आमच्या समोरच्या बंगल्यामध्ये एक झाड आहे. साधारणपणे Jan-Feb मध्ये त्याची पानगळ सुरु होते. भरपूर पाने ("कचरा") आमच्या पोर्चमध्ये / बागेमध्ये पडत असतात. साधारण मार्चच्या शेवटच्या आठवडयात ते एवढं मोठं झाड अगदी निष्पर्ण झालेलं असतं ; उघड्या-बोडक्या फांद्या घेत उदासवाणं उभं असल्यागत वाटतं ! आणि मग अचानक एके दिवशी छोटी-छोटी पिवळी फुलं मी पाहू लागतो. वसंत ऋतु आलेला असतो! मग काय, दोन-तीन दिवसातच एखादी जादूची कांडी फिरल्यागत, ते निष्पर्ण झाड एकाएकी नाजूक पिवळ्या फुलांचे गुच्छ अंगा-खांद्यावर मिरवत डौलानं उभं असतं ! द्राक्षांच्या घोसासारखी लखडलेली फुलं असतातात ती. गुढी-पाडव्याच्या मुहूर्तावर ही पिवळी धम्मक गुढी आकाशाच्या निळाई वर आणखीन खुलून दिसत असते! दोन-तीन आठवडे झाले की फुले गळून पडायला सुरुवात होत असते. आता आमच्या बागेत त्या नाजूक फुलांची पिवळी पखरण मी पाहत असतो:-) फुले गळून पडत असतानाच नवी पालवी फुटू पाहत असते. शेवटच्या फुलांचा बहर गळून पडेतो त्या झाडानं परत एकदा पाचूचा proverbial शालू ल्यायलेला असतो! कालचक्र पुढे धावत असतं !
एक-दोन वर्षे हे सगळं पाहिल्यानंतर त्या झाडाचं नाव तरी जाणुन घेण्याची जिज्ञासा झाली . Google केलं आणि कळलं , तो कॅशिया आहे! एकदम, सातवीत /की आठवीत शिकलेला " कॅशिया भरारला " (वि .द. घाटे ) धडा आठवला! आणि मग उगाचच ते झाड एखाद्या जुन्या मित्रागत वाटू लागलं !
No comments:
Post a Comment