Total Page-Views

Monday, September 2, 2019

सौन्दर्याविष्कार


स्वच्छंद, बेबंद उडती त्या मोहक कुंतल बटा,
जणू सागरावरी नर्तन करी त्या लाटा!
सावरण्या त्या चंचल बटा, सदोदित लगबग होई,
कपोलावरील घर्मबिंदू नाजूकतेची साख देई
अर्धोन्मीलित पापण्यातील निळे तव नयन गडे,
झावळ्यातून डोकाविणारा चंद्रमाही फिका पडे,
लटकं रागाविण तुझं नेहमीच गं बाई,
मग कमानदार त्या भिवया चंद्रकोरीची सय देई
प्रशांतसमयी तुझी सुरेल ताल स्मरली
कि गमे गंधर्व-कन्या ही भूवर अवतरली!
खट्याळ हा पवन सखे, पदर तुझा गं उडे,
देह-क्षितीजावरची अनोखी ग्रहगोलद्वयी दृष्टी पडे
लागो नं दृष्ट माझी माझ्याच निर्मितीला,
कल्पून ईश्वराने, तीळ तव गाली रेखिला!

स्थित्यंतर


सार आकाश कुंद-कुंद झालंय,
सारा आसमंत अंधारानं व्यापून गेलाय
जणू काही पृथ्वीवरचा सारा प्रकाशच लुप्त झालाय!
सागराच्या पर्वतप्राय लाटा उसळतायात,
घोंघावणार वादळ जीव गुदमरून टाकतंय
अन मला पैलतीर गाठायचाय!

तुझ्या स्मृतींनी माझ्या मनीची सतार झंकारून निघाली,
अन मला त्या उन्मत्त सागरातही दीपस्तंभ दिसला
पौर्णीमेच पिठूर चांदण तुझ्यातून लख्ख  हसतंय
निळ्या नभी सानुली चंद्रकोर विराजलीय
घनदाट तिमिर तर कधीच पळालाय,
अन मग पैलतीर कधी गाठला कळलंच नाही!

जीवजंतू


जन्मल्यापासून माता-पित्यांच्या आकांक्षांचं गाठोडं सावरत
त्यानं पदवीचा उंबरठा कसा-बसा पार केला
cut-throat competition मध्ये बाजी मारून त्यानं क्लार्की चालू केली,
तेंव्हा सरकी मिळाल्याच्या वरताण आंनंद झाला त्या माता-पित्यांना!
थोडे टेबलावरचे, थोडे टेबलाखालचे स्वीकारत त्यानं
प्रथमपुत्रप्राप्ती समयीच ‘श्रम-साफल्य’ बांधलं,
तेंव्हा त्याच्या बेचाळीस पिढ्या धन्य झाल्या!
पुढे ‘सई’, हुसेन, प्रिस्ले, Madonna अशी नावं,
जिव्हेवर खेळवत तो cheers म्हणत चषक उंचावू लागला,
तेंव्हा त्याची white-collar आणखीनच ताठ झाली!
Convent-culture मधून आन्ग्लाळलेली त्याची मुलं
mom, pops म्हणत तारे तोडू लागली
आणि काऊ-चिऊची गोष्ट सांगणाऱ्या आजीची
त्या चकचकीत बंगल्यात पंचायत होऊ लागली
क्लब मीटींग्ज, चारशे टीवी channels व X-Box च्या गदारोळात
माता-पित्यांचा पांडुरंगनामघोष गुदमरू लागला
High blood-pressure व डायबीटीस या life-style रोगांच्या
अधीन जाऊन तो रिटायर होण्याआधी कैलासवासी झाला
फेसबुकमध्ये त्याच्या फोटोला तीनशेदोन RIP comments आल्या,
आणि मग त्याच्या आत्म्याला शांती मिळाली!

माणसं


लुसलुसत्या नवागत कोंबासारखी,
लवलवत्या लव्हाळयासारखी,
लपेटत्या द्राक्ष-वेलीसारखी,
डौलात उभ्या ज्वारीसारखी,
मत्त वेड्या केवड्यासारखी,
लह्लह्त्या गुलमोहरासारखी,
शोभिवंत बोगनवेलीसारखी,
अर्धोन्मीलित लाजाळुसारखी,
प्रसन्न पारिजातकासारखी,
दरवळत्या मोगऱ्यासारखी,
दुखऱ्या काटेरी गुलाबासारखी,
गाभूळलेल्या चिंचेसारखी,
उघड्या-बोडक्या बाभळीसारखी,
वेड्या-वाकड्या करवंदासारखी,
परजीवी बांडगुळासारखी,
डेरेदार आम्र-वृक्षासारखी,
गगनाला भिडू पाहणाऱ्या माडासारखी,
जमिनीत पुन्हा मूळ रुजवणाऱ्या वटवृक्षासारखी,
शिशिरात ओकंबोकंहोऊन वसंतात पुन्हा तजेलणाऱ्या मेपलसारखी,
......माणसं!!!




-प्रशांत


Wednesday, August 28, 2019

Ode to Columbus (A sonnet)



Oh Darling wife and cute little daughter
Sweet home was it with frail old mother

But the heart was yearning always
Sailor’s dream had no worldly ways

Ocean was calling, so was the mighty thunder
Living ordinary would never be captain’s blunder

Thousands of miles away from the motherland
In search of new frontiers, new seas, new land

The raging waves, the roaring wind
Deafening darkness, seemed daily grind

Hovering vultures, sickening salty air
Empty stomachs, lips muttering prayer

How he rose above all the petty and gory
Discovery of America brought him the glory!

पहिला पाऊस



ढग शुभ्र-धवल न्हाती सायंप्रकाशी

निमिषात रंग पीत-किरमिजी-तांबूस होती

अकस्मात मरुताची शीत लहर येई

अन रंग-बावरे मेघ कृष्ण-रूप होती

कुठे पावश्या वरुणाचे आगमन सांगी

कुठे हुंगत माती, खोंड उधळी माळरानी

ग्रीष्माचा दाह साहुनीया तप्त अवनी

पाहे वाट वरुणाची अधीर मनी होऊनी

न्याहाळी घन-माला गडद-गडद होती,

सौदामिनी चमके लखलख त्या अंबरा

..अन मग वर्षती जलद लक्ष अमृतधारा!


वारकरी



मागे सोडी घर, काळजी अन संसार
चालती वारीत सोसूनी कष्ट अपार

कपाळी टिळा अन मुखी सदैव हरिनाम
ना मनी मोह, ना जवळी एक छदाम

विठुरायाची अपार ती भक्ती
दीन-दुबळ्यांसी देई ऐसी शक्ती

मैलामागोनि चालती कैक मैल
भक्ती-रसात मन डुंबलेले सचैल

करती  घोष ज्ञानेशाचा अन तुकारामाचा
भीमेकाठी अनुपम मेळा ऐसा वैष्णवांचा

पोकळ पोपटपंची करती अनेक साधू  जरी,
पिक्या म्हणे चरणी लीन व्हावे ऐशा वारकरी!