फुलपाखरांचे रंग निरखत बालपणात डोकावावं,
कधी एका मुग्ध अबोल कळीत रुतून बसावं,
तर कधी सुरकुतलेल्या हातांच्या दुलईत लपेटून जावं,
कधी नातवाच्या साखरपाप्यात विरघळून जावं,
मावळतीच्या रंगोत्सवात रंगबावरी मुद्रा आठवावी,
मृदगंधाच्या उन्मादात वेडं होऊन जावं,
गारठलेल्या चांदणीवर चंदेरी शेला ओढावा,
कोकिळेच्या आर्त सुरात मनीचा सूर मिळवावा,
प्रपाताच्या मस्तीत स्वतःला झोकून द्यावं,
हिमालयाच्या धवलतेत विकारांना स्नान घालावं,
आकाशाच्या घननिळाईत मीपणा हरवून जावा,
सागराच्या कल्लोळात बिंदू होऊन भरभरून जावं,
.... आणि एक दिवस......
.... शिशिराच्या पानगळीत अलगद गळून जावं!
No comments:
Post a Comment