Total Page-Views

Tuesday, October 8, 2019

दिवाळी …nostalgia

दरवर्षी नवं कालनिर्णय घरी आणलं कि मी प्रथम दिवाळी नक्की केंव्हा आहे, किती दिवस आहे हे पाहतो! मनात उगीचच एक वेगळा आनंद होत असतो,नुसत्या त्या तारखा पाहून!  मग माझी अवस्था बालपणी कशी असेल तुम्ही कल्पना करू शकता! J

बालपण...!

...दिवाळी येते आहे याची चाहूल लागायची जेंव्हा घर-दार लख्ख स्वच्छ व्हायचं, भिंतीवर रंगाचं नवा हात फिरायचा. आई गुळ-पापडीचे लाडू करणं सुरु करायची (जे मला बिलकुल आवडायचे नाहीत. मी बेसनाच्या लाडूंची वाट पाहत असायचो. आई ते बहुतेक मुद्दाम दिवाळीच्या अगदी एक दिवस आधी करायची!) . मोठा भाऊ प्रफुल्ल आकाश-कंदील बनवायला सुरु करायचा. कामठ्या, glazeचे रंगी-बेरंगी कागद, वायरिंग वगैरे. मी आपलं खळ आणून दे, कात्री दे वगैरे फुटकळ कामं करत असे  त्याच्या देखरेखीखाली. एकदा आकाश-कंदील झाला आणि बल्ब लावला की केवढा आनंद व्हायचा! वाणी-सामानासाठी वडिलांबरोबर किराणा दुकानात जायचो. नव्या कपड्यांची खरेदी व्हायची.  आणि ज्या खरेदीची मी अगदी आतुरतेनं वाट पाहायचो, ती फटाक्यांची खरेदी व्हायची आणि मग काय विचारता महाराजा!!

पण आनंदाच्या एवढ्या उन्मनी अवस्थेत असताना पण माझ्यातली budget-conscious / planning ची सवय जागी व्हायची. मी अगदी टोटल फटाके किती आणलेत, किती दिवस दिवाळी आहे याचं गणित मांडून रोज कोणत्या प्रकारचे किती फटाके उडवायचे हे लिहून ठेवत असे वहीत! (ते बघून माझा मोठा भाऊ प्रफुल्ल मला चिडवायचा आणि त्याच्या मनाला येईल तेंव्हा कोणताही फटाका/फटाके उडवून थोडी गंमत करायचा. पण ते न कळता, मी मात्र अगदी रडकुंडीला यायचो!) Plastic च्या मग खाली फटाका/बॉम्ब ठेऊन उडवणं वगैरे प्रयोग चालू असायचे (आणि मग आईचं रागावणं!)

दिवाळीच्या पहिल्या दिवशी अगदी पहाटे मी alarm न लावता जागा व्हायचो. (गल्लीतील पहिला फटाका फोडण्याचा मान मिळवण्यासाठी!). पण आई, ‘झोपरे, खूप लवकर आहे’ असं दटावायची. तरीही मी पाचच्या आसपास उठायचोच. (पण तो पर्यंत कोणीतरी already फटाके उडवलेले असायचे गल्लीत). प्रदूषण वगैरे शब्द पण कानावर पडले नव्हते त्या काळी. फटाके उडवून घरासमोर maximum कचरा करणे म्हणजे अगदी अभिमानाची गोष्ट होती तेंव्हा!  (फटाक्यांचा तो वास मला अजूनही आवडतो!) उडालेल्या फटाक्यांच्या कागदांच्या गर्दीत बहीणीने कष्टाने काढलेली रांगोळी मात्र झाकली जायची.

फटाक्यांच्या आवाजात  आणि बोचऱ्या थंडीत अभ्यंग-स्नान (रंगीत सुवासिक तेल, उटणे आणि मोती साबण!) करायला फार मजा यायची. मग नवे कपडे घालून देवीच्या मंदिरात जायचं, तिथे मित्र भेटायचे. मग फराळाला एकमेकाला घरी बोलवणं, जाणं!  घरी भावंडाबरोबर लटके भांडण करत (म्हणजे ते करायची, मला खरच वाटायचं!) अगदी स्पर्धा करतफराळ संपवायचा. मग प्रतीक्षा असायची दुपारची; main menuची!  मी एकदा जेऊन लगेच परत आईच्या पंगतीला जेवायला बसत असे!  त्यामुळे दिवाळी संपता-संपता माझं पोट पुरतं बिघडलेलं असे दरवर्षी! J


..अशी grand दिवाळी संपली की मला असं दु:ख व्हायचं म्हणून सांगू!


बालपणातला तो आनंद (किंवा तेवढ्या प्रमाणात) आता मिळत नाही पण तरी आजही  दिवाळी मनात एका वेगळ्याच आनंदाचे कारंजे नाचवते. प्रकाशाचा सण, मनातील तिमिर दूर करायचा सण, काही तरी नवीन सुरु करायचा सण, स्नेहांकिताना भेटायचा सण, अशी नवी ओळख असते आता दिवाळीची!  खरंय नां?


तुम्हा सर्वाना दीपावलीच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा!!




(*दिवाळी दोन दिवसांवर असताना मी  हा लेख लिहिलाय. वाट पाहतोय दिवाळीसाठी केंव्हा एकदा घरी जाईन!..)

No comments:

Post a Comment