मंडळी, पुणेरी पगडी, पुणेरी मिसळ आणि पुणेरी मस्तानी
या कशा ‘युनिक’ चीजा आहेत नां, त्या खाशा पंक्तीमध्ये बसण्याचा मान जरा ‘हट के’ असणाऱ्या
आपल्या पुणेरी ट्रॅफीक ने पटकावला आहे बरं का! आणि का नसणार हो?
..सांगा बरे,
जगातल्या कोणत्या देशात अशी ट्राफिकची विविधता व विविधतेमध्ये एकता (सर्वात पुढे
जाण्याची!) दिसून येते? दुचाकी, तीन-चाकी, चार-चाकी, सहा-आठ चाकी (चूक-भूल देणे
घेणे! गणित आणि आमच्यामध्ये ‘गांगुली आणि च्यापेल गुरुजी’ यांच्या एवढेच सख्य आहे!
असो!) वाहने रस्त्यातील खड्डे चुकवत (कि, खड्ड्यातून रस्ता शोधत? मागच्या
पावसाळ्यातील हा ज्योक या पावसाळ्यातदेखील लागू होणार असं दिसतंय! पुन्हा असो!)
बाजीप्रभूंना लाजवत, निग्रहाने ‘गणेशखिंड’ लढवत असतात, प्रत्येक वाहन-चालक सापडेल
त्या इंच-इंच जागेसाठी ‘पळा-पळा, कोण पुढे पळे तो’ करत त्वेषाने चढाई करत असतो, या
समरांगणावर जराही न डगमगता पादचारी नावाचे द्विपाद प्राणी मोठ्या शिताफीने
वाहतुकीचा हा चक्रव्यूह भेदून आडवं जाण्याचा यत्न करत असतात, तालिबान (म्हणजे
‘फडके बांधलेल्या पुणेरी पोरी हो!) मुली मागे बसवून हिरो मंडळी ‘ ‘मी या गावचाच
नाही’ अशा दिमाखात धूम’ इष्टाईल ने बाईक-रथ घुर्र-घुर्र करत असतात, रस्ता-दुभाजक
लीलया मोडून दुसऱ्या बाजूचे बाईक-बंधू (व कधी बाईक-भगिनी पण!) इकडच्या बाजूला
येण्याचा shortcut मारत असतात, एखादा ऑडी/क्यामरीवालाआपल्या नव्या कोऱ्या गाडीला
dent येईल या आशंकेने तळमळत असतो, एखादी सिक्स-सीटर खचाखच पाशिंजर कोंबून, आसमंतात
गिरणीच्या धुराड्यागत रॉकेलचा धूर भकाभका काढत असते, एखादा ट्रक-ड्रायवर बाजूच्या
चारचाकी-दुचाकीला साईड न देता फुटपाथवर चेपत असतो, तो दुचाकीवाला पण
‘बचेंगे-तो-और-भी-घुसेंगे’ करत wrong-side ने गाडीचं चाक पुढे घुसडत असतो, ट्राफिक
पोलीस मात्र ‘ब्रह्मानंदी टाळी’ (पक्षी ‘गुटक्याची गोळी’) लावत कोपऱ्यावरच्या
पानपट्टीच्या छत्राखाली वरकड कमाईचा हिशेब जमवत उभा असतो, एखादी रुग्ण-वाहिका
केविलवाणा सायरन वाजवत असते, पण तिला साईड देऊ इच्छीणारया मोजक्या सुजाण वाहन-चालकांना
सरकायला पण जागाच नसते मुळी! सिग्नलच्या या भाऊ-गर्दीत विक्रेते मात्र उत्साहाने
कार पुसण्याचे फडके ते Encyclopedia Britannica पर्यंतचा यच्चयावत माल या mobile
पण काही काळ captive मार्केटला खपवायचा प्रयत्न करत असतात, खोदलेल्या रस्त्याच्या
बाजूलाच एखादा भाजीवाला आपलं दुकान थाटून बसलेला असतो, एखादी कायनेटिक-वाली काकू
आपल्या दोन पायांचा landing गियर टाकत ‘चला बाई, सोय झाली’ म्हणत गच्चकरून ब्रेक
लावत त्या भाजीवाल्यापुढे थांबत असते, पाच-सहा वर्षाचे लहानगे भाऊ-बहिण पोटाच्या
खळग्यासाठी डोंबारयाचे/रिंगचे खेळ दाखवत हात पुढे करत असतात, तर कधी कडेवर
तान्हुलं घेतलेल्या कुपोषणग्रस्त अभागिनी कारवाल्यापुढे मदतीची याचना करत असतात...
..हिरवा सिग्नल
लागतो!...
...आणि या सगळ्यांना
सामावून घेत ट्रॅफीक पुढे सरकत असते!! ...
.... जीवन-संघर्ष
चालू असतो!!!
(५-६-२००६. दहा वर्षापूर्वी मी हा लेख लिहिला होता;
दुर्दैवाने परिस्थिती काही फारशी बदलेली नसल्यामुळे आजही relevant आहे.)
No comments:
Post a Comment