आपण आपल्या आयुष्यात किती मश्गूल म्हणा किंवा आत्ममग्न असतो नां? जे काही आपलं सामान्य जीवन, माफक यश, कांही दु:खं इ इ आहेत त्यात आपण मध्यवर्ती व्यक्तिरेखा/नायक असतो! (म्हणजे, तसं आपण स्वतः:ला समजत असतो!) कुटुंबातील बाकीचे एकदम आतल्या वर्तुळात , कांही बाहेरच्या वर्तुळात , कांही आणखी बाहेरच्या वर्तुळाच्या परिघावर, बरेचसे परिघापलीकडे वगैरे असतात.. आपण ज्यांच्या जीवनाचा थोडासाही विचार करत नसतो! उदा. तुम्ही Uber ने गेलेल्या taxi चा ड्रायव्हर , तुमच्या सोसायटीचा वॅाचमन , घरी येणारी maid, रस्त्यावरचा पंक्चर काढणारा इ इ! त्यांच्याही जीवनकथेत तुम्हाला असलंच तर नगण्य स्थान असतं!
आणि हो, त्या प्रत्येकाच्या
वैयक्तिक जीवनात अनंत सुख-दु:खं आहेत. आनंद,
आकांक्षा, स्वप्नं, वैफल्य, नैराश्य, सत्कर्म , कुकर्म इ नाना काळ्या,
पांढ-या , करड्या , कधी
रंगीबेरंगी छटांचं जीवन जगत असतो
प्रत्येकजण! प्रत्येकाच्याच जीवनाचा पैस , आवाका हा तसा अफाटच
असतो; मग भले तो
माणुस कितीही सामान्य जीवन जगत असला
तरी! फक्त एक दृष्टी
लागते, निरिक्षणशक्ती लागते; ज्याला कल्पनाशक्ती व शब्दसंपत्तीची जोड
मिळाली की चांगली चारशे-पाचशे पानी कादंबरी लिहिता
येईल एखाद्या सिद्धहस्त लेखकाला! (कल्पना करा रत्नाकर मतकरी,
जयवंत दळवी, जी ए कुलकर्णी
, पेंडसे , नेमाडे , शरणकुमार लिंबाळे अशी कादंबरी लिहितायत..!)
आणि गंमत म्हणजे , हे
जे मी वर नमूद
केलेलं realization आहे (की कोणाही
त्रयस्थ माणसाचं आयुष्य तेवढंच गुंतागुंतीचं असतं , complex असतं जेवढं तुम्ही
तुमच्या स्वत:च्या जीवनाला
समजताय) हे इंग्रजी भाषेत
फक्त एका शब्दातून ध्वनित
होतं.
तो शब्द आहे sonder!
इथेच थांबतो या रविवार सकाळी!!
-प्रशांत
No comments:
Post a Comment