Total Page-Views

Showing posts with label Literature- Marathi poems. Show all posts
Showing posts with label Literature- Marathi poems. Show all posts

Monday, July 6, 2020

वारी


दूर  राहिली अलंकापुरी,
दूर  राहिली चंद्रभागा
दूर  ती  नाम्याची पायरी
अन दूर  गोजिरी  विठु माऊली!
आठवे सदैव ती  वारी,
घेऊन तुळसीमाता शिरी
मुखी  सदा हरिनाम गोड
चटणी-भाकरही  वाटे  गोड!
ना  कधी  पाऊले  शिणली
ध्यास  एकच  माऊली, माऊली!
आठवे  ते  अश्व-रिंगण,
अन ते  अवीट भजन कीर्तन
उरल्या  आता फक्त आठवणी!
दाटून  मळभही येते  मनी
देवा काय  झाला अपराध?
सांगा काय झाली आगळीक
वेड्या भक्ताची ही सेवा
रुजू करून  घ्या हो सत्वरी
आक्रन्द मन  वारी वारी!



-प्रशांत

शब्द


शब्द मृदू, शब्द मुलायम
शब्द तरल, रेशीम तलम

शब्द राकट, शब्द कणखर
शब्द शौर्य, तलवारीचा टणत्कार

शब्द नेमके, शब्द चखोट,
शब्द ताशीव, ना कुठे खोट

शब्द मुळमुळीत, शब्द बुळबुळीत
शब्द बोटचेपे, शब्द दिवाभीत

शब्द कोकणी, शब्द -हाडी
शब्द पुणेरी, शब्द मराठवाडी

शब्द शुभंकर, शब्द मंगल,
शब्द ओंकार, शब्द निर्मळ

शब्द वज्रलेख, शब्द अमर
शब्द अक्षय, शब्द अक्षर!



-प्रशांत



Saturday, March 28, 2020

सूर्य आम्ही (दशपदी)


आम्ही दोघं ,आमचे दोन (धरून एक गोजिरा श्वान),
मखरातले गणपतीचं  आम्ही, हव्वा तसाच मान,


कसाही  असो अमुचा वकूब, पाहिजेत सदैव लाईक्स अन कौतुक,
नाचा धरुनी  फेर अमुच्या भवती, नका  काढू मात्र एक चूक,


तुम्ही हवं सदैव खाली, नम्र; नको आमुच्यापुढे ताठा कधी,
मारू अनुल्लेखाने, अन्यथा धरू मौनव्रत कधी,


कोणी ज्येष्ठ शिकवेल आम्हा गोष्टी शहाणपणाच्या चार,
साठी बुद्धी नाठी म्हणोनि फिस्सकन हसू तोंडावर


नातलग-मित्रगण :पदार्थ, परप्रकाशी ग्रह-गोल तुम्ही,
अमुच्या लिमिटेड सूर्य-मालिकेतील तेजोमय सूर्य आम्ही!





- प्रशांत

Tuesday, October 8, 2019

अनुभूती


फुलपाखरांचे रंग निरखत बालपणात डोकावावं,

कधी एका मुग्ध अबोल कळीत रुतून बसावं,

तर कधी सुरकुतलेल्या हातांच्या दुलईत लपेटून जावं,

कधी नातवाच्या साखरपाप्यात विरघळून जावं,

मावळतीच्या रंगोत्सवात रंगबावरी मुद्रा आठवावी,

मृदगंधाच्या उन्मादात वेडं होऊन जावं,

गारठलेल्या चांदणीवर चंदेरी शेला  ओढावा,

कोकिळेच्या आर्त सुरात मनीचा सूर मिळवावा,

प्रपाताच्या मस्तीत स्वतःला झोकून द्यावं,

हिमालयाच्या धवलतेत विकारांना स्नान घालावं,

आकाशाच्या घननिळाईत मीपणा हरवून जावा,

सागराच्या कल्लोळात बिंदू होऊन भरभरून जावं,


.... आणि एक दिवस......

.... शिशिराच्या पानगळीत अलगद गळून जावं!

काही कळलंच नाही


H1B ची तार छेडता-छेडता
Greencard  चा सूर कधी लावला,
.... काही कळलंच  नाही!

Youtube वरती क्रिकेट पाहता पाहता,
American football मध्ये कधी घुसलो,
.... काही कळलंच  नाही!

Sight-seeing ची नवी नवलाई संपल्यानंतर,
Hindu temple ची अध्यात्मिक बॉलीवूडची रंगीत गोळी लावत,
weekends (आणि वर्षे) कधी संपू लागले,
.... काही कळलंच  नाही!

दुसऱ्यांना नावे ठेवता ठेवता,
स्वतः stereotype NRI कधी बनलो,
.... काही कळलंच  नाही!

लोकांच्या पोरांना नाकं मुरडत मुरडत
आपली मुलं 'ABCD' कधी  बनली,
... काही कळलंच  नाही!

'परत जायचंय', 'परत जायचंय' घोकत
सोनेरी पिंजऱ्यात कधी अडकून पडलो
... काही कळलंच  नाही!
... काही कळलंच  नाही!

Saturday, October 5, 2019

पोवाडा



आईवेगळा पोर, पण जाण किती थोर,
जयसिंहाकडे राही ओलीस, नऊ वर्षाचा कोवळा पोर,
तो थोर धर्मवीर, संभाजी जी जी।


दिवाणे-आम दरबारी औरंग्याचा कपट कावा,
परी कैदेतुन सुटती युक्तीने शिवबा आणि छावा
तो थोर धर्मवीर, संभाजी जी जी।


तो अग्निचा लोळ, करी दुष्टांचे मर्दन,
प्रकांडपंडितही लवती पाहुन तो बुधभुषण
तो थोर धर्मवीर, संभाजी जी जी।


मोडी अनेक बंड फितुर, बु-हाणपुरवर करी चढाई,
जिंकी मैसुर अन कैक लढाई, देई यश भवानी आई,
तो थोर धर्मवीर, संभाजी जी जी।


परी युयुत्सु योध्यावर पडे दुर्दैवाचा कैसा घाला,
झाले घरचे भेदी, फक्त कवि कलश साथीला,
तो थोर धर्मवीर, संभाजी जी जी।


मरणप्राय यातना साही, पण मुखातुन याचनेचा शब्द नाही,
त्यागले प्राण धर्मासाठी, सुन्न कशा दिशा दाही!
तो थोर धर्मवीर, संभाजी जी जी।
तो थोर धर्मवीर, संभाजी जी जी।

मेजवानी



एक धुंद सायंकाळ  Sea-Rock ची,
एका bye-election मधील विजयोत्सवाची,
पाश्च्यात्य संगीताची सुरावट, मदहोष करणाऱ्या bubbly,
चायनिज, इटालियन spread, रेशमी कबाब अन फेसाळणारी bubbly
तुंदिलतनू लोक-प्रतिनिधींचं कधी नव्हे ते एकमत झालंय,
.. अशी मेजवानी भूतो भविष्यति.. !
 ..............................................................
…………………………………………………………..
…………………………………………………………..

अशीच एक मेजवानी दूर ओरिसामध्ये
दिली जातेय कलहांडीतील लांडग्यांना, गिधाडांना,
चाऱ्याविना तडफडून मरणाऱ्या गोमातेची,
'पाणी', 'पाणी' करत जीव सोडणाऱ्या विकलांग माणसाची......!

Monday, September 2, 2019

जगद्नियंता


अहो, ठाऊक आहे काय?
जगद्नियंता आहे मद्यपी!
या मद्यपानाच्या झिन्गेत त्यानं काय नाही केलंय?
त्यानं निर्मिलेल्या प्रत्येक मूर्तीतआहेत दोष
जशी असतात defective castings!
कोणाला केलंय नवकोट नारायण
तर कोणाला मृत्त्यू-शय्येवरही असते चिंता
‘कोण पुरवील सरण’?
दारिद्द्र्याचं वस्त्र सावरत पतिव्रता
भक्तीभावे वड पुजत असते
अन कोठे ‘page three’ lady
रोज नवी शय्या सजवत असते
सत्तेसाठी पित्यास जीवे मारणाऱ्या औरंगजेबास यांनाच निर्मिलंय,
पित्राज्ञेसाठी वनवास भोगणाऱ्या रामासम विभूती बनवणं मात्र थांबवलंय!
सायंकाळ होताच चालू  होतात जगद्नियंत्याची आचमनं
सागर लाटावर खेळणारी लाल-नारिंगी किरणं
भासवितात जणू मद्यांनं हिंदकळणारा प्याला
अन गरज नसतानाही उभा असतो,
Ice Sir?‘ म्हणून बिचारा हिमालय भोळा!

आठवतंय तुला?


अगदी लहानगी होतीस तू,
वाढदिवशी satin च्या गुलाबी frock मध्ये
दिवसभर बागडत होतीस तू,
त्यादिवशी मी परी पाहिली होती!
...आठवतंय तुला?

यौवनाच्या तू उंबरठ्यावर असताना,
मुग्ध कळीचे टपोरे फुल होत असताना,
सरळ नासिका, अन भावदर्शी डोळे ते,
कित्येक कलिजे खल्लास झाले होते,
...आठवतंय तुला?

अवचित एकदा रस्त्यात भेटलो होतो,
पुढे गेलीस तू मंद हसून,...
मागे वळून पाहिलं, ..तू पण होतीस पाहत वळून,
ग्रीष्माच्या उन्हात शरदाचं चांदणं जणू!
...आठवतंय तुला?

अबोल प्रेमाच्या कैक आठवणी
उफाळून येती अजूनही मनी
संध्याछायेच्या उदास एकांती
जर-तरची कोडी सोडवी!
...आठवतंय तुला?
...आठवतंय तुला??


स्पर्श


Adam च्या apple मधील वासनेचा तो सर्प

हजारो वर्षापासून मारतोय जागोजागी डंख
ऑफिसमध्ये सहकाऱ्यांचे सहेतुक स्पर्श
बस-लोकल मधील घामट, ओंगळ स्पर्श
देवालयाच्या महन्मंगल गाभाऱ्यातही
वासनेनं लडबडलेले तेच ते बीभत्स स्पर्श
आशीर्वाद देणारे हात सुद्धा जेंव्हा
जरा जास्तच वेळ रेंगाळतात..
संतापून वाटून जातं  मग,
नर व मादी या दोनच हिडीस नात्यात
आदिमाता ही संकल्पनाच विसरलीय आपण!
वासनारुपी पालीच्या ओंगळ स्पर्शापासून
उन्मुक्त होण्यासाठी मी शोधतेय…..
एक शांत, स्निग्ध, स्नेहार्द्र निरामय स्पर्श!

शून्य


कैक कोटी वर्षापूर्वी

कुठून तरी सुरु झालं Big Bang,

आली जन्माला आकाशगंगा,

म्हणा deterministic theory वा goldilocks zone,

जन्मली मग पृथ्वी अन काही जिवाणू,

सरली मग दशलक्ष वर्षे,

झाली मानवी उत्क्रांती

तप्तता तीव्र होत जाणारा सूर्य

मात्र विझेल काही लक्ष वर्षांनी,

मिटेल आपली सौरमाला,

व उरेल केवळ अंधारं विवर

अन मी इथं मांडतोय हिशेब,

पैशाचा, Likesचा अन साठ-सत्तर वर्षाच्या

......पांढरपेशी सप्पक आयुष्याचा!