रेडिओ घरी येण्याच्या आधी ‘आकरा वाजले’ हे घड्याळ न पाहता मला
लहानपणी कळायचं जेंव्हा कामगारसभेचं सुरुवातीचं ते वैशिष्ट्यपूर्ण संगीत कानावर
पडायचं शेजारच्या घरातील रेडिओमधून! (खूप वर्षांनी मी कमिन्स कंपनीमध्ये
कामगारांना अकरा वाजता कामगारसभा ऐकताना पाहिलं आणि जरा आश्चर्यच वाटलं होतं!)
मी सातवी-आठवीला असताना रेडिओ घरी आला. एक-दोन आठवडे लागले बहुधा
रेडिओ स्टेशन्स, कार्यक्रमांच्या वेळा वगैरे कळायला आणि अल्पावधीतच सगळ्याचाच लाडका बनला रेडिओ!
सकाळी सहाची पहिली धून, मग अभंग-वाणी, संस्कृत बातम्या (प्रवाचक-
मंगला कवठेकर अथवा बलदेवानंद सागर!) आणि मग सातच्या बातम्या! “आकाशवाणी पुणे, सुधा
नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहे”,... या खणखणीत आवाजानेच मी खूप वेळा झोपेतून
जागा झालो आहे! नंतर वडील रत्नमाला (कि दुसरा कोणता तरी) हा जुन्या गाण्यांचा
कार्यक्रम लावायचे. मला फार राग यायचा तेंव्हा. एक गाणं ओळखीचं नसायचं! शेवटचं
गाणं सैगलचं असणार! आठला आपही के गीत हा नव्या हिंदी गाण्याचा कार्यक्रम असायचा.
आठ-चाळीसला चित्रपट संगीत आणि नऊ-दहाला शालेय कार्यक्रम! आणि मग शाळेला निघायचं!!
बुधवारच्या बिनाकाबद्दल मंगळवार-पासूनच सर्व घोकायचे (म्हणजे कॉलेजमधले
भाऊ-बहिण). रविवारी तर चंगळ असायची. एका-मागे एक ‘आपली आवड’ ऐकायची! मला वाटतं,
साडे-दहाला सांगलीवर असणार, मग अकरा कामगार-सभा,बाराला पुण्याची आपली आवड,
साडे-बाराला ‘औरंगाबाद-परभणी’. मग जळगाव. दुपारी अडीचला मनोरंजन गीत, तीनला
जयमाला.वडील आठच्या मराठी बातम्या (नंदकुमार कारखानीस, सदाशिव दीक्षित, आशा कर्दळे)
, साडे-आठला स्पॉट-लाईट व नऊच्या इंग्रजी बातम्या (बहुधा Rasika Ratnam. मला ओ की
ठो कळायचं नाही!)ऐकायचे. साडे-नऊला ‘नभो-नाट्य’ लावण्याची फर्माईश आईची असायची!
थोडं मोठं झाल्यानंतर ‘बेला के फुल’ हा जुन्या हिंदी गाण्याचा कार्यक्रम ऐकू लागलो.
त्याचं वेळेला ‘तामिली-ए-इर्शाद’ नावाचा पण जुन्या हिंदी गाण्याचा कार्यक्रम
असायचा कोठे तरी. शेवटचं गाणी ऐकून साडे-आकराला झोपायचा दिनक्रम मी बऱ्याच वेळा
केला आहे! (आत्ता इतक्या वर्षांनी
लिहिताना मला जाणवलं की मग अभ्यासाला वेळ केंव्हा दिला मी :-?)
आकाशवाणीची आणखी एक गंमत म्हणजे गाणी ऐकून सध्या ऋतू कोणता असेल
(किंवा बाहेरचं तापमान किती असेल)हे
कळायचं! खोटं वाटतंय? ‘वेळ झाली, भर
माधान्य, माथ्यावर टळते उन्ह’ हे गाणं दुपारी बाराच्या आसपासच लागायचं! ‘आला
थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेटवा’ कानावर पडलं की ओळखायचं हिवाळा सुरु झालाय!
‘आला-आला वारा, संगे पावसाच्या धारा’ ऐकलं की समजावं, श्रावण आला आहे! J
पुढे मी पुण्याला आलो आणि कळलं की पुणे विविध-भारतीवर दिवसभर गाणी
असतात! आणि पुणेकरांचा थोडा हेवाच वाटला! J
नक्की वर्ष आठवत नाही. पण बहुधा नव्वदीच्या आरंभास टीव्ही आम
माणसाच्या घरी घुसला आणि रेडिओ म्हणता-म्हणता अडगळीत गेला! एका दशकापेक्षा जास्त
काळ रेडिओ हे माध्यम कोणाच्याच खिजगणतीत नव्हतं! मग FM आलं आणि रेडिओला पुन्हा
संजीवनी मिळाली. तरीही आता अगदी FM देखील फार कमी जण ऐकत असतील घरी! कार driving
करताना जेवढं कानावर पडतं तेवढंच! असो!!
कालाय तस्मै नम: !!
-
प्रशांत
No comments:
Post a Comment