Total Page-Views

Wednesday, September 4, 2019

जीवन गाणे…!


बराच लहान असेन मी.. म्हणजे -१० वर्षांचा वगैरे. घरी कोणी तरी रागावलं होतं आणि स्वारी तणतणतजरा मित्राकडे जाऊन येतो गं आईम्हणत बाहेर पडली. मनात रागाचा नुसता हल-कल्लोळ माजलेला.. काय करावं सुचत नव्हतं.. चालतोय आपला झपाझप लहानगी पावलं टाकत! छोट्याशा गावातले S.T. Stand पार केले (त्या काळात S.T. stand म्हणजे गावाची हद्द संपायची!), पहिला नाका पार केला, विचारांच्या नादात एक मोठा पुल पार केला, आजु-बाजुला पाहतोय.. रस्त्याच्या दुतर्फा उंच उंच झाडे, जवळच लहडलेली हिरवी राने. हुंदडणारी वासरे..मागे पळणारी छोटी-छोटी मुलं.. हळु-हळु राग कोठल्याकोठे वितळुन गेला! मन उगाचच प्रफुल्लीत वगैरे झाले. वाटलं, आपलंच चुकलं वागायला! .. आणि निघालो परत गुणगुणत घराच्या वाटेवर!

त्या छोट्याशा गावात आम्हा लहानग्या मित्रांचा एक ग्रुप रोज फिरायला जात असे. वयं वाढली, तसे गप्पांचे विषयही बदलु लागले:-) बदलले नाही ते रोज गावाबाहेर फिरायला जाणे! पुढे कराडला शिकत असताना फिरायला जाण्याला एक वेगळेच रुप मिळाले. 'city में रहा है क्या'? अशी विचारणा व्हायची आणि दहा-बरा जणांचा मोठा ग्रुप बसने जायचा. मग चावडी चौक, संगम (आणि तिथली भेळ) असं बरंच काही व्हायचं.


पुढे नोकरीनिमित्त आमचा ग्रुप पुण्याला आला. office संपल्यानंतर (खरं तर आम्ही कंपनी सुटल्यानंतर, असं म्हणत असु तेंव्हा) आमचा छोटा ग्रुप फिरायला म्हणुन नळस्टॉप पर्यंत जायचा; कधी-कधी तर पार डेक्कनपर्यंत! (हो, बाईक वगैरे घ्यायला अवकाश होता) पण फिरण्यातला आनंद मात्र मात्र कायम होता!

यथावकाश सगळ्यांकडेच बाईक्स आल्या (बजाज सुपर/कावासाकी/काईनेटिक .), कालांतराने चार-चाकी ही आल्या, सगळ्या मित्रांची लग्ने झाली, काही जण परदेशी गेले, .. ग्रुप केंव्हाच संपला होता! भारतात परतल्यानंतर मग email, mobileने थोडा-थोडा संपर्क असायचा. एखाद-दुसरं get-together ही arrange करुन झालं! पण आता तो जिव्हाळा राहिला नव्हता, तेंव्हा गप्पा मारता-मारता नळ-स्टॉप कधी आला कळायचं नाही, आता get-together साठी एकत्र जमलं तरी प्रत्येक-जण उगाचच आपल्या घड्याळाकडे बघत असतो!


...
प्रचंड वाहतुकीने ओसंडुन वाहणारा कर्वे रोड, चार पावले टाकायलाही मुश्कील व्हावी अशी बेसुमार गर्दी, पुण्याच्या चार टोकाला पांगलेली मित्रं ( त्यांच्याआता-कोणत्या-मित्राला-भेटायचं-एव्हढं-अडलंय?’ म्हणणार्या मंडळी), टीव्हीला आणि चार-चाकीला चटावलेली शरीरं! आता फिरायला जाण्याचं कोणी नावही घेत नाही! (‘It is so out-dated, you know!’ ..एक मित्र उद्गारला होता!)


...
मी मात्र अजुनही रागाच्या तिरिमीरीत अधनं-मधनं घराबाहेर पडत असतोच! ... आणि लांब-लांब ढांगा टाकत, यथावकाश थंड होत, एखादं गाणं गुणगुणत घराकडे परतत असतो :-) 


(2006)

No comments:

Post a Comment