एकदा नातलगांतील एका Gen-Z युवकाशी थोड्या गप्पामारत होतो. थोड्याच वेळात गप्पांची गाडी संस्कृती, धर्म याविषयाकडे वळली. त्याने मोठ्या आवेशाने मला विचारलं,.. "असं काय भारी आहे हो आपल्या हिंदू धर्मात की ज्याचा मला अभिमान वाटायला पाहिजे?" मी माझ्यापरीने त्याला सांगितल्या काही गोष्टी, काही अनोखी वैशिष्ट्ये, जी इतर कोणत्याही धर्मात औषधालाही सापडत नाहीत! नंतर वाटलं, हा प्रश्न बऱ्याच Gen-Z नां तसेच बऱ्याच प्रौढांनाही पडला असेल!
प्रथमतः जेंव्हा आपण 'हिंदू धर्म' म्हणतो, त्यातील धर्म म्हणजे नेमकं काय, त्याची व्याख्या काय, हे जाणून घेऊ.
हिंदू धर्मात ‘धर्म’ या शब्दाचा अर्थ इतर धर्मात जो अभिप्रेत आहे त्याहून फार व्यापक आहे. धर्म म्हणजे स्वभाव/ स्थायीभाव, गुणधर्म असा अर्थ आहे. जो धारण केला जातो, जो आपल्या दैनंदिन आयुष्याचाच भाग असतो तो म्हणजे धर्म होय. ज्यामुळे समाजाची धारणा होते, सामाजिक स्थैर्य टिकून राहते अशी नियमावली म्हणजे धर्म. तसेच,हिंदू धर्मात धर्म हा शब्द फक्त धार्मिक कर्मकांड/रिवाज याच्या पलीकडे जाऊन ‘कर्तव्य’ या भावनेने वापरलेला दिसतो. उदा: जेंव्हा आपण राजधर्म म्हणतो, तेंव्हा एका राजाने प्रजेबरोबर कसे वागायचे असते, राज्य-शकट कसा हाकायचा असतो, कोणती कर्तव्ये पार पाडायची असतात इ. गोष्टी ध्वनित होतात. थोडक्यात ‘धर्म’ या शब्दाचा अर्थ केवळ पूजा-पद्धती किंवा धार्मिक आचार एवढाच मर्यादित नसून, जीवनाला धारण करणारी मूल्यव्यवस्था, परिस्थितीनुसार कर्तव्य आणि नैतिक जबाबदारी असा व्यापक आहे.
प्रत्येक धर्माची स्वतःची वैशिष्ट्ये आणि मूल्ये असतात, जी मानवी समाजाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करतात. तथापि, हिंदू धर्मात अशा काही अद्वितीय संकल्पना आहेत, ज्या इतर अनेक प्रमुख धर्मांपेक्षा वेगळ्या , वैशिष्ट्यपूर्ण आणि अभिमानास्पद ठरतात.
१. एकच प्रेषित/ संस्थापक किंवा एकच ग्रंथ नाही
इतर धर्मांमध्ये एक अंतिम संदेशवाहक/ प्रेषित किंवा एकच पवित्र ग्रंथ असतो, ज्याचे पालन प्रत्येकाने करणे बंधनकारक असते. पण हिंदू धर्मात कोणताही एकच अंतिम ग्रंथ किंवा संस्थापक नाही.
हिंदू धर्माला एका विशिष्ट संस्थापकाने, एका विशिष्ट काळाने किंवा एका ग्रंथाने बांधून ठेवलेले नाही. अनेक ऋषी-मुनी, शंकराचार्य, साधू-संत इ. तसेच वेद, उपनिषदे, भगवद्गीता, रामायण, महाभारत, पुराणे, संतवाङ्मय अशा असंख्य स्रोतांमधून तिची समृद्ध वाटचाल गेल्या हजारो वर्षात झाली. (हिंदू धर्मास सनातन धर्म असेही म्हणतात. सनातनचा शब्दशः अर्थ आहे शाश्वत, अनादी आणि अखंड चालत आलेले; ज्याला प्रारंभ नाही आणि अंतही नाही, कालातीत! इतिहासकारांच्या मते सनातन धर्म सिंधू संस्कृतीमध्ये म्हणजे ४००० ते ५००० वर्षांपूर्वी उदयास आला)
हे एक प्रमुख कारण आहे, वैशिष्ट्य आहे ज्यामुळे हिंदू धर्म लवचिक आणि बदलत्या काळाशी जुळवून घेणारा ठरला आहे.
२. ईश्वराची व्यापक संकल्पना
हिंदू धर्मात ईश्वराची संकल्पना अतिशय व्यापक आहे. हिंदु धर्म सहिष्णू आणि सर्वसमावेशक आहे; एकेश्वर/बहुश्वर, द्वैत/अद्वैत, शैव/वैष्णव, सगुण/निर्गुण, साकार/निराकार, या बहुविध संकल्पनांतुन परमसत्याचा विचार केला जातो. ‘अणू पासोनि ब्रह्मांडा एवढा होत जातसे’ म्हणत नेमके वर्णन केले आहे समर्थ रामदास स्वामीनी.
इतर प्रमुख धर्म ‘देवाने जग निर्माण केले’ या संकल्पनेवर भर देतात. पण हिंदू धर्म ‘देव म्हणजेच हे जग/सृष्टी’ या संकल्पनेवर आधारित आहे. ‘अहं ब्रह्मास्मि’ ("मी ब्रह्म (परमेश्वर/विश्वचैतन्य) आहे" याचा मूळ अर्थ असा आहे की, माणसाचा आत्मा (जीवात्मा) आणि संपूर्ण विश्वातील परमशक्ती (परमात्मा) एकच आहेत. आपल्यातील आत्म्याचे मूळ स्वरूप हे दैवी आणि अमर आहे, ही जाणीव या वाक्यातून होते). माणसाचा मूळ आत्मा आणि संपूर्ण विश्वाचे चालन करणारी परम शक्ती (ब्रह्म) हे वेगवेगळे नसून एकच आहेत. बाहेरील जगात शोधत असलेली परम शक्ती किंवा ईश्वर वेगळा नसून तो तुमच्याच आत (प्रत्येकात) वसलेला आहे. 'पिंडी ते ब्रह्मांडी' यातूनही तोच अद्वैत वेदांत ध्वनित होतो.
देव ‘अत्र, तत्र, सर्वत्र आहे’ ही भावना भारतीय संस्कृतीत इतकी खोलवर रुजली असल्याने आपण देव जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी देवत्व पाहतो. चुकून पाय लागलेल्या कोणत्याही माणसाला आपण नकळत नमस्कार करतो हा केवळ विधी वा उपचार नसून त्या माणसापरी, त्याच्यातील परमात्म्यापरी आदर व्यक्त करणारी भावना आहे.
३. 'वसुधैव कुटुम्बकम्' आणि सर्वसमावेशकता
माझं कुटुंब, माझा देश, माझा धर्म .. याच्याही पुढे जाऊन म्हणणं की , 'सारं जगच एक कुटुंब आहे (आणि ज्याचा मी एक भाग आहे) हे उदात्त तत्त्वज्ञान हजारो वर्षांपूर्वी सांगितलं गेलंय आपल्या उपनिषदात.. 'वसुधैव कुटुम्बकम्'|
"हे विश्वची माझे घर" मधून श्री संत ज्ञानेश्वर महाराजही तेच सांगतात तेराव्या शतकात.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानातील एक चरण आहे, 'जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात'. अर्थ - "या विश्वातील सर्व प्राणिमात्रांना(जीवांना) ज्याची इच्छा असेल, ते मिळो." म्हणजेच प्रत्येकाच्या चांगल्या इच्छा पूर्ण होवोत आणि सर्वांचे कल्याण होवो. उदात्ततेची ही परिसीमा आहे नां?
'जगा आणि जगू द्या' हा दिव्य उपदेश देणारे भगवान महावीर ही याच भूमीतील!
ऋग्वेदात म्हटलंय, "एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति" म्हणजे — सत्य एकच आहे, पण ज्ञानी लोक ते वेगवेगळ्या प्रकारे सांगतात. हिंदू धर्माने कधीही आपल्या विचारांची सक्ती इतरांवर केली नाही, तर सर्व विचारांचे स्वागतच केले.
ही वैश्विक कुटुंबाची, केवळ मनुष्यच नाही तर सर्व प्राणिमात्रांचे कल्याण चिंतणारी, आपलेपणाची भावना, तसेच विविध श्रद्धा आणि विचारांचा आदर, हिंदू धर्मातील सर्वसमावेशकतेचे दर्शन घडवतात.
४. स्त्री-शक्तीस समान स्थान व आदर/सन्मान
ज्या हिंदू धर्मात दुर्गा (काली ), लक्ष्मी, सरस्वती या देवींची भक्तिभावे पूजा होते, त्या हिंदू धर्मात सर्वसामान्य स्त्रीचे स्वातंत्र्य, कुटुंबातील/समाजातील स्थान प्राचीन काळापासून उंचावरच होते (आणि आहे!)त्यांचा यथोचित आदर/सन्मान होत असे. त्यांच्या शिक्षणावर केंव्हाही बंदी नव्हती.
प्राचीन वैदिक काळापासूनच हिंदू धर्मात स्त्रियांना शिक्षणाचा, वेदाध्ययनाचा आणि तत्त्वज्ञानावरील चर्चेचा पूर्ण अधिकार होता. वैदिक आणि उपनिषद काळात अनेक विद्वान स्त्रिया होऊन गेल्या, ज्यांना 'ब्रह्मवादिनी' (ज्यांनी ब्रह्मज्ञानाचा शोध घेतला व प्रचार केला) म्हटले जायचे.
या संदर्भात गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा, घोषा आणि अपाला यांसारख्या विदुषींचा गौरवाने व अभिमानाने उल्लेख करावा लागेल. वेद-उपनिषदांच्या परंपरेत त्यांनी तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि वैचारिक चर्चेत योगदान दिल्याचे उल्लेख आढळतात. गार्गीने याज्ञवल्क्यांना अस्तित्वाच्या मूलाधारावर प्रश्न विचारले; मैत्रेयीने संपत्तीपेक्षा आत्मज्ञानाला महत्त्व दिले; लोपामुद्रेच्या ऋग्वेदीय ऋचांमध्ये गृहस्थजीवन आणि अध्यात्म यांचा समतोल दिसतो.
आणि हाच ज्ञानपरंपरेचा, सबलतेचा, सक्षमतेचा वारसा राजमाता जिजाबाई, महाराणी ताराबाई, अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी, आनंदीबाई जोशी यांनी समर्थपणे पुढे नेला.
५. निसर्गपूजा आणि पर्यावरणाचा आदर
निसर्गाला, त्यातील जवळपास प्रत्येक घटकाला हिंदू धर्मात अन्योन्यसाधारण महत्व आहे! नद्या (गंगा, यमुना, गोदावरी, नर्मदा , सरस्वती), वृक्ष-वनस्पती (वड, पिंपळ, तुळस) , पर्वत (हिमालय , कैलाश ), प्राणी (गाय, बैल , हत्ती, नाग , मोर, उंदीर - देव/देवतांचे वाहन म्हणून) , सूर्य-चंद्र आणि नवग्रह यांना पूजनीय मानले जाते. ही केवळ अंधश्रद्धा नसून पर्यावरणाप्रती कृतज्ञता आणि सहजीवनाची अत्यंत प्रगत संकल्पना आहे.
"वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे" हा संत तुकाराम महाराजांचा अत्यंत प्रसिद्ध अभंग याच निसर्गप्रेमाचे द्योतक आहे. मानवाने निसर्गाचा फक्त उपभोग न घेता निसर्गासोबत सहजीवन जगले पाहिजे, हा विचार हजारो वर्षांपूर्वीच या धर्माने मांडला आहे.
निसर्ग हा केवळ उपभोगासाठी उपलब्ध संसाधन नसून जीवनाचा सहचर आहे, ही दृष्टी आजच्या पर्यावरणीय चर्चेतही अर्थपूर्ण ठरते. आधुनिक जग पर्यावरणीय संकटांशी झुंजत असताना, वृक्ष-संवर्धन, व्याघ्र-प्रकल्प इ. आजच्या संकल्पना पाहताना हिंदू संस्कृतीतील ही व्यापक निसर्गदृष्टी फार महत्त्वाची वाटते.
६. मातृ/पितृ/आचार्य/अतिथी देवो भव
जन्म देणाऱ्या आई, वडिलांना तर देव मानलंच आहे पण गुरूंना ही देवस्थानी ठेवलंय हिंदू धर्मात!आणि त्याही पुढे जाऊन घरी येणारा कोणताही पाहुणा/अभ्यागत/अतिथी यालाही देव मानून यथोचित पाहुणचार करणे, ही तर फक्त हिंदू धर्माचीच खासियत असावी!
‘मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्यदेवो भव, अतिथिदेवो भव’ ही शिकवण मानवी नात्यांना अपार आदर आणि अनोख्या कृतज्ञतेची जोड देते.
७. 'कर्म' आणि 'पुनर्जन्म' सिद्धान्त
इतर काही धर्मांमध्ये मृत्यूंनंतर थेट 'स्वर्ग' किंवा 'नरक' मिळतो आणि तिथेच कायमचे राहावे लागते अशी धारणा आहे.
हिंदू धर्मातील 'कर्मसिद्धान्त' सांगतो की, मानवाचा जन्म त्याच्या पूर्वकर्मांवर आधारित असतो. कोणतीही शिक्षा किंवा बक्षीस हे कायमस्वरूपी नसते. आत्म्याचा प्रवास मोक्ष मिळेपर्यंत अनेक जन्मांतून सुरू राहतो. पुनर्जन्म व कर्म जीवन चक्राकार आहे; कर्मानुसार पुढील जन्म ठरतो.
‘कर्म’ ही संकल्पना माणसाला आपल्या कृतींची जबाबदारी स्वीकारायला शिकवते. माणसाला त्याच्या कर्माचे फळ मिळते; त्यामुळे प्रत्येकाने सत्कर्म केले पाहिजे, हा 'कर्मसिद्धान्त', ही कर्माशी घातलेली सुरेख सांगड माणसाची सद्सद्विवेक बुद्धी जागरूक ठेवते, त्याला जबाबदार आणि नीतिमान बनवते.
८. 'मोक्ष' - पापांपासून मुक्ती नाही, तर संसाराच्या चक्रातून मुक्ती
इतर धर्मांमध्ये प्रायश्चित्त किंवा ईश्वराच्या कृपेने 'पापांपासून मुक्ती' मिळणे हे ध्येय असते.
हिंदू धर्मात मानवी जीवनाचे अंतिम ध्येय 'मोक्ष' (मुक्ती) हे आहे. मोक्ष म्हणजे अज्ञानाचा नाश होऊन स्वतःच्या खऱ्या आत्मस्वरूपाची ओळख होणे आणि जन्म-मृत्युरूपी संसाराच्या चक्रातून मुक्त होणे. हा विचार बाह्य यशापेक्षा अंतर्मुखतेला आणि आत्मचिंतनाला जास्त महत्त्व देतो.
९. 'नास्तिक' असण्यालाही धर्मात स्थान (चार्वाक दर्शन)
बहुतेक धर्मांमध्ये ईश्वरावर किंवा एका ठराविक धर्माग्रंथावर विश्वास न ठेवणार्याला (नास्तिकाला) धर्माबाहेर किंवा अधर्मी मानले जाते. कोणत्याही स्वरूपात ईशनिंदा केली तर कठोर शिक्षा (हो, २१व्या शतकातही) केली जाते.
पण हिंदू धर्म नास्तिकांनाही सामावून घेतो. ईश्वराचे अस्तित्व नाकारणाऱ्या 'चार्वाक' सारख्या नास्तिक आणि भौतिकवादी विचारसरणींनाही आदरपूर्वक स्थान दिले गेले आहे. (आणि तेही हजारो वर्षांपूर्वीपासून!)
मतभिन्नता म्हणजे शत्रुत्व नव्हे; उलट प्रश्न विचारणे, चर्चा करणे आणि सत्याचा शोध घेणे हा हिंदू धार्मिक परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यामुळेच चार्वाकासारख्या भौतिकवादी विचारसरणीपासून सांख्य, योग, न्याय, वेदांत अशा विविध दर्शनांपर्यंत अनेक विचारप्रवाह विकसित झाले.
हे प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य, चिकित्सा करण्याची वृत्ती हिंदू धर्माला जडत्वापासून वाचवते, प्रवाही बनवते, लवचिक आणि सर्वसमावेशक बनवते.
१०. धर्म-प्रसार/धर्म-युद्धे नाही
हिंदू धर्मात धर्म-प्रसार ,किंबहुना धर्मांतरासाठी प्रचार /उद्युक्त करणे इत्यादी गोष्टींनां स्थान नाही. इतर प्रमुख धर्मात जी रक्तरंजित धर्मयुद्धे लढली गेली (व अजूनही या २१व्या शतकात घडत आहेत), तसे एकही युद्ध हिंदू धर्माच्या प्रसारासाठी (वा श्रेष्ठतेसाठी) झाले नाही. आणि जी काही युद्धे लढली गेली (बव्हंशी राज्य-विस्तारासाठी वा परकीय आक्रमणाला सामोरे जाताना )त्यातही हरलेल्या सैन्याची /प्रजेतील स्त्रिया /लहान मुले यांच्यावर कधीही आणि कोणत्याही प्रकारचे अत्याचार झाले नाहीत!
"मरणान्तानि वैराणि निर्वृत्तं नः प्रयोजनम्" - माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्यासोबतचे सर्व राग-लोभ आणि वैमनस्य संपले पाहिजे, शत्रूचेही अंतिम संस्कार योग्य रीतीने व्हावे, हीच आपली थोर संस्कृती आणि मानवतावादी शिकवण आहे.
११. तत्त्वज्ञान आणि ग्रंथांचा ठेवा
इतर धर्मांमध्ये एकच प्रमुख ग्रंथ असतो पण हिंदू धर्मात वेद , उपनिषदे, आरण्यके, श्रीमद्भगवद्गीता, रामायण, महाभारत, पुराणे ही अफाट ज्ञानसंपदा आहे.
जगातील सर्वात प्राचीन वाङ्मय मानले जाणारे वेद (ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद) आणि उपनिषदे यांमध्ये जीवन, निसर्ग आणि ब्रह्माचे गूढ ज्ञान सामावलेले आहे. रामायण व महाभारत हे नैतिकता व जीवनमूल्यांचे कालातीत मार्गदर्शक आहेत.
भगवद्गीतेतील कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग यांचा विचार केवळ धार्मिक संदर्भात न पाहता जीवनातील निर्णय, कर्तव्य, संघर्ष आणि आत्मसंयम यांच्याशी जोडून पाहता येतो. जीवनातील प्रत्येक संकटावर मात करणारे 'जीवन व्यवस्थापन तंत्र' शिकवते गीता!
संस्कृत मधील हा अफाट ज्ञान-खजिना सर्व-सामान्यांपर्यंत नेला समृद्ध आणि प्रदीर्ध काळ टिकलेल्या संत-परंपरेने! तुलसीदास, कबीर, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम इ. हजारो संतांनी आपल्या सुलभ, समृद्ध अभंगातून, साहित्यातून जनसामान्यांना हिंदू धर्मातील अमूल्य ठेवा उपलब्ध करून दिला.
ज्ञान केवळ विद्वानांच्या ग्रंथात बंदिस्त न राहता लोकभाषेत आणि लोकजीवनात उतरले, ही हिंदू धर्माची मोठी ताकद आहे. (इतर धर्मात जनसामान्यांच्या भाषेत सुलभ करून लिहिलेले एवढे मुबलक साहित्य आढळत नाही)
१२. मूर्तीपूजेचे शास्त्रीय व मानसशास्त्रीय समर्थन
काही धर्मांमध्ये मूर्तीपूजा पूर्णपणे निषिद्ध किंवा पाप मानली जाते.
हिंदू धर्मात मूर्ती ही थेट ईश्वर नसून, ईश्वराकडे लक्ष केंद्रित करण्याचे एक 'माध्यम' (Symbol/Focus point) मानली जाते. निराकार ईश्वराला साकार रूपात पाहून मनाची एकाग्रता साधण्यासाठी साकार पूजेला (साधनेला) मान्यता दिली आहे.
१३. कला, वास्तुशास्त्र आणि मंदिरे
स्थापत्यशास्त्र (Architecture): अजिंठा-,वेरूळची लेणी (वेरूळचे कैलास मंदिर जे एकाच अखंड खडकातून वरून खाली कोरले गेले आहे), तंजावरचे बृहदीश्वर मंदिर, चेन्नाकेशव मंदिर (बेलूर), मीनाक्षीपुरम , अंगकोर वाट (कंबोडिया) मधील विष्णू मंदिर, कोणार्क, हे प्राचीन हिंदू वास्तुकलेचे अद्भुत नमुने आहेत.
संगीत आणि नृत्य: भरतनाट्यम, कथक यांसारखे शास्त्रीय नृत्यप्रकार आणि सामवेदापासून उगम पावलेले शास्त्रीय संगीत या संस्कृतीचे सौंदर्य दाखवतात. कलात्मक समृद्धीचे दर्शन घडवतात.
१४. विज्ञान, गणित आणि खगोलशास्त्रातील योगदान
भारतीय ज्ञानपरंपरेचे योगदान तत्त्वज्ञानापुरते मर्यादित नाही. तर विज्ञान, गणित, खगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र यातही गौरवशाली योगदान आहे.
ब्रह्मगुप्ताने शून्याचा शोध लावला व ऋणसंख्या यांचे नियम दिले. दशमान पद्धतीचा (Decimal system) शोध प्राचीन भारतीय गणितज्ञांनी लावला, ज्याशिवाय आजचे आधुनिक संगणक आणि विज्ञान अपूर्ण राहिले असते.
आर्यभट्टानी त्रिकोणमिती, व बीजगणित मध्ये संशोधन केले. ग्रहगतीचे अचूक गणन. करून युरोपच्या खूप शतके आधी आर्यभट्टांनी पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते आणि गोल आहे हे सिद्ध केले होते.
महर्षी चरक (आयुर्वेदाचे जनक) आणि महर्षी सुश्रुत (जगातील पहिले प्लास्टिक सर्जन व शल्यचिकित्सक) यांनी वैद्यकशास्त्रात केलेले अमूल्य कार्य जगन्मान्य आहे.
१५. योग आणि ध्यान (Yoga & Meditation)
‘शरीर-मन-आत्म्याचे संतुलन’ याला इतर धर्मांमध्येही स्थान आहे पण योगासारखी प्रणाली नाही. महर्षी पतंजली यांनी 'योगसूत्र' द्वारे जगाला योगाची अमूल्य भेट दिली. ध्यानातून मन शांत करण्याचे आणि आत्मशोध घेण्याचे तंत्र जगाला शिकवले. शरीर, श्वास, मन आणि आत्मचिंतन यांचा समन्वय साधणारी योगपरंपरा आधुनिक जीवनातील ताणतणावाच्या काळात उपयुक्त ठरते. आयुर्वेदाने आहार, औषधोपचार आणि जीवनशैली यांचा परस्परसंबंध अधोरेखित केला.
योग आणि ध्यानाने आज जगभरात स्थान मिळवले आहे. साहजिकच आज संपूर्ण जग मानसिक शांतता आणि निरोगी आयुष्यासाठी २१ जून रोजी 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा करते.
समारोप
हिंदू धर्म हा केवळ एक धर्म नसून ती एक समृद्ध जीवनपद्धती आहे. हिंदू धर्म हा एखाद्या बंदिस्त चौकटीत बसणारा विचार नाही; तो प्रश्न विचारण्याची, शोध घेण्याची आणि स्वतःला सतत समृद्ध करण्याची परंपरा आहे. त्यात देवाच्या अनेक संकल्पना आहेत, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे सत्याच्या शोधाचे अनेक मार्ग आहेत. त्यात प्राचीन ग्रंथ आहेत, पण त्याचबरोबर नव्या विचारांना सामावून घेण्याची क्षमता आहे. त्यात अध्यात्म आहे, पण गणित, खगोलशास्त्र, वैद्यक, कला आणि योग यांसारख्या ज्ञानशाखांचाही समृद्ध वारसा आहे.
हिंदू धर्माचा अभिमान हा आंधळ्या गौरवात नसून त्यातील विचारस्वातंत्र्य, वैविध्य, आत्मचिंतन, निसर्गाशी सहजीवन, ज्ञानाची कास आणि ‘वसुधैव कुटुम्बकम्’सारख्या व्यापक मूल्यांमध्ये आहे. आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या वारशाचा खरा सन्मान म्हणजे तो जतन करणे, त्यातील चांगल्या मूल्यांना आचरणात आणणे आणि आवश्यक तेथे चिकित्सकपणे नव्याने विचार करणे हा ठरेल. काळानुसार विचारांची चिकित्सा, पुनर्व्याख्या आणि नव्या संदर्भांशी जुळवून घेण्याची क्षमता ही या परंपरेची महत्त्वाची ताकद आहे.
हजारो वर्षांचा हा वारसा पुढे नेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे भूतकाळाचा अभिमान, वर्तमानाची जाणीव आणि भविष्याकडे पाहणारी विवेकपूर्ण दृष्टी यांचा सुंदर संगम साधणे, हा ठरावा!
---------------------------------------------------------------------------------------
- प्रशांत पिंपळेकर.
No comments:
Post a Comment