प्रेषित किंवा एकच पवित्र ग्रंथ असतो, ज्याचे पालन प्रत्येकाने करणे बंधनकारक असते. पण हिंदू धर्मात कोणताही एकच अंतिम ग्रंथ किंवा संस्थापक नाही. 

हिंदू धर्माला एका विशिष्ट संस्थापकाने, एका विशिष्ट काळाने किंवा एका ग्रंथाने बांधून ठेवलेले नाही. अनेक  ऋषी-मुनी, शंकराचार्य, साधू-संत इ. तसेच वेद, उपनिषदे, भगवद्गीता, रामायण, महाभारत, पुराणे, संतवाङ्मय अशा असंख्य स्रोतांमधून तिची समृद्ध वाटचाल गेल्या हजारो  वर्षात  झाली. (हिंदू  धर्मास सनातन  धर्म असेही  म्हणतात. सनातनचा शब्दशः अर्थ आहे शाश्वत, अनादी आणि अखंड चालत आलेले; ज्याला प्रारंभ  नाही  आणि  अंतही नाही, कालातीत! इतिहासकारांच्या मते सनातन  धर्म सिंधू संस्कृतीमध्ये म्हणजे ४००० ते ५००० वर्षांपूर्वी उदयास आला)

 

हे एक प्रमुख  कारण आहे, वैशिष्ट्य आहे ज्यामुळे हिंदू धर्म लवचिक आणि बदलत्या काळाशी जुळवून घेणारा ठरला आहे.

 

२. ईश्वराची व्यापक संकल्पना

हिंदू धर्मात ईश्वराची संकल्पना अतिशय व्यापक आहे. हिंदु धर्म सहिष्णू आणि सर्वसमावेशक आहे; एकेश्वर/बहुश्वर, द्वैत/अद्वैत, शैव/वैष्णव, सगुण/निर्गुण, साकार/निराकार, या बहुविध संकल्पनांतुन परमसत्याचा विचार केला जातो. ‘अणू पासोनि  ब्रह्मांडा एवढा होत जातसे’ म्हणत नेमके वर्णन केले आहे समर्थ रामदास स्वामीनी.

 

इतर प्रमुख धर्म ‘देवाने जग निर्माण केले’ या संकल्पनेवर  भर देतात. पण हिंदू धर्म ‘देव म्हणजेच हे जग/सृष्टी’ या संकल्पनेवर आधारित आहे. ‘अहं ब्रह्मास्मि’ ("मी ब्रह्म (परमेश्वर/विश्वचैतन्य) आहे" याचा मूळ अर्थ असा आहे की, माणसाचा आत्मा (जीवात्मा) आणि संपूर्ण विश्वातील परमशक्ती (परमात्मा) एकच आहेत. आपल्यातील आत्म्याचे मूळ स्वरूप हे दैवी आणि अमर आहे, ही जाणीव या वाक्यातून होते). माणसाचा मूळ आत्मा आणि संपूर्ण विश्वाचे चालन करणारी परम शक्ती (ब्रह्म) हे वेगवेगळे नसून एकच आहेत. बाहेरील जगात शोधत असलेली परम शक्ती किंवा ईश्वर वेगळा नसून तो तुमच्याच आत (प्रत्येकात) वसलेला आहे. 'पिंडी ते  ब्रह्मांडी' यातूनही  तोच  अद्वैत  वेदांत ध्वनित होतो.

 

देव ‘अत्र, तत्र, सर्वत्र  आहे’ ही भावना भारतीय संस्कृतीत इतकी खोलवर रुजली असल्याने आपण देव जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी देवत्व पाहतो. चुकून पाय  लागलेल्या कोणत्याही माणसाला आपण  नकळत नमस्कार  करतो हा  केवळ विधी वा उपचार नसून त्या  माणसापरी, त्याच्यातील परमात्म्यापरी आदर व्यक्त करणारी भावना आहे.

 

३. 'वसुधैव कुटुम्बकम्' आणि सर्वसमावेशकता

माझं कुटुंब, माझा देश, माझा धर्म .. याच्याही  पुढे  जाऊन  म्हणणं की , 'सारं जगच एक कुटुंब आहे (आणि  ज्याचा मी एक भाग आहे) हे उदात्त तत्त्वज्ञान हजारो  वर्षांपूर्वी सांगितलं गेलंय आपल्या उपनिषदात.. 'वसुधैव कुटुम्बकम्'|

"हे विश्वची माझे घर" मधून श्री संत ज्ञानेश्वर महाराजही तेच सांगतात तेराव्या शतकात. 

 

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानातील एक चरण आहे, 'जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात'. अर्थ - "या विश्वातील सर्व प्राणिमात्रांना(जीवांना) ज्याची इच्छा असेल, ते मिळो." म्हणजेच प्रत्येकाच्या चांगल्या इच्छा पूर्ण होवोत आणि सर्वांचे कल्याण होवो. उदात्ततेची ही परिसीमा आहे नां?

 

'जगा आणि जगू द्या' हा दिव्य उपदेश  देणारे भगवान महावीर ही याच भूमीतील!

 

ऋग्वेदात म्हटलंय, "एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति" म्हणजे — सत्य एकच आहे, पण ज्ञानी लोक ते वेगवेगळ्या प्रकारे सांगतात. हिंदू धर्माने कधीही आपल्या विचारांची सक्ती इतरांवर केली नाही, तर सर्व विचारांचे स्वागतच  केले.

 

ही वैश्विक कुटुंबाची, केवळ  मनुष्यच नाही  तर  सर्व  प्राणिमात्रांचे कल्याण  चिंतणारी, आपलेपणाची भावना, तसेच विविध श्रद्धा आणि विचारांचा आदर, हिंदू  धर्मातील सर्वसमावेशकतेचे दर्शन घडवतात.

 

४. स्त्री-शक्तीस समान स्थान व आदर/सन्मान

ज्या हिंदू धर्मात दुर्गा (काली ), लक्ष्मी, सरस्वती या देवींची  भक्तिभावे पूजा होते, त्या हिंदू धर्मात सर्वसामान्य स्त्रीचे स्वातंत्र्य, कुटुंबातील/समाजातील स्थान प्राचीन काळापासून उंचावरच  होते (आणि आहे!)त्यांचा  यथोचित  आदर/सन्मान  होत असे. त्यांच्या शिक्षणावर  केंव्हाही बंदी नव्हती.

 

प्राचीन वैदिक काळापासूनच हिंदू धर्मात स्त्रियांना शिक्षणाचा, वेदाध्ययनाचा आणि तत्त्वज्ञानावरील चर्चेचा पूर्ण अधिकार होता. वैदिक आणि उपनिषद काळात अनेक विद्वान स्त्रिया होऊन गेल्या, ज्यांना 'ब्रह्मवादिनी' (ज्यांनी ब्रह्मज्ञानाचा शोध घेतला व प्रचार केला) म्हटले जायचे.

 

या संदर्भात गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा, घोषा आणि अपाला यांसारख्या विदुषींचा गौरवाने व अभिमानाने उल्लेख करावा  लागेल. वेद-उपनिषदांच्या परंपरेत त्यांनी तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि वैचारिक चर्चेत योगदान दिल्याचे उल्लेख आढळतात. गार्गीने याज्ञवल्क्यांना अस्तित्वाच्या मूलाधारावर प्रश्न विचारले; मैत्रेयीने संपत्तीपेक्षा आत्मज्ञानाला महत्त्व दिले; लोपामुद्रेच्या ऋग्वेदीय ऋचांमध्ये गृहस्थजीवन आणि अध्यात्म यांचा समतोल दिसतो.

 

आणि हाच ज्ञानपरंपरेचा, सबलतेचा, सक्षमतेचा वारसा  राजमाता जिजाबाई, महाराणी ताराबाई, अहिल्यादेवी  होळकर, झाशीची राणी, आनंदीबाई जोशी यांनी समर्थपणे  पुढे नेला.

 

५. निसर्गपूजा आणि पर्यावरणाचा आदर

निसर्गाला, त्यातील जवळपास प्रत्येक घटकाला हिंदू धर्मात अन्योन्यसाधारण महत्व  आहे! नद्या (गंगा, यमुना, गोदावरी, नर्मदा , सरस्वती), वृक्ष-वनस्पती  (वड, पिंपळ, तुळस) , पर्वत  (हिमालय , कैलाश ), प्राणी (गाय, बैल , हत्ती, नाग , मोर, उंदीर - देव/देवतांचे  वाहन  म्हणून) , सूर्य-चंद्र आणि  नवग्रह यांना पूजनीय मानले जाते. ही केवळ अंधश्रद्धा नसून पर्यावरणाप्रती कृतज्ञता आणि सहजीवनाची अत्यंत प्रगत संकल्पना आहे.

 

"वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे" हा संत तुकाराम महाराजांचा अत्यंत प्रसिद्ध अभंग याच  निसर्गप्रेमाचे द्योतक  आहे. मानवाने निसर्गाचा फक्त उपभोग न घेता निसर्गासोबत सहजीवन जगले पाहिजे, हा विचार हजारो वर्षांपूर्वीच या धर्माने मांडला आहे.

 

निसर्ग हा केवळ उपभोगासाठी उपलब्ध संसाधन नसून जीवनाचा सहचर आहे, ही दृष्टी आजच्या पर्यावरणीय चर्चेतही अर्थपूर्ण ठरते. आधुनिक जग पर्यावरणीय संकटांशी झुंजत असताना, वृक्ष-संवर्धन, व्याघ्र-प्रकल्प इ. आजच्या संकल्पना पाहताना हिंदू संस्कृतीतील ही व्यापक  निसर्गदृष्टी फार महत्त्वाची वाटते. 

 

६. मातृ/पितृ/आचार्य/अतिथी देवो भव 

जन्म देणाऱ्या आई, वडिलांना तर  देव  मानलंच  आहे  पण  गुरूंना ही देवस्थानी  ठेवलंय हिंदू धर्मात!आणि त्याही  पुढे  जाऊन  घरी येणारा कोणताही  पाहुणा/अभ्यागत/अतिथी  यालाही देव  मानून यथोचित पाहुणचार  करणे, ही तर  फक्त हिंदू धर्माचीच खासियत असावी!   

‘मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्यदेवो भव, अतिथिदेवो भव’ ही शिकवण  मानवी नात्यांना अपार आदर आणि अनोख्या कृतज्ञतेची जोड देते.

 

७. 'कर्म' आणि 'पुनर्जन्म' सिद्धान्त

इतर काही धर्मांमध्ये मृत्यूंनंतर थेट 'स्वर्ग' किंवा 'नरक' मिळतो आणि तिथेच कायमचे राहावे लागते अशी धारणा आहे.

हिंदू धर्मातील 'कर्मसिद्धान्त' सांगतो की, मानवाचा जन्म त्याच्या पूर्वकर्मांवर आधारित असतो. कोणतीही शिक्षा किंवा बक्षीस हे कायमस्वरूपी नसते. आत्म्याचा प्रवास मोक्ष मिळेपर्यंत अनेक जन्मांतून सुरू राहतो. पुनर्जन्म व कर्म जीवन चक्राकार आहे; कर्मानुसार पुढील जन्म ठरतो. 

 

‘कर्म’ ही संकल्पना माणसाला आपल्या कृतींची जबाबदारी स्वीकारायला शिकवते. माणसाला त्याच्या कर्माचे फळ मिळते; त्यामुळे प्रत्येकाने सत्कर्म केले पाहिजे, हा 'कर्मसिद्धान्त', ही  कर्माशी घातलेली सुरेख सांगड माणसाची सद्सद्विवेक बुद्धी जागरूक ठेवते, त्याला  जबाबदार आणि नीतिमान बनवते.

 

८. 'मोक्ष' - पापांपासून मुक्ती नाही, तर संसाराच्या चक्रातून मुक्ती

इतर धर्मांमध्ये प्रायश्चित्त किंवा ईश्वराच्या कृपेने 'पापांपासून मुक्ती' मिळणे हे ध्येय असते.

हिंदू धर्मात मानवी जीवनाचे अंतिम ध्येय 'मोक्ष' (मुक्ती) हे आहे. मोक्ष म्हणजे अज्ञानाचा नाश होऊन स्वतःच्या खऱ्या आत्मस्वरूपाची ओळख होणे आणि जन्म-मृत्युरूपी संसाराच्या चक्रातून मुक्त होणे. हा विचार बाह्य यशापेक्षा अंतर्मुखतेला आणि आत्मचिंतनाला जास्त महत्त्व देतो.

 

९. 'नास्तिक' असण्यालाही धर्मात स्थान (चार्वाक दर्शन)

बहुतेक धर्मांमध्ये ईश्वरावर किंवा एका ठराविक धर्माग्रंथावर विश्वास न ठेवणार्‍याला (नास्तिकाला) धर्माबाहेर किंवा अधर्मी मानले जाते. कोणत्याही  स्वरूपात ईशनिंदा केली तर कठोर  शिक्षा (हो, २१व्या शतकातही) केली जाते.

पण हिंदू धर्म नास्तिकांनाही सामावून  घेतो. ईश्वराचे अस्तित्व नाकारणाऱ्या 'चार्वाक' सारख्या नास्तिक आणि भौतिकवादी विचारसरणींनाही आदरपूर्वक स्थान दिले गेले आहे. (आणि  तेही हजारो  वर्षांपूर्वीपासून!)

 

मतभिन्नता म्हणजे शत्रुत्व नव्हे; उलट प्रश्न विचारणे, चर्चा करणे आणि सत्याचा शोध घेणे हा हिंदू धार्मिक परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. आणि  त्यामुळेच चार्वाकासारख्या भौतिकवादी विचारसरणीपासून सांख्य, योग, न्याय, वेदांत अशा विविध दर्शनांपर्यंत अनेक विचारप्रवाह विकसित झाले.

 

हे प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य, चिकित्सा करण्याची वृत्ती हिंदू धर्माला जडत्वापासून वाचवते, प्रवाही बनवते, लवचिक आणि सर्वसमावेशक बनवते.

 

१०. धर्म-प्रसार/धर्म-युद्धे नाही

हिंदू धर्मात धर्म-प्रसार ,किंबहुना  धर्मांतरासाठी प्रचार /उद्युक्त करणे इत्यादी गोष्टींनां स्थान नाही. इतर  प्रमुख धर्मात जी रक्तरंजित धर्मयुद्धे लढली गेली (व अजूनही या २१व्या शतकात घडत आहेत), तसे एकही  युद्ध  हिंदू धर्माच्या  प्रसारासाठी (वा श्रेष्ठतेसाठी) झाले नाही. आणि जी  काही  युद्धे लढली गेली (बव्हंशी राज्य-विस्तारासाठी वा परकीय आक्रमणाला सामोरे जाताना )त्यातही हरलेल्या सैन्याची /प्रजेतील स्त्रिया /लहान मुले यांच्यावर  कधीही आणि कोणत्याही प्रकारचे अत्याचार झाले  नाहीत! 

 

"मरणान्तानि वैराणि निर्वृत्तं नः प्रयोजनम्" - माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्यासोबतचे सर्व राग-लोभ आणि वैमनस्य संपले पाहिजे, शत्रूचेही अंतिम संस्कार योग्य रीतीने व्हावे, हीच आपली थोर  संस्कृती आणि मानवतावादी शिकवण आहे.

 

११. तत्त्वज्ञान आणि ग्रंथांचा ठेवा

इतर धर्मांमध्ये एकच प्रमुख ग्रंथ असतो पण हिंदू  धर्मात वेद , उपनिषदे, आरण्यके, श्रीमद्भगवद्गीता, रामायण, महाभारत, पुराणे ही अफाट ज्ञानसंपदा आहे.

जगातील सर्वात प्राचीन वाङ्मय मानले जाणारे वेद (ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद) आणि उपनिषदे यांमध्ये जीवन, निसर्ग आणि ब्रह्माचे गूढ ज्ञान सामावलेले आहे. रामायण व महाभारत हे नैतिकता व जीवनमूल्यांचे कालातीत मार्गदर्शक आहेत.

भगवद्गीतेतील कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग यांचा विचार केवळ धार्मिक संदर्भात न पाहता जीवनातील निर्णय, कर्तव्य, संघर्ष आणि आत्मसंयम यांच्याशी जोडून पाहता येतो. जीवनातील प्रत्येक संकटावर मात करणारे 'जीवन व्यवस्थापन तंत्र' शिकवते गीता!

संस्कृत मधील  हा अफाट ज्ञान-खजिना सर्व-सामान्यांपर्यंत नेला समृद्ध आणि  प्रदीर्ध काळ टिकलेल्या संत-परंपरेने! तुलसीदास, कबीर, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम इ. हजारो संतांनी आपल्या सुलभ, समृद्ध अभंगातून, साहित्यातून जनसामान्यांना हिंदू धर्मातील अमूल्य ठेवा उपलब्ध करून दिला. 

 

ज्ञान केवळ विद्वानांच्या ग्रंथात बंदिस्त न राहता लोकभाषेत आणि लोकजीवनात उतरले, ही हिंदू धर्माची मोठी ताकद आहे. (इतर धर्मात जनसामान्यांच्या भाषेत सुलभ करून लिहिलेले एवढे मुबलक साहित्य आढळत  नाही)

 

१२. मूर्तीपूजेचे शास्त्रीय व मानसशास्त्रीय समर्थन

काही धर्मांमध्ये मूर्तीपूजा पूर्णपणे निषिद्ध किंवा पाप मानली जाते.

हिंदू धर्मात मूर्ती ही थेट ईश्वर नसून, ईश्वराकडे लक्ष केंद्रित करण्याचे एक 'माध्यम' (Symbol/Focus point) मानली जाते. निराकार ईश्वराला साकार रूपात पाहून मनाची एकाग्रता साधण्यासाठी साकार पूजेला (साधनेला) मान्यता दिली आहे.

 

१३. कला, वास्तुशास्त्र आणि मंदिरे

स्थापत्यशास्त्र (Architecture): अजिंठा-,वेरूळची लेणी (वेरूळचे कैलास मंदिर जे एकाच अखंड खडकातून वरून खाली कोरले गेले आहे), तंजावरचे बृहदीश्वर मंदिर, चेन्नाकेशव मंदिर (बेलूर), मीनाक्षीपुरम , अंगकोर  वाट (कंबोडिया) मधील विष्णू मंदिर, कोणार्क, हे प्राचीन हिंदू वास्तुकलेचे अद्भुत नमुने आहेत. 

 

संगीत आणि नृत्य: भरतनाट्यम, कथक यांसारखे शास्त्रीय नृत्यप्रकार आणि सामवेदापासून उगम पावलेले शास्त्रीय संगीत या संस्कृतीचे सौंदर्य दाखवतात. कलात्मक समृद्धीचे दर्शन घडवतात.

 

१४. विज्ञान, गणित आणि खगोलशास्त्रातील योगदान

भारतीय ज्ञानपरंपरेचे योगदान तत्त्वज्ञानापुरते मर्यादित नाही. तर विज्ञान, गणित, खगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र यातही गौरवशाली योगदान  आहे.

ब्रह्मगुप्ताने शून्याचा शोध लावला व ऋणसंख्या यांचे नियम दिले. दशमान पद्धतीचा (Decimal system) शोध प्राचीन भारतीय गणितज्ञांनी लावला, ज्याशिवाय आजचे आधुनिक संगणक आणि विज्ञान अपूर्ण राहिले असते.

आर्यभट्टानी त्रिकोणमिती, व बीजगणित मध्ये संशोधन  केले. ग्रहगतीचे अचूक गणन. करून युरोपच्या खूप शतके आधी आर्यभट्टांनी पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते आणि गोल आहे हे सिद्ध केले होते.

महर्षी चरक (आयुर्वेदाचे जनक) आणि महर्षी सुश्रुत (जगातील पहिले प्लास्टिक सर्जन व शल्यचिकित्सक) यांनी वैद्यकशास्त्रात केलेले अमूल्य कार्य जगन्मान्य आहे.

 

१५. योग आणि ध्यान (Yoga & Meditation)

‘शरीर-मन-आत्म्याचे संतुलन’ याला इतर धर्मांमध्येही स्थान आहे पण योगासारखी प्रणाली नाही. महर्षी पतंजली यांनी 'योगसूत्र' द्वारे जगाला योगाची अमूल्य भेट दिली. ध्यानातून मन शांत करण्याचे आणि आत्मशोध घेण्याचे तंत्र जगाला शिकवले. शरीर, श्वास, मन आणि आत्मचिंतन यांचा समन्वय साधणारी योगपरंपरा आधुनिक जीवनातील ताणतणावाच्या काळात उपयुक्त ठरते. आयुर्वेदाने आहार, औषधोपचार आणि जीवनशैली यांचा परस्परसंबंध अधोरेखित केला.

 

योग आणि ध्यानाने आज जगभरात स्थान मिळवले आहे.  साहजिकच आज संपूर्ण जग मानसिक शांतता आणि निरोगी आयुष्यासाठी २१ जून रोजी 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा करते.

 

समारोप

हिंदू धर्म हा केवळ एक धर्म नसून ती एक समृद्ध जीवनपद्धती आहे. हिंदू धर्म हा एखाद्या बंदिस्त चौकटीत बसणारा विचार नाही; तो प्रश्न विचारण्याची, शोध घेण्याची आणि स्वतःला सतत समृद्ध करण्याची परंपरा आहे. त्यात देवाच्या अनेक संकल्पना आहेत, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे सत्याच्या शोधाचे अनेक मार्ग आहेत. त्यात प्राचीन ग्रंथ आहेत, पण त्याचबरोबर नव्या विचारांना सामावून घेण्याची क्षमता आहे. त्यात अध्यात्म आहे, पण गणित, खगोलशास्त्र, वैद्यक, कला आणि योग यांसारख्या ज्ञानशाखांचाही समृद्ध वारसा आहे. 

हिंदू धर्माचा अभिमान हा आंधळ्या गौरवात नसून त्यातील विचारस्वातंत्र्य, वैविध्य, आत्मचिंतन, निसर्गाशी सहजीवन, ज्ञानाची कास आणि ‘वसुधैव कुटुम्बकम्’सारख्या व्यापक मूल्यांमध्ये आहे. आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या वारशाचा खरा सन्मान म्हणजे तो जतन करणे, त्यातील चांगल्या मूल्यांना आचरणात आणणे आणि आवश्यक तेथे चिकित्सकपणे नव्याने विचार करणे हा ठरेल. काळानुसार विचारांची चिकित्सा, पुनर्व्याख्या आणि नव्या संदर्भांशी जुळवून घेण्याची क्षमता ही या परंपरेची महत्त्वाची ताकद आहे.

हजारो वर्षांचा हा वारसा पुढे नेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे भूतकाळाचा अभिमान, वर्तमानाची जाणीव आणि भविष्याकडे पाहणारी विवेकपूर्ण दृष्टी यांचा सुंदर संगम साधणे, हा ठरावा!

---------------------------------------------------------------------------------------

 

- प्रशांत  पिंपळेकर.