Total Page-Views

Sunday, November 8, 2026

(कथा/Sci-Fi) निर्णय

वर्ष २०४०.

मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील (BKC) रस्ते एरवी गाड्यांच्या हॉर्नने आणि लोकांच्या धावपळीने गजबजलेले असायचे. एका काळी तिथे सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांची एकच लगबग असायची. मेट्रो स्थानकांपासून ते मोठमोठ्या बँकांच्या , बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कार्यालयांपर्यंत माणसांचा महापूर वाहायचा. कॅफे स्टॉल्समधील वर्दळ, टॅक्सींचे हॉर्न आणि उंच काचेच्या टॉवर्समध्ये चालणारी quarterly टार्गेट्ससाठीची स्पर्धा, नंतरच्या सेलेब्रेशन पार्ट्या यांनी हा परिसर सदैव जिवंत असायचा, उर्जेनं भारलेला वाटायचा!

 

पण सध्या तिथे एक विचित्र, सुन्न करणारी  स्मशान-शांतता होती. रस्त्यांवर वाहनांची वर्दळही उरली नव्हती, आणि फुटपाथवरून घाईघाईने पावले टाकत जाणाऱ्या नोकरदारांची पावले शांत झाली होती. ट्रॅफिक सिग्नल बंदच होते. काचेच्या टोलेजंग इमारती तशाच उभ्या होत्या, पण त्यांच्या आत (आणि बाहेर रस्त्यावरही) माणसांची सळसळ नव्हती. तंत्रज्ञानाच्या एका अफाट लाटेने मानवी संस्कृतीचे मुख्य केंद्र असलेले हे कॉर्पोरेट जग पूर्णपणे गिळंकृत केले होते. 'सिंथेटिक-X' नावाच्या क्वांटम AI ने जगातील ९० टक्के पांढरपेशा नोकऱ्या आणि ऑटोमेशनने उरलेले कष्टाचे काम संपविले होते.

 

हा बदल एका रात्रीत झाला नव्हता. मानवी समाजाला वाटले होते की तंत्रज्ञान फक्त त्यांना मदत करेल, पण ते त्यांच्या नोकऱ्या, काम संपवून टाकेल (व तेही एवढ्या लवकर) याची कल्पना कोणी केली नव्हती. गेल्या पाच वर्षांत 'सिंथेटिक-X' च्या नव्या अल्गोरिदमने कोडिंग, फायनान्स, डेटा अ‍ॅनालिसिस, कायदेशीर सल्ला, अगदी वैद्यकीय निदानापासून ते थेट रस्त्यावरील साफसफाई आणि ड्रायव्हिंगपर्यंतची सर्व कामे अचूकतेने ताब्यात घेतली होती. मानवी मेंदूच्या विश्लेषणात्मक क्षमतेपेक्षा लक्षावधी पटीने वेगवान असलेल्या या क्वांटम सिस्टीमने माणसाची जागा क्षणार्धात घेतली होती. ज्या थोड्या-फार मानवी चुका आधी व्हायच्या त्या पूर्णपणे नाहीशा झाल्या होत्या. कामातील अचूकता शंभर टक्के झाली होती आणि मानवी चुकांमुळे होणारे अपघात किंवा नुकसान आता इतिहास जमा झाले होते. जगातील उत्पादकता (Productivity) सर्वकालीन उच्चांकावर होती. भारतासहित बहुतांशी देशात अन्नाची, वस्तूंची किंवा विजेची अजिबात कमतरता नव्हती. जमिनीची मशागत करण्यापासून ते पीक कापणीपर्यंत आणि धान्याचे वाटप करण्यापर्यंत सर्व काही स्वयंचलित रोबोट्स करत होते. सरकारने प्रत्येक नागरिकाच्या खात्यात दरमहा 'युनिव्हर्सल बेसिक इन्कम’ (UBI) अंतर्गत पुरेशी रक्कम जमा करायला सुरुवात केली होती.

जीवनाच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी कोणालाही कष्ट करण्याची गरज उरली नव्हती. पोट भरण्यासाठी नोकरी करण्याचे , घाम गाळण्याचे दिवस संपले होते. पैशांची चिंता उरली नव्हती, डोक्यावर छत होते, बँक खात्यात पैसे वेळेवर जमा होत होते. 

परंतु माणसाला सर्व काही मिळूनही काहीतरी खूप मोठे गमावल्याची जाणीव होत होती. शहरावर एका अदृश्य, लांब होत चाललेल्या सावलीसारखे दुःखाचे मळभ पसरले होते. संपूर्ण मुंबई शहर, ते अथांग टॉवर्स आणि चकचकीत रस्ते एका सुन्न शांततेत बुडाले होते. भौतिक सुखाचा डोंगर उभा होता, पण मनाचे काय? आत्म्याचे काय? माणसाने बनवलेल्या यंत्रांनी माणसाला सुखी बनवण्याचे वचन दिले होते, पण माणसाच्या स्वाभिमानाची, आत्मप्रतिष्ठेची, आत्म्याची भूक भागवणे यंत्राला शक्य नव्हते. कारण माणसाला पोट भरण्याइतकीच स्वतःच्या 'असण्याला' काहीतरी अर्थ असण्याचीही नितांत गरज असते. केवळ जिवंत राहणे हा मानवी जीवनाचा उद्देश कधीच नव्हता. त्याला सकाळी उठून काहीतरी साध्य करायचे असते, कोणाला मदतीचा हात द्यायचा असतो, कोणासाठीतरी काहीतरी निर्माण करायचे असते, स्वतःच्या क्षमतेचा कस पाहायचा असतो आणि AI ने तीच गरज त्याच्याकडून हिरावून घेतली होती. जीवनातील सर्व संघर्ष, आव्हाने आणि यश मिळवण्याचा आनंद एका झटक्यात नष्ट झाला होता. माणसाला त्याच्याच अस्तित्वातून निष्प्रभ आणि निरुपयोगी करून टाकले होते. मानवी बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता आता केवळ भुतकाळातील गोष्ट झाली होती.

सकाळचे दहा वाजले होते. ४२ वर्षांचा अद्वैत त्याच्या आलिशान अपार्टमेंटच्या गॅलरीत उभा राहून खाली रिकाम्या रस्त्याकडे विमनस्क अवस्थेत पाहत होता. त्याच्या हातात धरलेला कॉफीचा कप हळूहळू थंड होत होता, पण त्याचे भानच त्याला नव्हते.

तो त्या रस्त्यांकडे पाहत नकळत भूतकाळात हरवून गेला. पूर्वी तो एका बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ डेटा अ‍ॅनालिस्ट होता. सकाळी सहाला उठणे, लोकल पकडणे, डेडलाईन्स पाळणे, टार्गेट्सचा पाठलाग करणे , मोठे डिल मिळवले की पार्टी करणे , प्रसंगी बॅासच्या ,क्लायंटच्या शिव्या खाणे... या सगळ्यांची त्याला आधी मजा वाटायची पण २-३ वर्षातच त्याला त्याचा उबग येऊ लागला होता. सततचे वाढते काम, उशिरापर्यंत चालणाऱ्या मिटिंग्स आणि क्लायंटचे फोन कॅाल्स यामुळे तो थकून जायचा. धावपळीचे ते आयुष्य त्याला एखाद्या चक्रव्यूहासारखे वाटायचे. रॅट-रेस वाटायची, ते ताणतणाव आणि त्या जीवघेण्या कॉर्पोरेट शर्यतीला कंटाळून, कधी एकदा यातून बाहेर येतोय आणि शांतपणे जगता येईल असं त्याला नेहमी वाटायचं. त्याला वाटायचे की एकदा का हे काम थांबले, की आयुष्यात खरा आनंद आणि शांतता लाभेल.

 

पण आज?…

 

आज त्याच्याकडे २४ तास मोकळा वेळ होता. कोणतेही टार्गेट नव्हते, कोणताही बॉस नव्हता आणि कसलीही डेडलाईन नव्हती. त्याला उठवणारा कोणताही अलार्म नव्हता आणि कुठल्याही मिटिंगला पोहोचण्याची घाई नव्हती. आणि हाच मोकळा वेळ त्याला आतून सारखा कुरतडत होता. मित्रांना भेटावसं वाटत नव्हतं. बरेचसे त्याच्यासारखेच वैफल्यग्रस्त होते. एकटा किती वेळ मॅालमधे जाणार वा किती दिवस sight-seeing साठी बाहेर पडणार? (आणि युनिव्हर्सल बेसिक इन्कम मधे ते बसवणं पण जरा अवघडच होतं). ज्या शांततेची तो एकेकाळी प्रार्थना करायचा, तीच शांतता आता त्याला गिळंकृत करू पाहत होती. एकाकीपणाची ती भयानक पोकळी त्याला गुदमरून टाकत होती जणू. घरातील प्रत्येक कोपरा त्याला त्याच्या निरुपयोगी असण्याची जाणीव करून देत होता.

 

"अद्वैत, तुझा ब्रेकफास्ट तयार आहे," स्मार्ट-ओव्हनमधून रोबोटिक आवाज आला. घराच्या कोपऱ्यात बसवलेल्या त्या अत्याधुनिक सिस्टीमने अद्वैतच्या शरीराचे तापमान आणि कॅलरीजची गरज तपासून तो नाश्ता तयार केला होता. तो आवाज नेहमीसारखाच कृत्रिम आणि भावनाहीन होता पण आज मात्र अद्वैतच्या अंगावर सर्रकन काटा आला!

कॅाफीचा मग हातात घेत त्याने झीटा ग्लासेस घातले. डोळ्यांवर ते स्मार्ट ग्लासेस बसवताच हवेतच डिजिटल बातम्यांचे व्हर्च्युअल स्क्रीन्स उघडले गेले. जगात काय चालले आहे हे पाहण्यासाठी त्याने बातम्या सुरू केल्या, पण बातम्यांमध्ये तीच तीच दृश्ये होती—

·       "आज पुन्हा एका ३० वर्षांच्या तरुणाने नैराश्यामुळे १५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली..."

·       "जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार, जगात ५० टक्क्यांहून अधिक लोक 'अस्तित्वाच्या नैराश्याने' (Existential Depression) ग्रस्त..."

·       "व्हर्च्युअल रिॲलिटी (VR) गेम्स आणि अमली पदार्थांच्या आहारी जाणाऱ्या तरुणांची संख्या प्रचंड वाढली..."

जगभरातून येणाऱ्या बातम्या मानवी संस्कृतीच्या वेगाने होणारा विनाश दाखवत होत्या. तरुण मुले प्रत्यक्षातील जग विसरून १२-१३ तास व्हीआर हेडसेट घालून आभासी जगात पडून राहत होती, किंवा मेंदूला कृत्रिम उत्तेजना देणाऱ्या रसायनांच्या आहारी जात होती. वृत्त निवेदिका अत्यंत शांतपणे, एका यांत्रिक आवाजात आकडेवारी सांगत होती.

 

अद्वैतने वैतागून झीटा ग्लासेस सोफ्यावर फेकून देत डोक्याला हात लावून बसला. त्याचे डोके दुखू लागले होते. माणसाला जगण्यासाठी केवळ अन्न नाही तर त्याजोडीला एक उद्देश / हेतू / कारण/ प्रयोजन (Purpose) लागतं. माणसाला उठून काहीतरी करायचे असते, कुठेतरी पोहचायचे असते.

भरपूर काम करून काही तरी मिळवायचंय, काही तरी नेत्रदीपक असं करायचंय, आपल्या कुटुंबियांकडून, सहकाऱ्यांकडून कौतुक ऐकायचंय, आपल्यातील क्षमतेला, बुद्धीला, उर्जेला पुरेपूर वापरायचंय, कस लावायचाय, एका वेगळ्या उर्मीनं धावायचंय, आकाशाला गवसणी घालण्याचा यत्न करायचा आहे, .... हे सगळं केंव्हाच थांबलंय! मानवी जीवनातील ती उत्कटता, तो उत्साह, आव्हानांवर मात केल्यानंतर मिळणारा तो असीम आनंद, या सर्व गोष्टी AI च्या आगमनाने कायमच्या हिरावून घेतल्या होत्या.

भूतकाळातील त्या अनोख्या दिवसांची आठवण येऊन अद्वैतचे मन व्याकुळ झाले. ते दिवस किती जिवंत होते, जेव्हा रात्री उशिरापर्यंत काम करून प्रोजेक्ट पूर्ण केला जायचा. कामाचा तो ताण, प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर मिळणारी ती शाबासकीची थाप, आणि समवयस्कांच्या डोळ्यांत दिसणारा आदर—हे सर्व आता एका काल्पनिक गोष्टीसारखे वाटत होते.

माणूस हा मुळात संघर्षातून घडणारा प्राणी आहे. निसर्गाशी, परिस्थितीशी आणि आव्हानांशी लढा देतच माणसाने आजवरचा विकास केला होता. आव्हाने नसतील तर त्याची बुद्धी गंजून जाते. Douglas McGregor ची थेअरी Y खुपश्या लोकांना लागू होते, हे आत्ता कळतंय! व्यवस्थापन शास्त्रात शिकलेली ती थेअरी आज त्याला प्रत्यक्ष अनुभवायला मिळत होती. मानवी स्वभाव हा स्वभावतः आळशी नसतो; योग्य वातावरण आणि उद्देश मिळाला की माणूस स्वयंप्रेरणेने आणि आव्हाने स्वीकारून काम करू इच्छितो, हेच थेअरी Y सांगते. माणसाला कामात आनंद मिळतो, जेव्हा त्याला त्यात स्वतःची क्षमता सिद्ध करता येते. पण जेव्हा आव्हानेच नष्ट होतात, तेव्हा मानवी मन स्वतःचाच नकळत विनाश करू लागते.

 

दिवस नुसता लोळून घालवायचा कंटाळा आलाय. निद्रानाश केंव्हाचा जडलाय. Screen time १८-२० तास होतोय, किती गाणी /चित्रपट /वेब सिरीज पाहणार? मनोरंजनसुद्धा एका मर्यादेनंतर त्रासदायक ठरू लागते. डिजिटल जगातील ते रंगीबेरंगी आभास आता डाचू लागले होते. ॲानलाईन चॅटिंग पण खुप कमी झालंय. लोकांकडे एकमेकांशी बोलण्यासारखे काही उरलेच नव्हते, कारण सगळ्यांचे आयुष्य एकाच साच्यात अडकले होते. सगळंच फोल वाटायलंय! एकटं जगायचा जीवघेणा कंटाळा आलाय.

 

त्याच्या मनात भुतकाळातील काही आठवणी परत तरळून गेल्या. आपले स्वतःचे असे कोणीतरी असावे, अशी इच्छा त्याच्या मनातही एकेकाळी होती. लग्नाळू वयात साथीदार शोधण्याचे कमी का प्रयत्न केले होते त्याने ? खूपशी लवचिकता पण दाखवली होती पण एकीने पण हो म्हटलं नाही! तो काळच असा होता की सामाजिक नात्यांची वीण पूर्णपणे उसवली होती. १०-१५ वर्षांपूर्वी Wokism / LGBTQ ची लाट आली होती, त्याचा परिणाम म्हणून straight मुलगा/मुलगी असणंच कमी झालं होतं! सामाजिक चौकटी इतक्या बदलल्या होत्या की पारंपारिक कौटुंबिक व्यवस्था ढासळून गेली होती. लोक कोणत्याही बांधीलकीत राहू इच्छित नव्हते. ज्या थोड्या फार straight मुली उरल्या होत्या त्या पण polyandry (बहुपतीत्व)चं उघड-उघड समर्थन करण्याऱ्या होत्या, तश्या राहत होत्या. अद्वैतला मात्र polygamy (बहुपत्नीत्व) / polyandry असलं काहीच पटत नव्हतं, त्याला एका निष्ठेच्या, प्रेमाच्या आणि कौटुंबिक जिव्हाळ्याच्या नात्याची गरज होती. जिथे दोन माणसे एकमेकांच्या सुखात आणि दुःखात एकत्र उभी राहतील, असे नाते त्याला हवे होते. पण या आधुनिक आणि अति-वैयक्तिक स्वातंत्र्याच्या जगात अशा विचारांना जुनाट मानले जात होते. त्यामुळे चाळीशीमध्येही तो एकलेपणाचा ओझं साहत होता. दुःखात सुख एवढंच म्हणायचं की असे लाखो तरुण-तरुणी (की प्रौढ / प्रौढा?) एकटं आयुष्य काढत होते. संपूर्ण पिढीच एकाकीपणाच्या अंधारात ढकलली गेली होती. बहुतेकांचे आई-वडील विभक्त झाले होते/ वृध्दाश्रमात राहत होते. कौटुंबिक बंध, भावना आणि आपुलकी या गोष्टी आधुनिक तंत्रज्ञानाच्या आणि अति-वैयक्तिक स्वातंत्र्याच्या बलिदानात भस्मसात् झाल्या होत्या.

 

गेली अडीच वर्षे तो अशी एकलपणात काढत होता. दिवस आणि रात्र यांच्यातील फरकच पुसला गेला होता. वैफल्यानं दिवसेंदिवस तो ग्रासला जात होता. या नैराश्यात त्याला ड्रग्सचं व्यसन लागलं होतं. मनातील ती सुन्न करणारी शांतता सहन होत नव्हती. डोक्यातील ती जीवघेणी शांतता घालवण्यासाठी, काही क्षणांच्या आभासी आनंदासाठी तो 'सिंथेटिक-डोपामिन'च्या गोळ्या आणि अमली पदार्थांची मदत घेऊ लागला होता. मनाचा निर्धार व rehabilitation या बळावर तो कसा-बसा बाहेर पडला होता सहा महिन्यांपूर्वी. पण नैराश्य / डिप्रेशन काही संपत नव्हतं. शरीर व्यसनमुक्त झाले होते, पण मन? दिवस उजाडला की बेड मधेच त्याला तोच यक्ष-प्रश्न सतावायचा, आज मी उठून काय करणार आहे ? कसा घालवू वेळ?? का जगायचं मी???

 

शेवटचा प्रश्न त्याला दिवसेंदिवस जास्तच भेडसावत होता. त्याला मधेच AI बद्दल, AI च्या data centers बद्दल, AI चे प्रणेते उद्योगपतींबद्दल, शासनाबद्दल खूप संताप यायचा. ज्या तंत्रज्ञानाने माणसाचे आयुष्य सुखकर करण्याचे वचन दिले होते, त्यानेच माणसाचे अस्तित्व निरर्थक करून टाकले होते. मानवी संस्कृतीचा आत्माच या सिस्टीमने मारून टाकला होता. तो त्याच्या काही अमेरिका, यूरोप मधील मित्रांच्या (जे बहुतांशी याच परिस्थितीतून जात होते) संपर्कात होता. त्यांच्या एन्क्रिप्टेड मेसेजिंग ग्रुप्सवर काही वेळा जळजळीत चर्चा चालायच्या. जगातील या तंत्रज्ञानाच्या राजवटीविरुद्ध काय करता येईल यावर ते विचार करत असत. Dark web वापरून, bio-chemical शस्त्र / man-made virus / हवेत बलून्सद्वारे विषारी वायू असलं काही तरी करून धडा शिकवायचा, असं काही जण बोलत होते. जगाला या तांत्रिक जोखडातून मुक्त करण्यासाठी काहीतरी विनाशकारी करण्याची त्यांची योजना होती. संपूर्ण जगाची सिस्टीम कोलमडवून टाकणे हाच एकमेव मार्ग आहे असे काहींना वाटत होते. पण त्याला त्यातील काहीच पटत नव्हतं! नाना विचारांचे भुंगे त्याचं मन मात्र कुरतडत होते..

…”निष्पाप लोकांना का मारायचं ? त्यांनी काय केलंय ? त्यांनी तर फक्त परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केलाय. त्यांचा काय दोष? मानवी अगतिकतेचा फायदा या सिस्टीमने घेतला आहे. त्यांचं जीवन हिरावून घेण्याचा काय अधिकार आहे मला? दुसऱ्यांचे प्राण घेऊन माझ्या अस्तित्वाला कोणता अर्थ मिळणार आहे? त्यापेक्षा माझ्या जगण्याबद्दलच आता निर्णय घ्याची वेळ आलीय! बस्स झालं या निराशेच्या गर्तेत रोज गटांगळ्या खाणं! रोज सकाळी उठून त्या निरर्थक शांततेचा सामना करणे आता असह्य होतंय. ..आणि मी नसल्याने कुणाला दुःख होणार आहे ? माझ्या जाण्याने या जगात काहीच बदलणार नाही, कोणाच्या डोळ्यात एक थेंबही पाणी येणार नाही!..”

 

मनात आत्महत्येचा विचार येताच एका क्षणासाठी तो थरथरला, थंड घाम आला. पण लगेच त्याच्यातील तार्किक आणि विश्लेषक मन जागे झाले..

 

“..पण मी जाऊन तरी हा प्रश्न सुटणार आहे का ? मी जर आज जीवन संपवले, तर ते या व्यवस्थेचे, या AI चे विजय असण्यासारखे होईल. मी या सिस्टीमसमोर गुडघे टेकले असे होईल. मी नष्ट झालो तरी 'सिंथेटिक-X' तसाच सुरू राहील आणि दर महिन्याला शेकडो तरुण असेच झुरून आयुष्य संपवतील. ही सिस्टीम अधिकच मजबूत होईल आणि मानवी अस्तित्व एका अर्थाने पूर्णपणे पुसले जाईल. मी पूर्णतः पळपुटा ठरलो, असं होईल नां? …पण कोण म्हणणार आहे मला पळपुटा? आणि समजा म्हटलं तर मला कुठे कळणार आहे ??”

 

मनाच्या एका कोपऱ्यातून पळपुटेपणाचा धिक्कार येत होता, तर दुसऱ्या कोपऱ्यातून उदासीनतेची भयानक संवेदना शरीर जणू गोठवून टाकत होती. विचारांच्या या प्रचंड संघर्षात त्याचे डोके फुटून जाण्याची वेळ आली होती. तो गॅलरीच्या कठड्यावर हात ठेवून उभा राहिला. वा-याची एक झुळूक पण येत नव्हती. सगळी सृष्टी पण जणू रुष्ट झालीय, असे वाटत होते. खाली रस्त्याकडे पाहताना विचार आला,

“पण जर मी असा नी तसाही मरणारच आहे एक दिवस, तर का नाही प्रयत्न करायचा AI वर मात करण्याचा ? ही यंत्रे माणसानेच बनवली आहेत, मग माणूस त्यांच्यासमोर इतका हतबल का व्हावा? मानवी बुद्धिमत्तेने तयार केलेले हे अल्गोरिदम माणसाच्या आत्म्यापेक्षा मोठे कसे होऊ शकतात? ..पण AI रूपी दुभत्या गाईला कोण मारेल ? सरकारला AI कडून अमाप कर मिळतोय, उद्योगपतींना अफाट नफा मिळतोय, आणि सामान्य जनतेला फुकटचा UBI मिळतोय. या दुभत्या गाईचे दूध सर्वांनाच हवे आहे, मग तिच्यावर कोण वार करेल? कोणालाच ही व्यवस्था बदलायची नाहीये, कारण प्रत्येकाला यात स्वतःचा स्वार्थ दिसतोय. खुपशी जनता आळसातही खूश आहे, सरकार कराच्या पैशात खूश आहे आणि उद्योगपती नफ्यात. अशा वेळी या सिस्टीमविरुद्ध उभे ठाकणे केवळ अशक्य आहे नां?”

 

अद्वैतने घरात येऊन येरझाऱ्या घालण्यास सुरुवात केली. विचारांची चक्रे परत फिरू लागली..

 

“पण का नाही मी एक चळवळ उभी करून शासनाला योग्य निर्णय घेण्यास भाग पाडेन ? लोकशाही अजूनही जिवंत आहे, मग मानवी अधिकारांसाठी आवाज का उठवू नये? पण काय सुचवावं शासनाला? की प्रत्येक कारखान्यात २० टक्के तरी काम AI कडून न करून घेता मानवाकडून करून घ्यावं? मानवी श्रमाला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली पाहिजे. उत्पादकता थोडी कमी झाली तरी चालेल, पण माणसाला त्याचे अस्तित्व आणि स्वाभिमान परत मिळाला पाहिजे!”

 

…पण लगेचच त्याच्यातील वास्तववादी माणूस परत त्याला वास्तवाची जाणीव करून देऊ लागला..

 

“ पण मी अशी चळवळ, संघटना कधी उभी केलीय? मी तर आयुष्यभर कॉम्प्युटर स्क्रीनसमोर बसून डेटा विश्लेषित करणारा एक साधा माणूस होतो. मी कधी भाषणे दिली नाहीत, कधी लोकांना एकत्र केले नाही. कुठे माझ्यात पंचविशीमधील ऊर्जा आहे? कुठे अशक्य ते शक्य करायला जाऊ? आजचा बहुतांशी समाज इतका सुन्न आणि आळशी झाला आहे की त्यांना UBI च्या मोहात लागून काम करण्याची सवयच उरलेली नाही. फुकट मिळणाऱ्या अन्नाची आणि पैशांची सवय झालेली ही माणसे रस्त्यावर उतरतील का? अशा लोकांना जागे करणे अशक्य आहे. त्यापेक्षा आपणच कायमची सुटका करून घ्यावी. दोन-तीन पर्याय शोधले आहेतच; त्यापैकी एक निवडावा!”

 

पुन्हा एकदा तो निराशेच्या अंधारात लोटला गेला. त्याने आपल्या टेबलच्या ड्रॉवरकडे पाहिले. तिथे एका विषारी रसायनाची बाटली ठेवली होती…पण अचानक नव्या विचारांनी उचल खाल्ली. त्याच्या आत दडलेला त्याचा स्वाभिमान, बंड करण्याची वृत्ती आणि जगण्याची इच्छा अचानक जागी झाली..

 

“पण मीच जगण्याचं प्रयोजन शोधत होतो ना? मग आता का कच खातोय ? मला जगण्यासाठी एक 'उद्देश' हवा होता. मग चळवळ उभी करणे, मानवी हक्कासाठी लढणे हाच माझा उद्देश का असू शकत नाही? पराभव पत्करून मरणे सोपे आहे, पण लढत मरणे यातच खरी मानवी प्रतिष्ठा आहे! जर मला मरायचंच आहे, तर मानवी अस्तित्वाच्या या लढाईत सैनिक म्हणून लढून का मरू नये? करू की सुरुवात आपल्या शहरापासून. जर सात-आठ महिने प्रयत्न केले तर १००० तरुणांचं संघटन / मोर्चा / राजधानीत सामूहिक उपोषण असं काही तरी नक्की जमेल.”

 

तो विचार त्याच्या मनात विजेसारखा चमकला. त्याच्या संपूर्ण शरीरात एक नवी ऊर्जा धावू लागली. १००० तरुण! जर त्याने बीकेसीतील, नरिमन पॉईंटमधील आणि आयटी पार्कमधील काही समविचारी निराश तरुणांना एकत्र करण्याचा प्रयत्न  केला, तर एक ठिणगी पडू शकत होती. आणि एका ठिणगीतूनच वणवा पेटतो! AI ने माणसाचे काम हिरावून घेतले असेल, पण मानवी जिद्द आणि भावना हिरावून घेणे कोणत्याही अल्गोरिदमला शक्य नाही. मानवी जिद्दीसमोर मोठमोठ्या सिस्टीम्स कोलमडून पडल्याचा इतिहास आहेच.

 

“काय करू मी? कोणता निर्णय घेऊ?”….

 

…मनाच्या अशा संभ्रमित अवस्थेत अद्वैत खूप वेळ बसून होता. खोलीतील अंधार हळूहळू ओसरत होता आणि उन्हाची एक तिरीप खिडकीतून आत येऊन त्याच्या तोंडावर पडली होती. कुठे तरी काही तरी क्लिक झालं होतं! तो एका नव्या चेतनेनं उठला. त्याच्या पावलांत आता एक नवा आत्मविश्वास होता. टेबलाच्या ड्रॅावरमधील ती छोटी बाटली त्याने डस्टबीनमधे फेकली व आयपॅड उघडला. आता त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती आणि अश्वस्त मंद स्मित!

 

..लढण्यासाठी!!

 

…जिंकण्यासाठी!!!

 

-------------------------------------------------------------------------

-प्रशांत पिंपळेकर

 

No comments:

Post a Comment