Total Page-Views

Monday, July 27, 2020

स्मृतीगंध

माझ्या  वडिलांची आई,आम्ही मोठी आई म्हणत असू तिला. मी वी - वीत असताना निर्वतली, पण बऱ्याच आठवणी मनाच्या kaleidoscope  वर  अजूनही तरळून  जातात..

 

मोठी आई,....  गौर वर्ण, श्मश्रु केलेल्या डोक्यावर नेहमी  असलेला पदर, अतिशय कृश, हातावरची, गळ्यावरची कातडी लोम्बायची वार्ध्यक्याने, पण  अतिशय काटक!

काठी  घेता चालणं स्पष्ट बोलणं! काही वेळेला  तपकीर  (नाशी ) वापरायची.

मी सर्वात धाकटा नातू., शेंडेफळ म्हणून  मी  तिचा  फार  लाडका  होतो. प्रचंड  सोवळं, अनसूट-पांसुट (शेवटच्या  दोन शब्दांचा  अर्थ  मला  अजून हि  माहित नाही ! 😊 पण लहानपणी नेहमी घरी कानावर पडायचा) पाळणारी. पण मी मात्र  तिची घाबरता  पप्पी  घायचो ती पण लटक्या  रागाने  'चल मेल्या, कांदा  खाल्लेल्या  तोंडानं पप्पी  घेतोस! माझा उपवास आहे आज !' म्हणायची हसत-हसत! मोठ्या  आईचा राजाभाऊ पण  खूप लाडका होता  (त्याला ती  गमतीनं aamche aajoba मानायची!)

दर  दोन वाक्याला  एक  म्हण असायची तिच्या  तोंडात ! (उदा. 'नाकपुडीत  कीर्तन'!  😊 )

ती मला तिच्याबरोबर (सोबत  म्हणून) पोथीला  न्यायची विठ्ठल मंदिरात (कन्या शाळेच्या अलीकडे असलेला देऊळ) . तिच्या मैत्रिणी  म्हणजे कोंडोंवकिलांची  आई   (Nannu ?) , कांबळे गल्लीतल्या दिंडोरेची आजी, हिराळकर (जी नेहमी  काही  तरी खबर, gossip सांगायची म्हणून मोठ्या आईने  तिचं    टोपण नाव 'टप्पा' पाडलं होतं!  😊

आष्ट्याचे बापू मामा ( बाबूमामा त्यांच्या  बहीण सुशीलाआजी  कवठेकर) अधून-मधून  घरी  यायचे. काटीची शांतामावशी तिची बहुधा  मावस  बहीण  होती. (मला  लहानपणी  नक्की नातं काय, असले प्रश्न  कधीच  पडले  नव्हते! :-) तिची  मुलं हि  आठवतात  मला . विलास , सुधीर त्यांची एक बहीण घरी यायचे अधून-मधून. सुर्डीकर अष्टपुत्रे हि  नातलग होते. 

अण्णांचा मोठ्या  आईवर  फार  जीव  होता. कोर्टातून  घरी आले  कि  सर्वात  प्रथम ते मोठ्या  आईशी  बोलायचे. कशी  आहेस वगैरे  चौकशी करायचे  प्रेमानं.

लहानपणी  मी  थोडासा  गोरा असल्याने ती मला 'कसा  आहे माझा सोजीचा  मुद्दा !' म्हणायची  :-)

शनिवारच्या उपवासाच्या  उसळीतला (साबुदाण्याची खिचडी - जिला आपल्याकडे तेंव्हा तरी उसळ म्हणत असत) एक  तरी घास मला भरवल्याशिवाय तिला  चैन पडायची  नाही!

संध्याकाळची दिवे-लागण  झाली कि ती बरीचशी स्तोत्रं  मला  पुढ्यात घेऊन म्हणत  बसायची. मारुती-स्तोत्र   'सगुण रूप  जय जय  राम , निर्गुण रूप  जय जय  राम' (हे  नक्की  कोणतं स्तोत्र आहे?) वगैरे मला  अंधुकसे  आठवतात.

देव्हाऱ्यातल्या समई सारखी aani prasadatlya khadi-sakhresarkhi होती ती !..

 

 

 

 

  

 


Monday, July 6, 2020

किलबिल


कशी माहित नाही पण आजकाल पहाटे सहाच्या आसपास जाग येते; बाहेर  पक्ष्यांचा बऱ्यापैकी चिवचिवाट चाललेला असतो.
गेल्या आठ दिवसात पक्ष्यांची  संख्या वाढलीय , कि त्यांचा  आवाज वाढलाय  कि हे  सगळे माझ्या मनाचे खेळ आहेत, माहीत  नाही; पण बरं  वाटतं असतं चिवचिवाट ऐकून. मला  झोप तर येत  नसते (  सकाळचा चहा  साडे-सातच्या आधी  मिळण्याची  शक्यता  नसतेच  म्हणून मी आपला बेडवरच पडल्या-पडल्या    चिंतन वगैरे करायचा  प्रयत्न  करत असतो. पण पक्ष्यांची  किलबिल काही वेगळा विचार करू  देत  नाही. (नाही तरी मला  चिंतन म्हणून  नक्की  काय  करायचं असतं हे कळलंच नाहीये  अजून ! 😊)आता मी जरा जास्तच लक्ष देऊन ऐकायचा  प्रयत्न  करत  असतो...
थोड्या वेळानंतर  जाणवतं कि पक्ष्यांची vocabulary फारच लिमिटेड असावी! - शब्दांची वाक्यं ते  पुन्हा-पुन्हा  म्हणत असावेत !

पक्ष्यांची अशी primitive भाषा समजून घेण्यावर MIT / Stanford  / Harvard अथवा आणखी कुठेतरी research चालू असेल ही. Artificial Intelligence पेक्षा aves intelligence  नक्कीच सोपे असेल. असो..
तर assume करा कि मी मला ते येतेय!

आणखी जरा कान टवकारून ऐकावं म्हटलं, तर
एक चिमणी चिमणरावांना डाफरत होती, "कुठे बघताय?कुठे बघताय??कुठे बघताय???"..
..दुसरी म्हणत होती, "पडताय ना घराबाहेर? पडताय ना घराबाहेर?? आपलं lockdown नाहीये; लवकर  गेलात  तर चार  अळ्या जास्त  मिळतील. लोणचं घालीन  म्हणते या उन्हाळ्यात
गुलमोहराच्या फांदीवर बसलेला कावळा सौ काऊला म्हणत होता, "थोडं लांब जाऊन कोथरूडातनं चार चांगल्या काड्या आण की! प्रदुषणाच्या धुरानं डोळे  चुरचुरतात अशी  सबब  आता चालणार नाही. पुण्यातल्या परवाच्या अवकाळी पावसानं घरटं गळायला आलंय लगेच".
तेवढ्यात बाजुच्या फांदीवरचा कोकीळ: “ बाई, आतापासूनच तू षड्ज वगैरे लावू  नकोस. स्वतःला किशोरी आमोणकर समजतेस कि काय ?"
कोकिळा: "जळ्ळं मेलं लक्षण  ते ! काही कौतुकच  नाही ! तुम्हाला  फक्त सवाई-गंधर्व मधल्या वडा-पावाचीच जाण  म्हणा !"
जवळच बसलेली साळुंकी: "पण चांगलं  भरतं  हं पोट त्या  दिवसात"
पोपटराव मैनेला: “अगं आवर लवकर राणी! पेरूंचा फन्ना उडवायचाय आज! ना पोरांचा उच्छाद, ना वाॅचमनची भिती आता...चल आटप लवकर!”
तेवढ्यात वरच्या फांदीवरची कबुतरीण घुत्कारली, "अहो,ऐकलं का? नुसतं गुटर गूं किती  वेळा करणार आता! मी  काय  म्हणते, आज  शिकवा ना  पिल्लांना  उडायला! या  वयात  मी तर  चांगलं पाच मिनिटं आकाशात विहारुन घरट्यात सेफ यायचे परत "
कबुतर - "हो गं, तगादा  लाऊ नकोस  लगेच. , तुला कळली का  शेजारच्या  घरट्यातली good news ?"
कबुतरीण- "चहाटळ मेले, तुम्हाला कशी हो  कळली  ती बातमी ?"
कबुतर - "ऐकली उडत उडत!"

😃



-प्रशांत

वारी


दूर  राहिली अलंकापुरी,
दूर  राहिली चंद्रभागा
दूर  ती  नाम्याची पायरी
अन दूर  गोजिरी  विठु माऊली!
आठवे सदैव ती  वारी,
घेऊन तुळसीमाता शिरी
मुखी  सदा हरिनाम गोड
चटणी-भाकरही  वाटे  गोड!
ना  कधी  पाऊले  शिणली
ध्यास  एकच  माऊली, माऊली!
आठवे  ते  अश्व-रिंगण,
अन ते  अवीट भजन कीर्तन
उरल्या  आता फक्त आठवणी!
दाटून  मळभही येते  मनी
देवा काय  झाला अपराध?
सांगा काय झाली आगळीक
वेड्या भक्ताची ही सेवा
रुजू करून  घ्या हो सत्वरी
आक्रन्द मन  वारी वारी!



-प्रशांत

शब्द


शब्द मृदू, शब्द मुलायम
शब्द तरल, रेशीम तलम

शब्द राकट, शब्द कणखर
शब्द शौर्य, तलवारीचा टणत्कार

शब्द नेमके, शब्द चखोट,
शब्द ताशीव, ना कुठे खोट

शब्द मुळमुळीत, शब्द बुळबुळीत
शब्द बोटचेपे, शब्द दिवाभीत

शब्द कोकणी, शब्द -हाडी
शब्द पुणेरी, शब्द मराठवाडी

शब्द शुभंकर, शब्द मंगल,
शब्द ओंकार, शब्द निर्मळ

शब्द वज्रलेख, शब्द अमर
शब्द अक्षय, शब्द अक्षर!



-प्रशांत