कराड
०५/०४/१९८६
प्रिय पु.लं.,
सा.न.
खरं तर ‘आदरणीय पुलं’ असंच लिहायला हवं होतं. पण आपण, आपल्या लेखनामुळे लाखो मराठी मनाच्या सिंहासनावर विराजमान आहात, आपल्या अज्ञात स्नेहरज्जुनी आम्ही जखडलेलो आहोत व त्या जवळीकीमुळेच ‘आदरणीय’ या जराशा दुरावा निर्माण करणाऱ्या शब्दापेक्षा ‘प्रिय’ हा शब्द जास्त समर्पक वाटला!
मी आपलं सारं साहित्य काही नाही वाचलं! (किंबहुना आमच्या ग्रंथालयातील काहीशा अनुपलब्धतेमुळे असेल) पण जी पुस्तकं वाचली, ती फारच आवडली! आम्हा मित्रांच्या कंपूनं तर त्याची अक्षरशः पारायणं केली आहेत. पुलंचं नवं पुस्तक कोणाला आधी वाचायला मिळणार , याबद्दल अगदी अहमहिका असते आमच्यात!
समाजातील , माणसांच्या स्वभावरेखेतील, चाली-रीतीतील विसंगती हेरून त्याला कोपरखळ्या मारणारा तुमचा उच्च अभिरुचीचा नर्म विनोद आम्हाला फार आवडतो! आपलं कोणतंही पुस्तक याचीच साक्ष पटवते! अर्थात अशी समीक्षा करण्याचा अधिकार कुरुंदकर , गं.बा.सरदार, माडखोलकर सारख्या प्रभृतींचा आहे! (सूर्याचं तेज मम यत्किंचित काजव्याला काय ते कळणार ?)
आजकाल मराठी साहित्य दरबारात अनेकांची ‘खोगीरभरती’ होत आहे , पण आपल्या कर्तृत्वाची ‘अपूर्वाई’ काही औरच ! मराठी विनोदी साहित्याच्या इतिहासाचा गडकरी , कोल्हटकरांचा ‘पूर्वरंग’ सोडला तर नंतरच्या साहित्यिकांच्या अक्षर कलाकृतींच्या ‘गोळाबेरीजे’त आपला सिंहाचा वाटा आहे! (एवढं वाक्य लिहून झालं की , अर्धा फुलपात्र पाणी पिलं!)
एक मात्र खरं की आम्हा मुलांना ‘फुलं’ व ‘पुलं’ फार आवडतात! एकदा मित्रांना मी असाच एक विनोदी चुटका सांगितला; पण एका बहाद्दराची दंतपंक्ती विलग झाली असेल तर शपथ! शेवटी मी तो चुटका पुलंचा आहे असं सांगताच तिथे हास्याचे फवारे उडाले! (पण तसं सांगण्यापूर्वी मनातल्या मनात मी तुमची क्षमा मागितली होती हं !) रामनामाने तुळशीपत्रही तरून जावं , तसं झालं हे !
खरं पाहिलं तर ,आमच्या engineering college च्या submission, workshop, drawings च्या धबडग्यात आणि अवाढव्य मशीन्सच्या गोंगाटात साहित्यिक अंकुर व निर्भेळ हसू जपून राहिलं गेलंय ,
याचं बरंचसं श्रेय माझ्यामते तरी तुम्हालाच आहे!
माझ्या मित्रांनी यापूर्वीही तुमच्याशी पत्र-व्यवहार केला, पण एकालाही तुमचं उत्तर आलं नाही. अर्थात तुम्हाला लेखन, सभा-संमेलन, काव्य-वाचन व प्रकृती यामुळे वेळ मिळाला नसेल. त्यामुळे पुलंचं पत्र म्हणजे ‘उंबराचं फूल’ असं इथे समज झाला आहे ,
पण ते फूल निदान मला तरी प्राप्य व्हावं हीच तीव्र अंतरिक इच्छा! तुमचं चार ओळींचं का होईना पण स्व-हस्ताक्षरातील पत्र आलं तर मी स्वतः ला धन्य समजेन! आता बस करतो. एवढं लांबलचक पत्र वाचून खचितच कंटाळले असणार, त्यामुळे हे मारुतीचं शेपूट आता आवरतं घेतो!
सौ. सुनिता-काकूंना सा.न.
पत्रोत्तर नक्की द्याल अशी अपेक्षा!
आपला कृपाभिलाषी,
प्रशांत
No comments:
Post a Comment