स्वच्छंद, बेबंद उडती त्या मोहक कुंतल बटा,
जणू सागरावरी नर्तन करी त्या लाटा!
सावरण्या त्या चंचल बटा, सदोदित लगबग होई,
कपोलावरील घर्मबिंदू नाजूकतेची साख देई
अर्धोन्मीलित पापण्यातील निळे तव नयन गडे,
झावळ्यातून डोकाविणारा चंद्रमाही फिका पडे,
लटकं रागाविण तुझं नेहमीच गं बाई,
मग कमानदार त्या भिवया चंद्रकोरीची सय देई
प्रशांतसमयी तुझी सुरेल ताल स्मरली
कि गमे गंधर्व-कन्या ही भूवर अवतरली!
खट्याळ हा पवन सखे, पदर तुझा गं उडे,
देह-क्षितीजावरची अनोखी ग्रहगोलद्वयी दृष्टी पडे
लागो नं दृष्ट माझी माझ्याच निर्मितीला,
कल्पून ईश्वराने, तीळ तव गाली रेखिला!
No comments:
Post a Comment