आईवेगळा पोर, पण जाण किती थोर,
जयसिंहाकडे राही ओलीस, नऊ वर्षाचा कोवळा पोर,
तो थोर धर्मवीर, संभाजी जी जी।
दिवाणे-आम दरबारी औरंग्याचा कपट कावा,
परी कैदेतुन सुटती युक्तीने शिवबा आणि छावा
तो थोर धर्मवीर, संभाजी जी जी।
तो अग्निचा लोळ, करी दुष्टांचे मर्दन,
प्रकांडपंडितही लवती पाहुन तो बुधभुषण
तो थोर धर्मवीर, संभाजी जी जी।
मोडी अनेक बंड फितुर, बु-हाणपुरवर करी चढाई,
जिंकी मैसुर अन कैक लढाई, देई यश भवानी आई,
तो थोर धर्मवीर, संभाजी जी जी।
परी युयुत्सु योध्यावर पडे दुर्दैवाचा कैसा घाला,
झाले घरचे भेदी, फक्त कवि कलश साथीला,
तो थोर धर्मवीर, संभाजी जी जी।
मरणप्राय यातना साही, पण मुखातुन याचनेचा शब्द नाही,
त्यागले प्राण धर्मासाठी, सुन्न कशा दिशा दाही!
तो थोर धर्मवीर, संभाजी जी जी।
तो थोर धर्मवीर, संभाजी जी जी।
No comments:
Post a Comment