केंव्हा तरी WhatsApp वरती
एक मेसेज वाचला होता. वाटलं, आपण follow करावं. त्याप्रमाणे गेल्या दोन-तीन
महिन्यापासून मी कार मध्ये पारले-G चे ५-६ पुडे ठेवायला चालू केलं. परवा नेहमी
प्रमाणे traffic-jam मुळे एकाच स्पॉटला माझी कार बऱ्याच वेळ थांबली होती. एक दहा-अकरा
वर्षांचा पोरगा आला कारच्या खिडकीपाशी. कसलेला अभिनेता कॅमेरासमोर येताच
चेहऱ्यावरचे भाव कसे बदलतो तसं त्याने चेहऱ्यावर सराईतपणे करुण भाव आणले. मी
त्याला एक पारले-जीचा पुडा दिला. त्यानं तो road-divider च्या मध्ये असलेल्या
झुडपांच्यामध्ये लपवला व रिकामे हात दाखवत तो लगबगीने मागच्या कारकडे गेला. थोड्या
वेळाने एक पाच-सहा वर्षांची चिमखडी मुलगी आली. बहुधा त्या मुलाची बहिण असावी.
कारच्या खिडकीपर्यंत तिची उंची पण पोचत नव्हती बिचारीची. टाचा कशाबशा उंच करून ती
काचेतून पाहण्याचा प्रयत्न करत होती. मी काच खाली केली व तिला बिस्किटाचा पुडा
दिला.. आणि क्षणार्धात तिच्या चेहऱ्यावर असं काही निर्व्याज आणि निखळ हास्य उमटलं
की सकाळपासून उगीचच मरगळलेलं माझं मन पण आनंदलं..!
सिग्नल ग्रीन झाला होता...!
No comments:
Post a Comment