Total Page-Views

Tuesday, October 25, 2016

श्रावण (दशपदी)


मेघांची किनखाप निळी-जांभळी-काळी

उभा ध्यानस्थ कसा धवल बक तो जळी

कुठे शीतल वाऱ्याने शहारे मुग्ध कळी

गोकुळचा अवखळ गोऱ्हा हुंदडे तरुतळी

अन तिकडे मयुराची नृत्य-मुद्रा ती आगळी

श्यामल वसुधेची हिरवीकंच  चोळी,

केशरी उन्ह-पावसात होई थोडी ओली

गाली गुलबक्षी-किरमिजी ढगांची लाली

अन कधी सप्तरंगी इंद्रधनू हार नवा ल्याली!

..बेटातून वेळूच्या, सावळ्याची शीळ मग आली!!



-
प्रशांत



गीत-महाभारत

                                                                                                        
गीत-महाभारत (१)



पाहसी वंदनीय पितामह भीष्म समरांगणी
अतुल्य गुरु-द्वयी कृपाचार्य-द्रोण हि रणी

रथी मातुल शल्य, शकुनी, तयांस वंदू
दुर्योधन, दु:शासन आणि कैक मम बंधू

कोवळा लक्ष्मण पुत्रागणिक तो मज
अन अश्वत्थामा तो बंधूगणिक मज

सर्व माझे आप्त, सर्व माझे स्वकीय जरी
कैसे मी शर- संधान करावे तयांवरी

मारण्या तयांना का मी रोखू तीर त्यांच्यावरी
वधून तयांना का मी घ्यावे घोर पाप हे शिरी

मारून तयांना नको मज ते राज्यसुख
कुलसंहार करूनी दाखवू कोणास मुख

गात्रे गलीत, कोरडे पडे मुख अन वाराही स्तब्ध
काय योजिले योगेश्वरा, कैसे हे अगम्य प्रारब्ध,

सांग कृष्णा, किम कारणेन करावे मी हे युद्ध?
सांग कृष्णा, किम कारणेन करावे मी हे युद्ध??



                                                                                                    -प्रशांत








घुसमट

जन्माला येणारा प्रत्येक मानव
निसर्ग-दत्त नग्नच असतो,
पण लगेच त्याला धर्माचं झबलं,
अन जातीचं टोपडं घालतात,
मोठं होताना तो पण मग
हौसेनं काही रूढी, काही परंपरांची
वस्त्रे परिधान करु पाहतो,
गर्वानं मिरवू लागतो!
वर्षागणिक समाज, पुढारी धर्मगुरू
अंधश्रद्धेची, धर्मांधतेची वस्त्रं
लपेटू लागतात त्याच्यावर!
केंव्हातरी त्या वेड्याला कळतं,
आपला जीव का गुदमरतोय,
मोकळा श्वास घेण्यासाठी मग तो
धडपडू लागतो, आक्रंदू पाहतो,
हजारो प्रारणं, आवरणं फाडू पाहतो
... ....  ...  .. ..  ....  .....
पण तोवर फार उशीर झालेला असतो,
.............फार उशीर झालेला असतो!





-          प्रशांत (०९/०५/१५

आकाशवाणी ...आठवणी

रेडिओ घरी येण्याच्या आधी ‘आकरा वाजले’ हे घड्याळ न पाहता मला लहानपणी कळायचं जेंव्हा कामगारसभेचं सुरुवातीचं ते वैशिष्ट्यपूर्ण संगीत कानावर पडायचं शेजारच्या घरातील रेडिओमधून! (खूप वर्षांनी मी कमिन्स कंपनीमध्ये कामगारांना अकरा वाजता कामगारसभा ऐकताना पाहिलं आणि जरा आश्चर्यच वाटलं होतं!)
मी सातवी-आठवीला असताना रेडिओ घरी आला. एक-दोन आठवडे लागले बहुधा रेडिओ स्टेशन्स, कार्यक्रमांच्या वेळा वगैरे कळायला  आणि अल्पावधीतच सगळ्याचाच लाडका बनला रेडिओ!
सकाळी सहाची पहिली धून, मग अभंग-वाणी, संस्कृत बातम्या (प्रवाचक- मंगला कवठेकर अथवा बलदेवानंद सागर!) आणि मग सातच्या बातम्या! “आकाशवाणी पुणे, सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहे”,... या खणखणीत आवाजानेच मी खूप वेळा झोपेतून जागा झालो आहे! नंतर वडील रत्नमाला (कि दुसरा कोणता तरी) हा जुन्या गाण्यांचा कार्यक्रम लावायचे. मला फार राग यायचा तेंव्हा. एक गाणं ओळखीचं नसायचं! शेवटचं गाणं सैगलचं असणार! आठला आपही के गीत हा नव्या हिंदी गाण्याचा कार्यक्रम असायचा. आठ-चाळीसला चित्रपट संगीत आणि नऊ-दहाला शालेय कार्यक्रम! आणि मग शाळेला निघायचं!!
बुधवारच्या बिनाकाबद्दल मंगळवार-पासूनच सर्व घोकायचे (म्हणजे कॉलेजमधले भाऊ-बहिण). रविवारी तर चंगळ असायची. एका-मागे एक ‘आपली आवड’ ऐकायची! मला वाटतं, साडे-दहाला सांगलीवर असणार, मग अकरा कामगार-सभा,बाराला पुण्याची आपली आवड, साडे-बाराला ‘औरंगाबाद-परभणी’. मग जळगाव. दुपारी अडीचला मनोरंजन गीत, तीनला जयमाला.वडील आठच्या मराठी बातम्या (नंदकुमार कारखानीस, सदाशिव दीक्षित, आशा कर्दळे) , साडे-आठला स्पॉट-लाईट व नऊच्या इंग्रजी बातम्या (बहुधा Rasika Ratnam. मला ओ की ठो कळायचं नाही!)ऐकायचे. साडे-नऊला ‘नभो-नाट्य’ लावण्याची फर्माईश आईची असायची! थोडं मोठं झाल्यानंतर ‘बेला के फुल’ हा जुन्या हिंदी गाण्याचा कार्यक्रम ऐकू लागलो. त्याचं वेळेला ‘तामिली-ए-इर्शाद’ नावाचा पण जुन्या हिंदी गाण्याचा कार्यक्रम असायचा कोठे तरी. शेवटचं गाणी ऐकून साडे-आकराला झोपायचा दिनक्रम मी बऱ्याच वेळा केला आहे!  (आत्ता इतक्या वर्षांनी लिहिताना मला जाणवलं की मग अभ्यासाला वेळ केंव्हा दिला मी :-?)

आकाशवाणीची आणखी एक गंमत म्हणजे गाणी ऐकून सध्या ऋतू कोणता असेल (किंवा बाहेरचं तापमान  किती असेल)हे कळायचं!  खोटं वाटतंय? ‘वेळ झाली, भर माधान्य, माथ्यावर टळते उन्ह’ हे गाणं दुपारी बाराच्या आसपासच लागायचं! ‘आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेटवा’ कानावर पडलं की ओळखायचं हिवाळा सुरु झालाय! ‘आला-आला वारा, संगे पावसाच्या धारा’ ऐकलं की समजावं, श्रावण आला आहे! J

पुढे मी पुण्याला आलो आणि कळलं की पुणे विविध-भारतीवर दिवसभर गाणी असतात! आणि पुणेकरांचा थोडा हेवाच वाटला! J
नक्की वर्ष आठवत नाही. पण बहुधा नव्वदीच्या आरंभास टीव्ही आम माणसाच्या घरी घुसला आणि रेडिओ म्हणता-म्हणता अडगळीत गेला! एका दशकापेक्षा जास्त काळ रेडिओ हे माध्यम कोणाच्याच खिजगणतीत नव्हतं! मग FM आलं आणि रेडिओला पुन्हा संजीवनी मिळाली. तरीही आता अगदी FM देखील फार कमी जण ऐकत असतील घरी! कार driving करताना जेवढं कानावर पडतं तेवढंच! असो!!

कालाय तस्मै नम: !!



-          प्रशांत 

काळ

पारा उडून गेलेल्या
बिलोरी दर्पणी ती
कैक दशकांपूर्वीची तारका
आठवतेय स्वतःला..

केसांच्या सदोदित ओढाळ बटा,
नितळ कांती, जीवघेणी अदा,
मादक आवाज, दाहक कटाक्ष
रसिक व्हायचे कायमचे फिदा!

.. ... ... ..  .. .. ..
.. .. .. .. .. ..  .. .

आता सुरकुत्यांच्या उभ्या-आडव्या रेघा,
पांढऱ्या केसांचं नकोसं ते जंजाळ,
कापरा जाडा-भरडा आवाज अन
भिंगांच्या डोळ्याखालची काळी वर्तुळं!


..संतापाच्या तिरीमिरीत होतात
सहस्त्र तुकडे त्या दर्पणाचे,
विखुरलेल्या तुकडयागणिक ती
शोधतेय तारुण्य, हरवलेलं,
...तारूण्य हरवलेलं!!!


-    प्रशांत



अरे कुठे नेऊन ठेवलीय माझी मराठी!

काही महिन्यापूर्वी सोलापूरला जाण्याचा योग आला. हडपसरच्या आसपास विजेच्या प्रत्येक खांबावर पोस्टर्स होते, एक शब्द खटकत होता, ‘प्रतिष्ठाण’! जवळपास पन्नास-एक पोस्टर्स पाहिली ...आणि मलाही वाटू लागलं, आपलंच चुकतंय बहुतेक! प्रतिष्ठाणच असेल J

मला वाटतं सुज्ञांना नक्की कळलं असेल मी काय म्हणतोय ते. एखादी गोष्ट, चुकीची का असेना, जर सारखी कानावर आदळत राहिली तर कालांतराने आपल्याला ती बरोबर वाटू लागते. तेच होतंय सध्या. मी एक उदाहरण दिलं, अशा असंख्य चुका आजकाल पदोपदी आढळतात. दुसरी एक वेगळीच तऱ्हा; वर्तमानपत्र उघडा, बातमी असते , “मंत्र्यांना क्लीन चीट दिली’ ! दुसरी बातमी असते, ‘कल्याणमध्ये कांटे की टक्कर’! कल्याण आहे हो मराठीचं! अहो, मराठी पेपर आहे, मराठी प्रती-शब्द वापरा नां! बरे ते तर पुण्यातलं अग्रणी वर्तमानपत्र, बाकीच्यांचं तर काही बोलूच नये. अशुध्दतेचा महापूर आणि इंग्रजी-हिंदीची सरमिसळ नुसती!!

टिव्हीवर आणखी कहर असतो. सध्या चालू असलेल्या मालिकेमधल्या मराठीचा हा एक नमुना बघा, नायक नायिकेला म्हणतो, “Relationship चा base transparency हवा! .. वावा!! फक्त विभक्ती प्रत्यय आणि क्रियापद मराठी, बाकी सगळं इंग्रजी! “अमृताते पैजाजिंकू पाहणाऱ्या माझ्या मराठीची ही अवस्था!! अरे, काय चाललंय काय? मी काही अगदी सावरकरी मराठी (अग्नीरथपथ आगमनसूचक हरितपट्टिका इ. ! ) वापरा असं म्हणत नाही, पण जिथे शक्य आहे तिथे योग्य मराठी शब्द वापरा नां! पत्ता विचारताना मी खुपदा असं काहीतरी ऐकतो, “थोडं पुढे गेलंकी एक शॉप भेटेल,तेथे लेफ्ट घ्या’. “भेटेलकाय?? (ती काय मोदी-उद्धवची भेट आहे :-?) दुकान दिसेल असं म्हणा ना! बरं, उकार पहिला की दुसरा, वेलांटी पहिली की दुसरी वगैरे लांबचं झालं, पण श आणि ष मधील फरक आजच्या पिढीतील किती जणांना माहित आहे? भाषा दहा मैलावर बदलते, गावागावाचा बोलण्याचा हेल वेगळा असतो, हे सगळं मला मान्य आहे, पण काही ठिकाणी आपण तडजोड करता कामा नये. शब्द योग्य जागी, योग्य रीतीनेच वापरले गेले पाहिजेत.

आणि हो, मराठी कोणा एका शहराची (किंवा एखाद्या समूहाची) मक्तेदारी वगैरे नाही आणि कधीच नव्हती! आणि असा वृथा आरोप कोणी केलाच तर त्या बापड्यास संत तुकाराम, संत नामदेव, जनाबाई पासून ते बहिणाबाई, आणि भालचंद्र नेमाडे, शिवाजी सावंत, शिवाजीराव भोसले, आनंद यादव, शांता शेळके, महानोर, सरोजिनी बाबर, विश्वास पाटील, जगदीश खेबुडकर, सदानंद मोरे, प्रवीण दवणे, उत्तम कांबळे इ. शेकडो साहित्यिकांचं सकस आणि सुंदर साहित्य बिलकुल माहिती नसावं!

जागतिकीकरणाच्या वाढत्या रेट्यामुळे नोकरी असो वा व्यवसाय, इंग्रजीचे उत्तम ज्ञान गेल्या काही दशकापासून अनिवार्य झालंय, आणि ते सर्वांनी मिळवावच या मताचा मी आहे. पण ते करताना मराठीची कास सुटू नये. (मावशी खूपच श्रीमंत असली तरी आपली आई आपल्याला प्राणप्रिय असतेच नां?) मातृभाषेकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी आपल्या पिढीने घेतली पाहिजे. आणि ते अवघड बिलकुल नाही. मराठी मित्रांशी बोलताना तरी शुद्ध मराठी बोला, मराठी-हिंदी-इंग्रजीची उगीच भाव मारायचा म्हणून सरमिसळ करू नका, भाजीवाल्याशी/विक्रेत्यांशी/किराणा दुकानदाराशी मराठीमध्ये बोला (उगीच मोडकं-तोडकं हिंदी झाडू नका; त्यांना मराठी चांगलं कळत असतंJ) , आपल्या मुलांशी शुद्ध मराठीमध्ये बोला, तुमच्या बोलण्यात वाक्प्रचार, म्हणींचा वापर करा, नकळत शिकवलेलं मुलांच्या मनावर चांगलच ठसतं! वर्षाकाठी चार-पाच तरी मराठी पुस्तकं विकत घ्या, दिसामाजी नाही, तर किमान महिनाकाठी काहीतरी पांढऱ्यावर काळे (मराठीमध्ये J) करण्याची सवय बाळगा, मुलांना तुमचं लिहिलेलं वाचायला द्या, चांगली मराठी नाटकं/चित्रपट दाखवा, त्यांना बरोबर मराठीची गोडी लागेल! त्यांना पण मराठी लिहीण्याला उद्युक्त करा, त्यांना प्रोत्साहन द्या. तुमच्या स्मार्ट-फोनवर मराठी लिहिण्यासाठी मराठी कि-बोर्ड वापरा.

आणि हो, हे सगळं सुरु करायला मराठी-दिनाची अथवा नामदार फडणवीसांच्या किंवा साहित्यमंडळाच्या एखाद्या सरकारी उपक्रमाची वाट कशाला पाहायची? शुभस्य शीघ्रम! पटतंय नां?? (आणि हो, मराठीमध्येच भाष्य करा हं या लेखावर J)


-          प्रशांत