Total Page-Views

Monday, February 17, 2025

श्रीसमर्थ वाङ्मयातील प्रयत्नवाद


१७व्या शतकाच्या प्रारंभीची वर्षे; हिंदुस्थानात यवन स्थिरावलेत, त्यांची पुंडाई वाढलेली आहे, मोठ्या प्रमाणावर  हिंदूंना  बळजबरीने धर्मांतर  करायला  भाग  पाडले जात आहे, मंदिरं लुटली जात आहेत, पाडली  जात आहेत आणि  महाराष्ट्र प्रांतातील प्रजा मात्र सगळं काही  दैवावर  सोडुन निवृत्तीमार्ग  स्वीकारत गप्प  बसून  आहे!

..आणि  या  अश्या बिकट परिस्थितीमध्ये इ.स.१६०८ मध्ये जांब या गावी ठोसर  कुटूंबात एक ओजस्वी नररत्न जन्म  घेते, जे पुढे जाऊन 'महाराष्ट्र-धर्म'  काय आहे ते  सांगते, 'प्रपंच करावा  नेटका'  असे ठणकावते    'यत्न तोचि  देव  जाणावा'  असे सुनावते ...

.. ते  द्रष्टे, कालातीत, एकमेवाद्वितीय संत श्री समर्थ रामदास स्वामी!

समर्थानी त्या काळातील राजकीय, सामाजिक आणि  भारतीयांचे  वैयक्तिक जीवन  जवळुन अनुभवले आणि त्या मानवी जीवनाच्या सूक्ष्म निरीक्षणावर आधारीत कसदार साहित्त्याची निर्मिती केली. त्यात मनाचे श्लोक, दासबोध, रामायण, आत्माराम, करुणाष्टके, स्फुट श्लोक, मनोबोध, लघुकाव्ये, अभंगे, पदे, ललिते, आरत्या, इत्यादींचा समावेश आहे. परंतू या सर्व साहित्यात 'दासबोध' हा ग्रंथ प्रपंच आणि  परमार्थ यांचा  समन्वय साधणारा;  

प्रयत्नवाद, जीवनव्यवहार, आणि भक्तीमार्ग यांचा समतोल साधणारा असा ग्रंथशिरोमणी मानला जातो. समकालीन  प्रचलित असलेला भक्तिमार्ग, ‘निवृत्तिमार्ग  प्रपंच पराङ्गमुखता यांचा पगडा समाजावर घट्ट  बसलेला असताना समर्थांनी प्रयत्नवादाचा केलेला भक्कम पाठपुरावा त्यांच्या विपुल  साहित्यात ठायीठायी आढळतो. त्यांचे प्रयत्नवादाचे  विचार  नक्कीच  काळाच्या  कैक वर्षे पुढे होते! 

“यत्न तो देव जाणावा अंतरी धरिता बरे” असे म्हणून प्रयत्न आणि परमेश्वर हे एकच आहेत याची जाणीव पहिल्यांदा समर्थांनी भारतीय समाजाला करून दिली. 'यत्नाचा लोक भाग्याचा यत्नेवीण दरिद्रता', 'करील यत्न जीतुका तयास लाभ तीतुका ' ते प्रयत्नवादाचे पुरस्कर्ते होतेच ; पण दैववादाचे खंडनकर्तेही होते! 'कर्मरेखा, कपाळीची रेघ, प्रयत्नाने पुसता येते' असा समर्थाचा सिद्धांत आहे. ते म्हणतात, ' रेखा तितुकि पुसोन जाते। प्रत्यक्ष प्रत्यया येते।' (दासबोध १५-६-९) आणि ती रेखा पुसण्यासाठीच ते सांगतात की  प्रयत्न ,साक्षेप, विवेक, बुद्धियोग . गुणांची आवश्यकता आहे.

प्रयत्नवादाची संकल्पना विशद करताना सुरुवातीला समर्थ एक गोष्ट सांगतात. एक दुर्दैवी व करंटा माणूस जो आळशी व खादाड होता, कर्जबाजारी होता, धड खायला नव्हते, जेवायला नव्हते, अंगावर घ्यायला वस्त्र नव्हते, अंथरायला नव्हते, पांघरायला नव्हते, राहण्यास झोपडी नव्हती, सोयरे वा मित्र नव्हते. तो विचारतो, “स्वामी, मी काय करू? कोणती आशा जीवाशी धरू? कसे जगू”? (दासबोध १२-९)

त्याला उत्तर देताना समर्थ म्हणतात -

लहान थोर काम काही । केल्यावेग़ळे होत नाही । करंट्या सावध पाही । सदेव होसी (१२-९-६)

अंतरी नाही सावधानता । यत्न ठाकेना पुरता । सुखसंतोषाची वार्ता । तेथे कैची  (१२-९-७)

म्हणोंन आळस सोडावा । यत्न साक्षेपे जोडावा । दुश्चित्त पणाचा मोडावा । थारा बळे(१२-९-८)

समर्थ सांगतात की काम कोणतेही असो ,लहान किंवा मोठे, ते करावे लागते. ते काम चांगले होण्यासाठी प्रयत्न करावा लागतो .त्यासाठी मनात दक्षता घ्यावी लागते ,सावधानता ठेवावी लागते ,सावधानता नसेल तर शेवटपर्यंत प्रयत्न होत नाहीत .दीर्घ प्रयत्न झाला नाही ,तर सुख संतोष होत नाही .म्हणून माणसाने आळस सोडावा ,चिकाटीने प्रयत्न करावा ,मन निराश होऊ देऊ नये ,मन मागे फिरू देऊ नये .त्यासाठी जीवन पध्दती कशी असावी ते समर्थ सांगतात:

प्रात:काळी उठत जावे । प्रात:स्मरामि करावे । नित्य नेमे स्मरावे । पाठांतर । । १२-९-९

सकाळी लवकर उठावे, उठल्यावर भगवंताचे स्मरण करावे, पूर्वी पाठ केलेल्याची उजळणी करावी ,नवीन पाठ करण्याचा नियम करावा, निर्मळ होऊन देवपूजा करावी, मग फलाहार करावा, व्यवसाय करताना कोण आपला आहे आणि कोण आपला नाही, हे नीट ओळखून काम करावे. सर्व ठिकाणी सावधानता ठेवून नीतिमर्यादा पाळावी. लोकांना त्रास होणार नाही या पद्धतीने काम करावे, मनन, चिंतन करावे माणसाने आपले मन प्रसन्न ठेवून आत्मसुधारणेच्या मागे लागावे. आळस टाकून प्रयत्न करावा. काही झाले तरी प्रयत्नांची कास सोडू नये. प्रयत्न करताना, काम करताना आजूबाजूच्या लोकांना खूश ठेवावे. कोणाचे मन दुखवू नये. लोकांमध्ये वावरताना आपले बोलणे आणि वागणे यात फरक नसावा नाहीतर लोक आपल्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतील.कोणाला काही विचारायचे असल्यास थोडक्यात पण नेमकेपणाने विचारावे ,सांगताना पाल्हाळ लावू नये ,कोणतेही काम दुस-याला पसंत पडेल असे करावे ,आपल्याकडे येणा-याचे समाधान करावे ,बुध्दी चे सामर्थ्य वाढवावे असे समर्थ म्हणतात निरपेक्षपणे प्रयत्नपूर्वक कार्य करीत राहिल्यास कर्मयोग्याचे गुण आपल्या ठिकाणी येतात व प्रारब्धही अनुकूल होते.

माणसाने प्रयत्न करताना तसेच प्रत्येक ठिकाणी (प्रपंचात, व्यवहारात) आपली बुद्धी वापरली पाहिजे. एका अकलेवाचून या जगात दुसर्‍या कशाला महत्त्व नाही. म्हणून अक्कलहुशारीने प्रयत्न केला पाहिजे.

अकलबंद नाही जेथे ।

अवघेचि विश्कळीत तेथे।

येके अकलेवीण तें। काये आहे ॥ (१२.९.२८)

अशा रीतीने वागल्यास करंटेपणा शिल्लक राहणार नाही पण प्रयत्न केल्याशिवाय काही मिळत नाही,

समर्थ सांगतात की भक्तांनी क्रियाशून्य, आळशी  बनू नये. देव सदा सर्वदा सानिध्य आहे. अल्पधारिष्ट्याने पाहा, चांगली कामे कर. कामे  करता करता देवाच्या  कृपाळूपणाचा अनुभव  येत  राहिल. ("सदा सर्वदा  देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।")

समस्तामध्ये सार साचार आहे

कळेना तरी सर्व शोधूनि  पाहें  (मनाचे श्लोक - ७५)

सर्व यशस्वी जीवनाचे सार म्हणून काय असेल तर श्रमावरील निष्ठा. आचरणास प्राधान्य देणे. साचार म्हणजे सदाचरण हे भक्तिमार्गातील आधारभूत तत्त्व आहे. पुढे ते असेही म्हणतात की जीवनात ध्येय असावे पण ते मोठे असावे. (मना अल्प संकल्प तोही नसावा। याच्यावरून 'Not failure but low aim is crime!' हे आठवते)

प्रयत्नवादाच्या संदर्भात समर्थांच्या दासबोधातील आणखी काही मौक्तिक-पंक्ती -

मनी धरावे ते होते।विघ्न अवघेचि नासोन  जाते। कृपा केलीया रघुनाथे । प्रचित येते । (६.७.३०)

आळसें निद्रा वाढली।आळसें वासना विस्तारली।आळसें सुन्याकार जाली!सद्बुद्धी निश्चयाची। (८.६.३४)

कष्टेविण फळ नाही। कष्टेविण राज्य  नाही । केल्याविण होत  नाही । साध्य  जनीं । (१८.७.३)

आपली दुःखे, आपले अपयश, आपले दारिद्र्य यांचे खापर दैवावर, प्रारब्धावर फोडावयाचे व त्या सबबीखाली आपले अवगुण, आपला आळस, आपला गलथानपणा झाकुन ठेवायचा, या दैववादी लोकांच्या प्रवृत्तीवर समर्थांनी तीव्र टीका केली आहे. (दासबोध, १२-२) ते म्हणतात, संसारात एक सुखी होतो, एक दुःखी होतो. याचे कारण सांगताना लोक 'प्रारब्धावरी घालिती.' आपल्या हातून अचूक यत्न होत नाही, म्हणून आपल्याला यश येत नाही, आपल्या ठायी अवगुण आहेत, म्हणून 'केले ते सजेना,' हे लोक जाणत नाहीत. 'दुसऱ्यास शब्द ठेवणे, आपला कैपक्ष घेणे, पाहों जाता लौकिक लक्षणे, बहुतेक ऐसी.' आपल्या पराभवासाठी दैवाला, नाही तर दुसऱ्या कोणाला तरी जबाबदार धरण्याचीच बहुतेकांची वृत्ती असते. पण हे सर्व चूक आहे. आपण पुरेसा प्रयत्न करत नाही, योग्य  दिशेने प्रयत्न करत नाही, हेच खरे कारण असते. गुण अनेकांच्या ठायी असतात, पण योग्य प्रयत्न नसेल तर त्यांचा उपयोग काय ? 'जेवरी चंदन झिजेना । तंवरी सुगंध कळेना.' त्यामुळे इतर वृक्ष व चंदन हे सारखेच ठरतात. म्हणून माणसाने झिजले पाहिजे. 'येत्न सिकवण' या समासात (१३,९) समर्थांनी हाच विचार मांडला आहे.

समर्थ सांगतात, ‘रेषा तितुकी पुसोन जातेम्हणजे या नशिबाच्या रेषा नाहीशा होतात, बदलतात; पण केंव्हा, तर आळसाला थारा न देता माणसाने सतत नेटाने प्रयत्न करीत राहिले, तर दैवही त्याला अनुकूल होऊ लागते. समर्थ म्हणतात, “प्रयत्न करीत असताना माणसाने सावधगिरी बाळगली पाहिजे. तेथे सावधानता, सजगता नसेल तर प्रयत्न नीट होत नाही. यासाठी माणसाने आळस सोडुन चिकाटीने प्रयत्न करावा. प्रयत्न करीत असताना काही वेळा मन साशंक होईल, काही वेळा निराश होईल, तरीही मनाला निर्धाराने (साक्षेपाने) प्रयत्न करायला लावावे. मनातील साशंकता, नैराश्य बाजूला ठेवून प्रयत्न करावा.”

आणि असा प्रयत्नवाद  चोखाळून यश संपादन  झाले  तर ते डोक्यात  जाऊ  नये, 'मी'पणाचा   गर्व  होऊ  नये, अहंकाराची बाधा  होऊ  नये म्हणून समर्थानी एक अत्यंत मौलिक सिद्धांत सांगितला आहे.

रघुनाथ स्मरोनि कार्य करावे

ते तत्काळचि सिद्धी पावें।

कर्ता राम हे असावें।  (६.७.३३)

जे सर्व आहे ते भगवंताच्या मालकीचे असून आपण केवळ त्याचे विश्वस्त म्हणून काम करायचे आहे असे मानून कार्य  करत राहावे . ‘भगवंत कर्ता आपण फक्त विश्वस्त  किंवा  माध्यम’ हे एकदा पक्के मानले की मग गर्वाचा प्रश्नच उरत नाही! (यात  त्यांनी  गीतेचे सार विलक्षण सहजतेने गुंफलेले आहे!)

थोड्या वेगळ्या दृष्टीकोनातुन पाहिले तर, श्री समर्थ रामदासस्वामीनाभारतीय व्यवस्थापन शास्त्राचे जनक’ असे नक्कीच संबोधता येईल! 'मराठा तितुका मेळवावा आणि महाराष्ट्रधर्म वाढवावा' यानुसार माणसे जोडावीत आणि सांघिक/एकत्र  काम करून  समाज-संघटन/राष्ट्र-उभारणीचे महान कार्य पूर्णत्वास न्यावे म्हणणारे समर्थ नेतृत्वाचे, एकसंध समाज-निर्मितीचे, राष्ट्र-निर्मितीचे धडे देतात १७व्या  शतकात! त्यांनी निर्माण केलेले देशातील ११०० मठ हे समर्थांच्या संघटन कौशल्याचे उत्तम उदाहरण आहे. सर्वसामान्यांचा  व्यक्तिविकास असो  वा राजनीतीतील नेतृत्व, दासबोध  (आणि खास करून दासबोध /येत्नशिकवण १२.) आपणास खूप काही शिकवतो.

आजच्या  काळातील व्यवस्थापनशास्त्रातील मान्यवरांना , स्टार्टअप्स किंवा यशस्वी व्यक्तींना पण  त्यात स्वकर्म, उद्योगशीलता, साक्षेप (मनाचा दृढ निर्धार, निश्चय) , सावधपणा ही मोलाची चतुःसूत्री मिळेल.  याशिवाय संभाषणकला, व्यक्तिमत्त्वविकास , people-skills . शी निगडित अशी अनेक प्रेरणात्मक विचार-रत्ने आढळतील. त्याहूनही महत्त्वाचे  म्हणजे आजची युवापिढी; जी समाज-माध्यमांवर आपला बहुमोल वेळ विनाकारण  खर्च  करत असते व येन केन  प्रकारेण झटपट श्रीमंत  होण्याची  दिवास्वप्ने पाहत असते, त्यांच्यासाठी तर हे  झणझणीत अंजन ठरावे!

श्रीसमर्थ रामदास स्वामींचा प्रयत्नवाद आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायक आहे. श्री समर्थांच्या जीवनात प्रज्ञा आणि श्रद्धा, कर्म आणि संन्यास , परोपकार आणि अनासक्ती, एकांत  आणि  लोकसंग्रह  यांचा  समतोल  संगम  साधल्याने  त्यांचे  जीवन सत्पुरुषांनासुद्धा आदर्शवत  आहे! मानवी जीवनातील समस्यांवर प्रारब्ध मानुन गप्प न बसता प्रयत्नांनी मात करता येते. "कर्मेवीण नसे समाधी" या त्यांच्या विचाराचा आजही मोठा अर्थ आहे. ‘प्रयत्न, परिश्रम आणि शुद्ध आचरण’ यांची सांगड घालूनच जीवन सुखी होऊ शकते ही त्यांची शिकवण आजही सार्थ ठरते.

..आणि  यामुळेच ३५०+ वर्षांपूर्वी  लिहिलेले समर्थांचे साहित्य केवळ  पोथीनिष्ठ, धार्मिक राहता अक्षर वाड.मय ठरते, या २१व्या  शतकात, संगणकाच्या / कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence)च्या युगातही कालानुरूप ठरते आणि यातच श्री  समर्थ  रामदासस्वामींचे एकमेवाद्वितिय  स्थान अधोरेखित  होते!

जय जय रघुवीर समर्थ

 

-प्रशांत  पिंपळेकर