Total Page-Views

Sunday, January 18, 2026

आठवणींचा kaleidoscope (5)

 


दहावीची परीक्षा मार्चमध्ये संपली होती. जुनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालणारी उन्हाळ्याची लांबलचक सुट्टी सुरु झाली होती. माझे जवळचे मित्र पुणे आणि बंगळूरला आपापल्या नातलगांकडे सुट्टीला गेले होते.अस्मादिक मात्र तोपर्यंत सोलापूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांची शीव ओलांडून पलीकडे गेले नव्हते! (तेंव्हा मला कोणी सांगितलं असतं की "तू मोठेपणी १०-१२ देश हिंडशील, अमेरिका व सिंगापुरमध्ये वास्तव्य करशील" , तर त्या माणसाला वेड लागलंय किंवा माझी चेष्टा करतोय ,असंच मला वाटलं असतं!) मुरूम, अरळी, केळगाव व सोलापूरमधेच तेंव्हापर्यंत सुट्ट्यामध्ये गेलेलो (आजोळ/मावशी/आत्याकडे) ! पण तेंव्हा त्याचं मला फारसं वैषम्यही वाटायचं नाही. विजय वाचनालयातील पुस्तकं वाचणे (रोज एक या गतीने) , रेडिओवर हिंदी/मराठी गाणी ऐकणे , घरी भावाबहिणीबरोबर पत्ते, सोंगट्या खेळणे, अंगणात बॅाल खेळणे असे उपक्रम सुरु होते! मनात धागधुगही होतीच की परीक्षेचा निकाल कसा लागतोय , किती मार्क्स पडले असतील इ.

अशाच एका रणरणत्या दुपारी घरी मी सहज म्हणून गणिताचं पुस्तक परत एकदा चाळत बसलो होतो. सगळा अभ्यास झालेला, परीक्षा दिलेली , आता काय वाचणार , असं वाटत पुस्तकांच्या शेवटच्या पानांकडे वळलो व पाहिली एक यादी; गणितातील मराठी शब्द व त्याला पर्यायी इंग्रजी शब्द याची. उदा: चौकोन - quadrilateral , समांतरभुज चौकोन - parallelogram , लघुकोन - acute angle , गृहितक - postulate इ इ! माझ्या डोक्यात अचानक ट्यूब पेटली! अरेच्च्या, आपण हे शब्द पाठ केले तर? सोपं जाईल ना कॉलेज मध्ये इंग्रजीतून शिकताना ?

माझ्याकडे वेळ तर होताच! मग मी चक्क अंकगणित, भूमिती, जीव/भौतिक/रसायनशास्त्र या ५ ही पुस्तकांतील शब्दांची यादी(glossary!) लिहून काढण्यासाठी ५ वह्या केल्या; प्रत्येक पानाच्या मधोमध उभी रेषा मारली, डावीकडे मराठी शब्द, उजवीकडे त्याचा पर्यायी इंग्रजी शब्द; चालू झाला माझा स्वयंप्रेरित गृहपाठ! यादी पूर्ण लिहून झाली की पुढचा उपक्रम - पाठांतर! उभ्या रेषेच्या उजव्या बाजूवर हात ठेवायचा व पाठ झालंय का, ते पाहायचं! मला वाटतं ८-१० दिवसांत मी ते सगळे technical शब्द पाठ केले होते.

या पाठांतराचं महत्त्व मला ११वीला कॉलेजातील (वालचंद कॉलेज , सोलापूर) अगदी पहिल्या दिवसापासून कळलं! कारण सगळे गणित /विज्ञानाचे प्राध्यापक अस्खलित इंग्रजीमध्ये शिकवत होते (and some like Prof N V Shah in a special accent); मराठी माध्यमातून आलेल्या बाकीच्या विद्यार्थ्यांना , सर काय बोलतायत, काय शिकवतायत याची काही हवा पण लागत नव्हती पहिले २-३ महिने! मी मात्र पहिल्या दिवसापासून आत्मविश्वासाने वर्गात बसत होतो, इंग्रजी माध्यमातून (हरिभाई देवकरण शाळा!)आलेल्या मित्राबरोबर फारसा नं बुजता बोलत होतो, tutorial exam. मध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवत होतो! (By the way, दहावीच्या परीक्षेत मला गणितात १४९/१५० व इंग्रजी मध्ये ८९/१०० गुण मिळाले होते) लहान गावातील मराठी माध्यमाच्या शाळेत (तेही ‘जिल्हा परिषद शाळा’) शिकल्यामुळे भविष्यात इंग्रजीशी struggle वगैरे मला कधीच व कोणत्याच कॉलेजमध्ये करावा लागला नाही. मी इंग्रजीचा जागतिक मापदंड असलेल्या TOEFL/GRE परिक्षा चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालो होतो. आणि माझ्या सुदैवाने आजमितीला माझे २६ लेख (technical/management/miscellaneous) Times of India , Dataquest, Rediff. com , Corporate Citizen, Board Stewardship , EnterpriseIT world इ. मधे प्रकाशित झालेले आहेत)

.. आता चार दशकानंतर मागे वळून पाहता मी तेव्हा ते technical इंग्रजी शब्द पाहिले , list केले , गांभीर्याने पाठ केले , याची गंमत वाटते; थोडं आश्चर्यही वाटते!

आजकाल जी घोकंपट्टीच्या (rote learning )विरोधात ओरड चालू आहे , त्यात थोडं तथ्य असलं तरी मला वाटतं , आमच्या पिढीने पाठांतरबरोबरच चौकस बुद्धी/जिज्ञासू वृत्ती पण जिवंत ठेवली! आणि माझ्या मते पाठांतराचा सर्वात मोठा फायदा हा असतो की त्यामुळे तुमच्या स्मरणशक्तीला चालना मिळते, तुमची एकाग्रता वाढते! आजच्या युगातील भ्रमणध्वनी/समाज माध्यमांच्या (मोबाइल फोन /सोशल मीडिया) अतिरेकी वापरामुळे लोकांचा (खास करून पुढच्या पिढीचा) concentration span अतिशय कमी झालेला पाहतो, तेंव्हा पाठांतर पद्धतीचं आगळं महत्त्व नक्कीच अधोरेखित होतं!


..एक छान, अनोखी आठवण मात्र मनाच्या kaleidoscope मधे राहिली!

 

 

-प्रशांत पिंपळेकर


No comments:

Post a Comment