Total Page-Views

Monday, September 2, 2019

मंतरलेले दिवस


ते दिवस आणीबाणीचे होते. मी असेन ९-१० वर्षांचा. पण बरचसं कळायचं आणि बरचसं अजूनही आठवतंय. इंदिरा गांधीनी वीस कलमी कार्यक्रम जाहीर केला होता. रेडिओवर , लाउडस्पीकरवर आणीबाणीची स्तुतीपर गाणी वाजवणं चालू होतं. अचानक सर्व मोठी माणसं मोठ्यानं बोलायला घाबरू लागली, कुजबुजत्या आवाजात चर्चा करू लागली होती.  एक दिवस कळलं कि आमच्या समोरच्या डॉ. कांबळेना अटक झालीय! गावातील बरीच माणसं तुरुंगात गेली. नंतर आणीबाणी मागे घेतली गेली व लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या! अटक झालेली माणसं सुटून परत आली व जोमाने प्रचाराला लागली! जयप्रकाश नारायणांचं नावं पेपरात पहिल्या पानावर येत होतं. जनता पक्षाची स्थापना झाली होती. वर्तमानपत्र, मासिकातून निवडणुकीची धूम कळत होती. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई, अटलबिहारी वाजपेयी, मधु दंडवते, मृणाल गोरे, जॉर्ज फर्नांडीस, नानासाहेब गोरे, मोहन धारिया, बापूसाहेब काळदाते अशी नावं ओळखीची वाटू लागली होती. (मनोहर मासिकातील उमेदवारांच्या slogans वाचून मी पण दोन ओळी जुळवलेलं मला आठवतय, “जय जगदंबे माते, निवडून येऊदे काळदाते!”) . आमच्या शेजारच्या माझ्या वयाच्या एका मुलांने तर मोहन धारीयाचं एक भाषण तोंडपाठ केलं होतं! माझे मामा (कै. वसंतराव कुलकर्णी) जनता पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते होते. ते घरी आले कि, वडिलाबरोबर, मोठ्या भावाबरोबर बोलताना त्यांच्या चर्चेत मधु दंडवते, मृणाल गोरे, जॉर्ज फर्नांडीस, मधु लिमये, एसेम जोशी अशी नावं सहजपणे यायची! मला ऐकूनच फार भारी वाटायचं!! निवडणुका झाल्या, मी वडिलांबरोबर शेजाऱ्याकडे रेडीओवर निकाल ऐकायला गेलो.  एक एक निकाल बाहेर येऊ लागले आणि ...बाहेर फटाक्यांचे आवाज सुरु झाले होते! चक्क इंदिरा गांधीना राजनारायणनी हरवलं होतं! कॉंग्रेसचे सर्व दिग्गज हरले होते, कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला होता! गावात (& आणि देशातही) एक चैतन्याचं वातावरण होतं! मी व माझा बालमित्र (प्रवीण पुराणिक) मंत्रमुग्ध होऊन, भारून जाऊन गावातून, गल्ली-बोळातून जल्लोष पाहत फिरत होतो! सर्वत्र उत्साह सांडून वाहत होता, मंतरलेले क्षण होते ते! असं वाटत होतं कि जणू काही स्वातंत्र्य पुन्हा मिळालंय!!...
… … …
… … .. .. ...
परत एकदा ते मंतरलेले दिवस अनुभवण्याची सुवर्णसंधी येणार आहे!
परिवर्तनाची पहाट परत एकदा पाहूया !!
चला , तो बदल घडवूया! मतदान करूया !!!



(2014)

No comments:

Post a Comment