आता नेमकं आठवत नाही पण मी पाचवीत किंवा सहावीत असताना वडिलांनी मला एके दिवशी गावातील विजय वाचनालयात नेले. वडिल प्रख्यात वकिल होते. त्यांना गावातील बहुतांश लोक ओळखत असत. वाचनालयातील महाशयांनी (ग्रंथपाल) हसून स्वागत केलं. त्यांचं नाव कळलं, मंडगे. ..धोतर, नेहरू शर्ट, पांढरी टोपी. चेह-यावर सुरकुत्या.
मला तेंव्हा ते वाचनालय फारच मोठं वाटलं होतं. एका विभागात दोन-तीन मोठी आयताकृती टेबलं व त्यावर सगळी, त्या दिवशीची वर्तमानपत्रे; संचार , समाचार , विश्वसमाचार पासून ते केसरी , सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स , विशाल सह्याद्री , मराठवाडा इइ., भोवताली बसायला खुर्च्या. दुसऱ्या विभागात पण अशीच दोन-तीन मोठी टेबलं पण त्यावर सगळी मासिकं/दिवाळी अंक; किर्लोस्कर , स्त्री , माहेर , ललना पासून ते माणूस, मनोहर , जत्रा पर्यंत!! आणि परिघावरील भिंतींना चिकटून पुस्तकांनी खचाखच भरलेली कपाटं!!
सगळंच एकदम भारी वाटलं मला! लगेच दुसऱ्याच दिवसापासून मी एकटा सकाळी आठ-साडेआठला वाचनालयात जायला लागलो. घरापासून पाच मिनिटं चालेल की आलं वाचनालय! वर्तमानपत्रे वाचू लागलो. थोडी भीड चेपली कि २-३ दिवसांनी मासिकांच्या विभागातही जाऊन बसू लागलो. दररोज सकाळी "लायब्रीत(सातवी-आठवीत कळलं की ते लायब्ररी आहे, लायब्री नाही! 😀) चाललो गं आई", असं म्हणून मी जायचो. आम्ही त्या वाचनालयाचे सभासद होतोच. (मोठ्या भावाने सभासदत्व सुरु केलं होतं). ८-१० दिवसांनी , लायब्ररीचं पुस्तक बदलून आणण्याचं काम पण मी करतो असं घरी म्हणालो. घरच्यांनी कौतुक-मिश्रित संमती दिली.
...आणि मग काय सांगता महाराजा..! ‘खुल जा सिमसिम’ झालं नां!! 😀
मी मोठ्या हौसेनं दररोज वाचनालयात जायला लागलो,सकाळी ८-८:३० ला आणि परत संध्याकाळी ७ ला! आधी वर्तमानपत्रे वाचणे (जवळपास सगळी पानं! 😀) , मग मासिकं वाचणे (मुख्यत: कथा) व शेवटी पुस्तक बदलून दुसरं पुस्तक घेणे! ही मासिकं वाचतानाची एक आठवण; काही विनोदी कथा असायच्या आणि ते वाचून मला हसूच फुटायचे! आधीच मी जरा जास्तच हसत असे आणि त्या कोवळया वयात प्रथमच exposure , त्यामुळेही असेल. मग लायब्ररीतील स्टाफ (सुभाष / मंडगे ) डोळे वटारून बघायचे आणि मी कसंबसं हसू दाबणार, तरी खिक् होणारच! 😀
पुस्तक बदलून आणताना पुस्तकांची वर्गवारी (classification ) कळू लागली होती; कादंबरी, कथा-संग्रह, चरित्र, स्फूट, नाटक इ. (फक्त काव्यसंग्रह नव्हते) . मी कधी नाटक , कधी कादंबरी , कधी लघुकथा, कधी चरित्र , असा पुस्तकं वाचण्याचा सपाटा लावला होता. By the way , नाटक हे पाहायचे असते (किंवा करायचे असते) व नाटकाच्या पुस्तकाला संहिता म्हणतात, हे ज्ञान मला १९८८ मध्ये पुण्यात आल्यावरच झालं! 😀 तोपर्यंत मी 'वाहतो ही दुर्वांची जुडी' , 'थँक यु मिस्टर ग्लाड, वेगळं व्हायचंय मला , उभा आंधळा मी अंधारी , संशयकल्लोळ , तरुण तुर्क म्हातारे अर्क , साष्टांग नमस्कार , हिमालयाच्या सावलीत इ. बरीच नाटकं वाचूनच संपवली होती)
कसा माहित नाही, पण दरम्यानच्या काळात माझा वाचण्याचा वेग चांगलाच वाढला होता. मी २५०-३०० पानाचे पुस्तक एका दिवसात फडशा पाडून दुसऱ्या दिवशी पुस्तक बदलायला हजर! आणि हो, हे सगळं अभ्यास /गृहपाठ सांभाळून! त्यामुळे घरून कोणाचीही तक्रार नव्हती. किशोर वाड.मयाशिवाय (टारझन, फास्टर फेणे सिरिज, राजू प्रधान इ.) मी खांडेकर , फडके, श्री ना पेंडसे , गो नि दांडेकर, पु भा भावे, ना सं इनामदार इत्यादींच्या कादंबऱ्या , य गो जोशी / द मा मिरासदार / शं ना नवरे व पु काळे इत्यादींच्या लघुकथा, पु लंची प्रवास-वर्णने वाचले. नेमाड्यांची कोसला , दया पवारांचे बलुतं पण वाचलं! बरंच काही कळलं (काही कळलं नसेलही १३-१४ च्या वयात). गोलंदाज कथा , सुरज कथा अश्या रहस्यकथाही वाचल्या. (बाबुराव अर्नाळकर ?) चंद्रकांत काकोडकरांच्या काही कादंबऱ्याही वाचल्या! आणि माझं मलाच कळलं की आपण हे वाचू नये! (बहुधा यालाच संस्कार म्हणत असतील नां?)
कथा, कादंबऱ्या , नाटके , चरित्र या चौफेर वाचनाला अप्रत्यक्षरित्या प्रोत्साहन /चालना मिळाली होती आमच्या मराठीच्या सरांकडून, कै. क भ प्रयाग सर! अतिशय शुद्ध, किंबहुना साहित्यिक बोलायचे ते वर्गात मराठी शिकवताना! माधव ज्युलियन , गोविंदाग्रज , कुसुमाग्रज या दिग्गजांच्या कवितांबद्दल (पाठयपुस्तकांत समावेश नसला तरीही) ते भरभरून बोलायचे! त्यामुळे शुद्ध , सात्विक, अलंकारिक असं मराठी वाचायला फार आवडू लागलं होतं.
वाचनाची एवढी दांडगी आवड असलेला मी; ११वी-१२वीच्या दोन वर्षात मात्र अभ्यास सोडून एकही अवांतर पुस्तक वाचलं नव्हतं ! ही दबलेली वाचनाची आवड नंतर उसळी मारून बाहेर पडली इंजिनीरिंगला प्रवेश घेतल्यानंतर! इंजिनीरिंगची, कॉस्मोपॉलिटन कल्चर ची हवा म्हणा किंवा नव्या भाषेची ओढ म्हणा, किंवा कॉलेजच्या लायब्ररीत तीच पुस्तके जास्त होती म्हणून म्हणा , पण मी इंग्रजी पुस्तकं वाचायला सुरुवात केली. एका छोट्या गावातील ZP High-school मध्ये मराठी माध्यमातून शिकलेला मी, सुरू केलं वाचायला Alistair MacLean , Arthur Hailey इत्यादींच्या novels! पहिल्यांदा शब्द आडला की डिक्शनरी पाहायचो , पण जवळपास प्रत्येकच शब्द नवा असणार , किती वेळा पाहणार डिक्शनरी? मग ते बंद केलं आणि कथा/प्लॉटच्या गोळाबेरजेने अर्थ समजून घ्यायचा व पुढे वाचायचं, असं चालू केलं. (काही पुन्हा-पुन्हा येणारे शब्द मात्र मी वहीत लिहून ठेवायचो, अर्थ नंतर पाहण्यासाठी).
लवकरच Sydney Sheldon , Irving Wallace , Harold Robins यांच्या pulp fictions वाचण्यात आल्या. पण लवकरच हे 'धोक्याचं वळण' सोडून गाडी Iyn Rand (We the living , Fountainhead , Atlas Shrugged ), Jeffrey Archer (Kane & Abel, The Prodigal Daughter ), P G Wodehouse यांच्याकडे वळली. मधल्या काळात मी GRE ची exam देत असल्याने इंग्रजी पुस्तकांचे वाचन आणखी जोरात चालू होतं!
हे वाचन थांबलं चक्क अमेरिकेतील ७ वर्षांच्या वास्तव्यात! तिथलं माझं वाचन म्हणजे फक्त Fortune magazine (ते पण शेवटची दोन वर्षे!).
हा वाचनाचा उपवास सुटला भारतात परत आल्यानंतर! मी मोठ्या उत्साहाने पुस्तक-खरेदी चालू केली. युगंधर,
सर्वोत्कृष्ट मराठी कथा , राजा शिवछत्रपती , राऊ , कुसुमाग्रज/पाडगावकर/विंदा करंदीकर/बालकवी/शांता शेळके इत्यादींचे काव्यसंग्रह, Discovery of India , The Great Speeches, Ruskin Bond , Yuval Harari , Paulo Coelho, Dan Brown, झुंपा लाहिरी, आर के नारायण , अरुंधती घोष , तस्लिमा नसरीन इत्यादींची पुस्तकं विकत घेतली. Business leaders नी लिहिलेली पुस्तके/biographies घेतली (Jack Welch , Kishore Biyani , Subroto Bagchi इत्यादींची)
Latest addition अच्युत गोडबोल्यांनी भेट दिलेलं ‘मुसाफिर’ आणि आनंद देशपांडे (Persistent’s Chairman & MD) यांनी भेट दिलेलं Roots & Wings!
वाचनाने मला खूप काही दिलंय! किंबहुना अश्या वैविध्यपूर्ण वाचनाने कालांतराने एक आगळी स्फूर्ती मिळाली; या पामराला पण थोडंसं पांढऱ्यावर काळे, व ते ही नित्यनेमाने करावेसे वाटू लागले! मराठी कविता, लेख लिहित होतोच पण १९९६ मध्ये चक्क Times of India ने माझा लेख('ERP - The viable solution') प्रकाशित केला आणि मला प्रचंड आनंद झाला! पुढे २००४ मध्ये rediff .com ने 'Can India ever be a developed country?' प्रकाशित केला व जो अतिशय गाजला! (आजच्या भाषेत 'viral ' झाला होता!😀 It is still there; just google my name and Rediff.) याच्यामुळे माझ्या लेखनाला एक नवा आत्मविश्वास मिळाला व नंतर माझे वीस तरी लेख (technical /management / corporate governance related ) प्रकाशित झाले. या पुढची पायरी म्हणून की काय , मला SAP वर पुस्तक लिहावंसं वाटलं आणि चक्क मला ते लिहिता आलं, प्रकाशित झालं! ‘SAP S/4HANA Condensed: For CXOs to Consultants’ वाचुन जेंव्हा पूर्णतः अपरिचित (व तेही अमेरिकेतून) वाचकांच्या चांगल्या प्रतिक्रिया येतात, तेंव्हा माझ्या ‘labour of love’ च चीज झालं असं वाटतं! त्यासारखं सुख नाही या नवशिक्या/हौशी लेखकासाठी!😀
..आणि या सगळ्यामागे, वडिलांनी बालपणीच लावलेली वाचनाची सवय व जणू ‘देता किती घेशी दो करांने’ असं म्हणणारं विजय वाचनालय, यांचं ऋण कधीही न फेडता येण्याजोगं आहे!!🙏
-प्रशांत

