Total Page-Views

Tuesday, April 15, 2025

कविता करविता

पहिली कविता कोणत्या भाषेत लिहिली गेली, केंव्हा लिहिली गेली, किंबहुना आधी गद्य आले की पद्य, हे नक्कीच संशोधनाचे विषय असतील. ऋग्वेद १५००-१००० BCE काळात लिहिले गेले असं म्हणतात. मराठीमध्ये मुकुंदराज यांनी ११८८ मध्ये 'विवेकसिंधू' लिहिले , जे मराठीतील आद्य साहित्य मानले जाते. आपल्या सर्वसामान्य माणसांच्या जीवनात बालपणी कानावर पडलेली पहिली कविता (बडबडगीत)असेल "काव काव ये, चिव चिव ये" , जेंव्हा आई येन-केन-प्रकारेण बाळाला जेऊ घालण्याचा प्रयत्न करत असते तेंव्हा! 😀तसेच १९७५ नंतर जन्मलेल्या पिढीतील बालकांनी रात्री "लिंबोणीच्या झाडामागे" ही अंगाई नक्कीच ऐकली असेल! 🙂

..तर सांगायचा मुद्दा हा की आपल्या मराठी मनावर कवितेचे एवढ्या लवकर खोलवर संस्कार झालेले आहेत! आता अश्या सर्वव्यापी कवितेची व्याख्या वगैरे (परीक्षेत - गुण मिळवून देणारी 😊) सांगायची गरज आहे का? पण तसं केल्याशिवाय लेखाला भारदस्तपणा कसा येईल बरे :-?

तस्मात मला रुचलेल्या काही व्याख्या द्यायचा मोह टाळत नाही..

“Poetry is criticism of life; poetry is appreciation of life.”- Matthew Arnold

“Poetry lifts the veil from the hidden beauty of the world and makes familiar objects be as if they were not familiar.” – Shelley

“Poetry is when an emotion has found its thought and the thought has found words.” – Robert Frost

"शब्दांनी घडविल्या गेलेल्या प्रतिमांची सेंद्रिय रचना म्हणजे कविता होय.” - सुधीर रसाळ

या थोरा-मोठ्यांच्या मांदियाळीमध्ये gate-crashing करण्याचा अस्मादिकांचा प्रयत्न - "विधात्याने स्त्री निर्माण केली आणि आपल्याच अद्भुत निर्मितीकडे तो अनिमिष नेत्रांनी पाहतच राहिला..अन् त्याला पहिली कविता स्फुरली!"

१२व्या शतकापासून सुरु झालेला मराठी कवितेचा प्रवाह अव्याहत वाहतोय. पंत काव्य, संत काव्य, तंत काव्य हे त्या काव्य-प्रवासातील मैलाचे दगड असावेत.

वृत्तात,मात्रांत यमकात अडकलेल्या मराठी काव्य-सुंदरीला मुक्तछंदाने मुक्त केले, आणि मग ला , री ला री , जन म्हणे काव्य करणारीया आरोपातून मुक्त होऊन समस्त कवींनी (आणि कवयित्रींनी) लेखण्या नवनवोन्मेषाने सरसावल्या. मग मात्र महापुरच आला नां मराठी कवितेला !(त्यात स्मार्टफोन/समाजमाध्यमांची भर!!). "कविता उदंड जाहल्या" वा "कवितांचा महापूर आणि मी एक पूरग्रस्त" असं म्हणायची पाळी आली असेल बऱ्याच दुर्दैवी वाचकांवर! (त्या 'महापुरात' अस्मादिकांचेही दोन-तीन ओहोळ सामील असतील बरे का ! "😊)

संवेदनशीलता, भावना यांनी प्रतिभेने व्यक्त होणे म्हणजे कविता. कविता करत नसतात , कविता प्रगट होत असते असं कुसुमाग्रज म्हणतात. दुर्बोध काव्याबद्दल त्यांचं मत "जेंव्हा कवीच्या भावना अस्पष्ट असतात , तेंव्हा कवितेत दुर्बोधता येते." (संदर्भ - प्रतिभा आणि प्रतिमा, दूरदर्शन)

जाणीवांपेक्षा नेणीवांवर भर असतो अशा काव्यात, असं मज पामराचं मत!

नानाविध भावना नेमक्या टिपणारे शब्द , नादमाधुर्य आणि कुठेतरी खोलवर भिडत जाणारा आशय ... भा रा तांबे , बोरकर , विंदा , कुसुमाग्रज , गदिमा, शांता शेळके, पाडगावकर , सुरेश भट , ना धों महानोर यांच्या सकस , समृद्ध काव्यावर पोसलेला आमचा काव्यपिंड..! कवीच्या मनात जो काही भावनांचा कल्लोळ होतोय , जे काही तरी त्याला मनोमन वाटतंय , ते त्याच्या कोणत्याही सामान्य वाचकास त्या कवितेद्वारे नेमके पोहोचणे (to use a technical term – ‘without any transmission loss’) यालाच खरे तर कवीच्या प्रतिभेचे यश म्हणावे लागेल! नाही तर उगीचच abstract art प्रमाणे कवीला याओळीत नेमकं असं म्हणायचे असेल की तसे, का काही वेगळाच अर्थ ध्वनीत करायचा आहे,.. ही बिचाऱ्या वाचकांची चिंता! 🙂

आजकालचे बरेच नवकवी ग्रेसांच्या graceful गूढतेचं अंधानुकरण करताना वाचकांना मात्र शब्दबंबाळ करतात! ("मला झोपायचंय हिमालयाची उशी घेऊन!" 😊)

काही जण एकच एक भाव (उदा: प्रेमभंग / एकाकीपण / नागरी मध्यमवर्गियांची दु:खे) त्यांच्या -याच कवितांतून व्यक्त करताना दिसतात. अर्थात, कविता काय असावी वा त्यातून काय व्यक्त करायचे आहे , ही पुर्णतः वैयक्तिक बाब आहे. पण वाटतं, की फक्त करडया रंगाशिवाय त्यांनी सृष्टीत , आसमंतात व्यापून राहिलेल्या सप्तरंगांची दखल घ्यावी. नव्हे तर, सप्तरंगांची उधळण करावी आपल्या काव्यांजलीतुन! जे काही भलं-बुरं आपल्या आसपास , समाजात , देशात/विदेशात घडतंय , ते कुठे तरी कवितेत यायला हवे, ती संवेदनशीलता असावी, ती नाळ जिवंत असायला हवी. कवितेचे नानाविध प्रकार लीलया पेलता येतील असं समृद्ध शब्द-भांडार (आणि अनुभव भांडार) हवं. काव्य एकसुरी वाटू नये.

नानाविध अनुभवांचे , संवेदनांचे कंगोरे प्रतिभेच्या कानशीने घासून सौदामिनीसारखे लख्ख प्रगटून वाचकांचे चक्षू (वअंतर्चक्षू) दिपून जावेत..... ते काव्य!!

ना धों महानोरांच्या निधनानंतर सांप्रत मराठी काव्यविश्वात खरोखरच एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आहेत; कवी/कवयित्री भरपूर आहेत, अगदी घरोघरी आहेत (त्यात अभिनेत्री-cum-कवयित्री या वर्गाची भर पडली आहे) , पण त्या कविता मनास भिडत नाहीत. (किंबहुना त्या convent मधून शिकलेल्या मराठी नवसाक्षर युवा-पिढीसाठी आहेत असंच वाटतं मला!)

यात भर म्हणून आता Artificial Intelligence ने काव्यलेखनाचं यांत्रिकीकरण केलंय. म्हणजे काय, तर तुम्ही कोणताही विषय द्या (उदा: प्रेम) ते AI tool तुम्हाला एका मिनिटात ती कविता करून देते! तुम्हाला नाही आवडली ,तर परत करून घ्या .. आवडेपर्यंत!

आता याच्या मुळे नजीकच्या भविष्यात गीतकारांवर नक्कीच संकट येऊ शकते.

..आणि तुम्ही एखादी चांगली कविता लिहिलीत तरी "AI tool वापरून केली असेल" असा आरोप तुमच्यावर होऊ शकतो! 😊

१२०+ वर्षांपूर्वी केशवसुतांनी लिहिलेल्या या काव्यपंक्ती मात्र कालौघात काहीशा अर्थ हरवुन बसल्या आहेत..

आम्हांला वगळागतप्रभ झणी होतील तारांगणे,

आम्हांला वगळाविकेल कवडीमोलावरी हे जिणे!”


-प्रशांत

No comments:

Post a Comment