Total Page-Views

Friday, September 27, 2019

नेमेची येतो मग तोच मथळा!


सत्ताधारी पक्ष कोणताही असो; केंद्राचा रेल्वे-अर्थ-संकल्प झाला की दरवर्षीची ठरलेली बातमी असते, ‘महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली’!  (इतकी वर्षे पाने पुसून घेऊन त्या तोंडाचं काय झालं असेल :-? आणि रेल्वे-अर्थ-संकल्प जाहीर होण्याआधी पाच-सहा महिने lobbying करायला यांना का जमत नाही? ..पण तो वेगळाच विषय होईल) आणि हो, केंद्राचा अर्थ-संकल्प जाहीर केल्यानंतरच्या प्रतिक्रिया तर केवळ मनोरंजक असतात! एकच अर्थ-संकल्प, पण एवढ्या दोन टोकाच्या प्रतिक्रिया असतात ना, काही विचारूच नका! ‘देशाच्या सर्व घटकांचा विचार करणारं, सर्वांगीण विकास करणारं, पुरोगामी दृष्टिचं बजेट आहे’ असं एक ठामपणे म्हणत असतो (अर्थात सत्ताधारी) तर विरोधकाच्या मते तोच अर्थ-संकल्प ‘सर्वसामान्न्यावर घोर अन्याय करणारा, फक्त भांडवलदाराचं हित जपणारा अर्थ-संकल्प’ असतो!

लोकसभेच्या निवडणुका झाल्या की ठरलेली बातमी अशी असते, ‘सकाळी मतदान संथ गतीत चालू होतं, पण दुपारनंतर मतदानाने वेग घेतला. मतदानकेंदावर लांबचलांब रांगा दिसत होत्या. महिला पारंपारिक पोशाख घालून मतदानाचा हक्क उत्साहाने पार पाडायला आलेल्या दिसत होत्या.’ (नंतर मग दूरदर्शन बहुधा file picture दाखवणार, १०२ वर्षांच्या वृद्ध मातेस पाठीवर घेऊन आलेला ६० वर्षीय नातू!!)

एप्रिल महिना सुरु झाला की दैनिक सकाळची बातमी, ‘वाढत्या उष्म्याने पुणेकर हैराण’! एखादी अवकाळी पावसाची सर येऊन गेली की, ‘पुणेकर सुखावले’! जून सुरु होऊन हि पाऊस पडत नसला की बळीराजा आभाळाकडे चातकाप्रमाणे डोळे लाऊन वाट पाहणारा फोटो, खाली भेगाळलेली जमीन! (भेगाळलेली जमीन, खड्डे यावरून आठवलं, एका जिल्हास्तरीय वर्तमानपत्रानं चंद्राचा पृष्ठभाग म्हणून असाच एक खड्डे-युक्त गावाकडच्या रस्त्याचा फोटो पोस्ट केला होता म्हणे, असं माझा एक पत्रकार-मित्र हसून-हसून सांगायचा!) ‘फुले मंडईत मटारची प्रचंड आवक’ पासून ते ‘सवाई गंधर्व संगीत महोत्सवात गर्दी करणारे ‘रसिक पुणेकर’ बातम्यांत नेहमीच असतात. हिवाळा आला की रस्त्यावर शेकोटी पेटवलेला फोटो पाहिजेच! होळी, दहीहंडी आणि ३१ डिसेम्बर दिवशी ‘तरुणाई’ चा उल्लेख बातमीत पाहिजेच!

टीम-इंडियाच्या गेल्या विजयी दशकानंतर ‘भारताचा दारूण पराभव’ वगैरे बातम्या येणं मात्र आता थांबलेलं आहे! पण मी लहान असताना तर एक बातमी क्रीडा-विश्वात ठरलेली असायची, ‘रमेश कृष्णन उप-उपांत्य फेरीत’. दुसऱ्याच दिवशी बातमी असणार, ‘रमेश कृष्णनचे आव्हान संपुष्टात’! ..ती जागा आता सानिया मिर्झाने (एकेरीमधे तरी )घेतलेली आहे, असं दिसतंय J

तुम्हाला कोणत्या अशा  पुनरुक्ती-प्रत्यय देणाऱ्या बातम्या / मथळे / cliché  आठवतायत?  
अवश्य comments post करा!




चरैवेति, चरैवेति !


रांगतं मुल पाहताना भारी गंमत वाटते ना? काही महिन्यांनी ते बसु लागतं आणि काही महिन्यांनी कशातरी आधाराला धरून उठायचा प्रयत्न करू लागतं आणि एकदा पहिलं पाऊल टाकतं!

आई-वडिलांच्या आनंदाला पारावार उरत नसतो. आपण काही तरी फार भारी केलंय (ज्यामुळे माऊली जबरी खुष आहे) एवढंच त्या लहानग्याला नेमकं उमगतं आणि ते आणखी चालायचा प्रयत्न करू लागतं. आई-वडील आता धरू पाहत असतात, हातात/काखेत घेऊ पाहत असतात पण बाळाला आता आख्खं जग सापडल्याचा आनंद झालेला असतो! दुडक्या पावलानं किती चालू आणि किती नको, असं झालेलं असतं!

तेंव्हा त्या अजाण बालकाला यत्किंचितही कल्पना नसते की.. ....चालायला तर शिकलो पण ‘आपल्या पायावर उभं राहायला’ खूप काही शिकायचंय, आपली नेमकी वाट कोणती, हे आपणच शोधायचंय. अवघड वळणे ,चढ, खाच-खळगे, काटे-कुटे, उन्ह, वारा, पाऊस साऱ्यांना सामोरं जायचंय. कधी पडलं तर जोमानं परत उठायचंय आणि चालत राहायचंय, कधी चकवा लागेल, वाट चुकेल, कधी कोणी वाट चुकवेल, पुन्हा योग्य वाट शोधायचीय, साथ देणारे सोबती शोधायचेत व नव्या दमानं पावलं टाकायचीत. वर्षामागून वर्षे आणि दशकामागून दशके चालत राहायचंय, नं थकता, हसऱ्या चेहऱ्याने मार्ग-क्रमण करायचंय. चालण्यातला आनंद शोधायचाय, चालण्यातला आनंद उपभोगायचाय, सोबत्यांना तो आनंद वाटायचाय आणि पुनश्चः पाऊल पुढे टाकायचंय.. काही तरी नविन करायचंय!!


चरैवेति, चरैवेति!!!

Wednesday, September 4, 2019

वृक्षारोपण


आपल्या मुख्यमंत्र्यांचं वाखाणणीय अभियान काल वाचण्यात आलं. दोन कोटी झाडं एका दिवसात महाराष्ट्रभर लावण्यात आली! त्यासाठी शासकीय यंत्रणा सुत्रबद्धरीत्या राबविण्यात आली. खड्डे खणून घेतले होते; शासकीय अधिकारी झाडाचं रोपटं लावत होती. (फेसबुकवर पाहिलं हो!) ते पाहून माझं मन मात्र भूतकाळात गेलं!..१९७९-८० बहुधा!!

मी जिल्हा परिषद शाळा, तुळजापूरमध्ये सातवी-आठवी मध्ये शिकत होतो. वृक्षारोपणाचं महत्त्व आमच्या क.भ. प्रयाग सरांनी अस्खलित मराठीमध्ये एक तास बोलून सांगितलं. आम्ही पोरांनी सवयीप्रमाणे भरपूर टाळ्या पिटल्या. मग बोलायला उठले N.C.C. चे शेळके सर! आर्मीत कमांडर वगैरे म्हणून शोभतील अशी त्यांची personality होती. सर्वच मुलं (आणि मी तर फारच!) त्यांना घाबरून होतो. त्यांनी त्यांच्या करड्या शब्दामध्ये action plan सांगितला, अगदी मुलांनी खड्डे किती बाय किती खणायचे इथपर्यंत. सर्व मुलांना जागा (खड्डे कोथे खणायचे) allocate केल्या, deadline सांगितली आणि आम्ही मुलं जवानांसारखे सुटलोच mission वरती!
झालं, मी आपला कुदळ घेऊन भिडलो खड्डा खणायला! मला कुठे सवय (किंवा तेवढी शक्ती) खड्डा खणायला! थोडं खणलं तर एक जबरी मोठा दगड काही निघेना. मी घामाघूम. मग एका मित्राची मदत घेतली. पुन्हा चालू खड्डा खणण! अगदी टेप लावून मी मोजत होतो खड्ड्याची लांबी, रुंदी, उंची! (मी बिचारा एवढा भाबडा होतो की मला खरच वाटलेलं की सर परत खड्डा check करायला येणार! J) एकदाचा खड्डा झाला, मी काही तरी भारी achieve केल्याच्या भावनेनं रोप लावलं, पाणी घातलं! आणि मग चालू झालं त्या झाडाला रोज पाणी घालणं, प्रेमानं बघणं! एक-दोन महिने केलं हे मी. नंतर बहुधा परीक्षा आली, सुट्ट्या लागल्या आणि मी विसरून गेलो. शाळा सुरु झाल्यानंतर येऊन पाहतो तर काय, रोप बहुधा शेळीने खाल्लं असावं! मला फार वाईट वाटलं होतं!

पण ही झाडं / फुलझाडं लावायची आवड मी घरीही जोपासत होतो. आमच्या परसामध्ये माझे नाना प्रयोग चालायचे. कधी गाजर लाऊन बघ, कधी कांदा, बटाटा, कधी कोथिंबीर, पानफुटी तर कधी गुलबक्षी! गुलाब आणि मोगरा होतेच. अंकुर फुटताना, कोवळी पानं पाहताना फार आवडायचं मला!
पुढे पुण्यात आलो, लग्न झालं, घर घेतलं आणि बागकामाची आवड परत उफाळून आली! घराच्या compound-wall नजीकची आणि घरातील बाग मोठ्या कष्टानी मी व बायकोने केली, जोपासाली. मी सौंदर्यवादी तर बायको उपयुक्ततावादी! त्यामुळे बागेत सुंदर दिसणारी फुलझाडं आणि केळी, पपई, डाळिंब अशी बरीच झाडं लावण्यात आली. दरवर्षी बरोबर मे महिन्यात फुलणारं Mayflower, प्रसन्न शेंदरी रंगांची फुलं देणांरा exora, pentas, जुलै-August मध्ये रात्री फुलणारं अनोखं ब्रह्मकमळ, रातराणी, गुलाब, मोगरा आणि बरेच काही! मागच्या दोन-तीन वर्षापासून पाऊसाने ओढ दिली. पण बायकोने drip-irrigation plan करून प्रेमाने झाडं, बाग जगवली.ती हिरवाई,रंगीबेरंगी फुलं, फुलपाखरं आणि नानाविध पक्षी पाहिले की सगळा थकवा, शीण जातो. मन प्रसन्न होतं, टवटवीत होतं..

(...आणि मग कविता होते! J)

संडे मिसळ (2014)


राजा – परधानजी, कसा आहे राज्याचा हाल-हवाल?

प्रधान – २० माणसे चेंगराचेंगरीत गेली, दरीत बस पडून ३० माणसे गेली , पण अशा किरकोळ घटना वगळता, ‘आल इस वेल’ बघा सरकार!

राजा – बडे-बडे राज्योमे ऐसी छोटी-छोटीबाते तो होती रहती है ना! पन आपल्याला तुमचं सकारात्मक बोलणं लय आवडतंय! बरं, आपली नवी घोषना म्हाईत हाये का? “गाव तितं इद्यापीठ”!!!

प्रधान – गाव तिथे विद्यापीठ? पण सरकार, अजून आपली “गाव तिथे पाणवठा” योजना चालूच आहे!

राजा – अवो, आता आपुन बाविसाव्या शतकाकड वाटचाल करतोय.  समदी बिस्लेरी पाणी पित्यात; कसला आलाय पाणवठा न काय? आपल्याला शिक्शणाचं फ्याक्ट्री मॉडेल काढायचंय बघा!

प्रधान  - ते कसं राजे?

राजा -  तुमी अगदीच कशे वो मंद आमच्या युवराजासारखे?आता बघा, गाव तितं इद्यापीठ, म्हंजी काय हुनार, मास्तरांची फौज लागणार, रोजगार वाडणार!! पोरगा केजी मधे घातला कि पीजी करूनच बाहेर पडला पाहिजे त्याच इमारतीमधून! गावा-गावात शिक्शन-महर्षी घडले पाईजे!

प्रधान – आपली दूरदृष्टी प्रशंसनीय आहे हुजूर!

राजा -  तसलं अवगड नका बोलू! नुसतं “सुपर-लाईक” म्हना!! आनी, या योजनेमुळे आणखी  एक मोठा प्रॉब्लेम सुटणार हाये. आपल्याकडची तमाम संत-वीरपुरुष-महापुरुष यांचं नेहमी स्मरन व्हावं म्हणून त्या सामद्यांची नावं द्यायची या इद्यापिठाना! आधी  एक नावं द्यायचं अन  मग वर्षांनी नाम-विस्तार करायचा! म्हंजी डब्बल चान्स, सगळे कव्हर व्हायला पाहिजेत! कसं?

प्रधान – अगदी खरं बोललात राजे! मी फाईल घेऊन येतोच तुमच्या सहीसाठी!


(05/01/14)

जीवन गाणे…!


बराच लहान असेन मी.. म्हणजे -१० वर्षांचा वगैरे. घरी कोणी तरी रागावलं होतं आणि स्वारी तणतणतजरा मित्राकडे जाऊन येतो गं आईम्हणत बाहेर पडली. मनात रागाचा नुसता हल-कल्लोळ माजलेला.. काय करावं सुचत नव्हतं.. चालतोय आपला झपाझप लहानगी पावलं टाकत! छोट्याशा गावातले S.T. Stand पार केले (त्या काळात S.T. stand म्हणजे गावाची हद्द संपायची!), पहिला नाका पार केला, विचारांच्या नादात एक मोठा पुल पार केला, आजु-बाजुला पाहतोय.. रस्त्याच्या दुतर्फा उंच उंच झाडे, जवळच लहडलेली हिरवी राने. हुंदडणारी वासरे..मागे पळणारी छोटी-छोटी मुलं.. हळु-हळु राग कोठल्याकोठे वितळुन गेला! मन उगाचच प्रफुल्लीत वगैरे झाले. वाटलं, आपलंच चुकलं वागायला! .. आणि निघालो परत गुणगुणत घराच्या वाटेवर!

त्या छोट्याशा गावात आम्हा लहानग्या मित्रांचा एक ग्रुप रोज फिरायला जात असे. वयं वाढली, तसे गप्पांचे विषयही बदलु लागले:-) बदलले नाही ते रोज गावाबाहेर फिरायला जाणे! पुढे कराडला शिकत असताना फिरायला जाण्याला एक वेगळेच रुप मिळाले. 'city में रहा है क्या'? अशी विचारणा व्हायची आणि दहा-बरा जणांचा मोठा ग्रुप बसने जायचा. मग चावडी चौक, संगम (आणि तिथली भेळ) असं बरंच काही व्हायचं.


पुढे नोकरीनिमित्त आमचा ग्रुप पुण्याला आला. office संपल्यानंतर (खरं तर आम्ही कंपनी सुटल्यानंतर, असं म्हणत असु तेंव्हा) आमचा छोटा ग्रुप फिरायला म्हणुन नळस्टॉप पर्यंत जायचा; कधी-कधी तर पार डेक्कनपर्यंत! (हो, बाईक वगैरे घ्यायला अवकाश होता) पण फिरण्यातला आनंद मात्र मात्र कायम होता!

यथावकाश सगळ्यांकडेच बाईक्स आल्या (बजाज सुपर/कावासाकी/काईनेटिक .), कालांतराने चार-चाकी ही आल्या, सगळ्या मित्रांची लग्ने झाली, काही जण परदेशी गेले, .. ग्रुप केंव्हाच संपला होता! भारतात परतल्यानंतर मग email, mobileने थोडा-थोडा संपर्क असायचा. एखाद-दुसरं get-together ही arrange करुन झालं! पण आता तो जिव्हाळा राहिला नव्हता, तेंव्हा गप्पा मारता-मारता नळ-स्टॉप कधी आला कळायचं नाही, आता get-together साठी एकत्र जमलं तरी प्रत्येक-जण उगाचच आपल्या घड्याळाकडे बघत असतो!


...
प्रचंड वाहतुकीने ओसंडुन वाहणारा कर्वे रोड, चार पावले टाकायलाही मुश्कील व्हावी अशी बेसुमार गर्दी, पुण्याच्या चार टोकाला पांगलेली मित्रं ( त्यांच्याआता-कोणत्या-मित्राला-भेटायचं-एव्हढं-अडलंय?’ म्हणणार्या मंडळी), टीव्हीला आणि चार-चाकीला चटावलेली शरीरं! आता फिरायला जाण्याचं कोणी नावही घेत नाही! (‘It is so out-dated, you know!’ ..एक मित्र उद्गारला होता!)


...
मी मात्र अजुनही रागाच्या तिरिमीरीत अधनं-मधनं घराबाहेर पडत असतोच! ... आणि लांब-लांब ढांगा टाकत, यथावकाश थंड होत, एखादं गाणं गुणगुणत घराकडे परतत असतो :-) 


(2006)