एक महिना लोटलाय;
मी ते घरटं
(व ती चिमणी
) दररोज एकदा तरी
पाहतोय..
या काळात बरंच
काही घडलंय. चिमणीने
घरट्यात अंडं घातलं
असणार. एके दिवशी
जेंव्हा घरट्यातून क्षीण
चिव-चिव आवाज
ऐकू येऊ लागला,
चिमणी घरट्याकडे खूप
वेळा येऊ लागली
तेंव्हा कळलं, पिल्लू
झालंय! चिमणी सकाळी
साधारण ९ च्या पुढे घरट्याकडे
यायची, मग चोचीतून
चोचीमध्ये भरवायची पिल्लाला. (मला
आधी वाटलेलं , आळी
भरवत असेल! प्रोटीनयुक्त
आहार! नंतर काही
दिवसांनी कळलं, चिमणी
आधी exora च्या फुलावर
बसून परागकण टिपते
व ते चोचीतून
भरवते! सकाळी ११/११-३०
पर्यंत चिमणी १५-२० वेळा
तरी आलेली असेल
पिल्लास भरवायला! पिल्लू
मात्र सकाळी ८ पासूनच तिची
वाट पाहायचा चिवचिवाट
करायचं. (मला ते
गाणं आठवलं 'पक्षिणी
प्रभाती चारियासे जाये,
पिल्लू वाट पाहे
उपवासी'!)
काल चांगलाच जोराचा अवकाळी
पाऊस आला आणि मी उगीचच
disturbed..त्या पावसाच्या तडाख्याने जास्वंदाच्या
छोट्या फांदीवरचं ते
घरटं खाली पडलं
तर, या काळजीने!
पण ईश्वराची लीला
म्हणा, चिमणाबाईंचं मजबूत
घरटं बांधण्याचं कौशल्य
म्हणा, तसं वाईट
काही घडलं नाही
सुदैवाने! (कारण मी
आज सकाळी उठल्या-उठल्या आधी
ते घरटं पाहिले,
चिवचिव ऐकली आणि
हुश्श वाटलं!)
पिल्लाची ३-४
आठवड्यात वाढ झाली
असेल किंवा चिमणीने
कालच्या पावसाचा भविष्यातील
धोका ओळखला असेल,
काहीही असो पण आजच ते
पिल्लू हळूच घरट्यातून
बाहेर पडून फांदीवर
बसलं. चिमणी आलीच
लगेच. खाऊ घालायला
असेल वा कौतुक
करायला असेल वा उडायचं शिकवायला
असेल! ५-१० मिनिटे त्या
फांदीवर बसून जग बघितल्यानंतर पिल्लाने हळूच
जवळच्या दुसऱ्या फांदीवर
झेप घेतली! तिथे
परत ५-१० मिनिटे बसून
पुढची मोठी झेप!!
आता इकडे घरटं
रिकामं आहे..
…Empty nest !!
-प्रशांत
No comments:
Post a Comment