सत्ताधारी पक्ष कोणताही असो; केंद्राचा रेल्वे-अर्थ-संकल्प
झाला की दरवर्षीची ठरलेली बातमी असते, ‘महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली’! (इतकी वर्षे पाने पुसून घेऊन त्या तोंडाचं काय
झालं असेल :-? आणि रेल्वे-अर्थ-संकल्प जाहीर होण्याआधी पाच-सहा महिने lobbying करायला यांना का जमत नाही? ..पण तो वेगळाच विषय होईल) आणि हो, केंद्राचा अर्थ-संकल्प
जाहीर केल्यानंतरच्या प्रतिक्रिया तर केवळ मनोरंजक असतात! एकच अर्थ-संकल्प, पण
एवढ्या दोन टोकाच्या प्रतिक्रिया असतात ना, काही विचारूच नका! ‘देशाच्या सर्व
घटकांचा विचार करणारं, सर्वांगीण विकास करणारं, पुरोगामी दृष्टिचं बजेट आहे’ असं
एक ठामपणे म्हणत असतो (अर्थात सत्ताधारी) तर विरोधकाच्या मते तोच अर्थ-संकल्प
‘सर्वसामान्न्यावर घोर अन्याय करणारा, फक्त भांडवलदाराचं हित जपणारा अर्थ-संकल्प’
असतो!
लोकसभेच्या निवडणुका झाल्या की ठरलेली बातमी अशी असते, ‘सकाळी
मतदान संथ गतीत चालू होतं, पण दुपारनंतर मतदानाने वेग घेतला. मतदानकेंदावर लांबचलांब
रांगा दिसत होत्या. महिला पारंपारिक पोशाख घालून मतदानाचा हक्क उत्साहाने पार
पाडायला आलेल्या दिसत होत्या.’ (नंतर मग दूरदर्शन बहुधा file picture दाखवणार, १०२ वर्षांच्या
वृद्ध मातेस पाठीवर घेऊन आलेला ६० वर्षीय नातू!!)
एप्रिल महिना सुरु झाला की दैनिक सकाळची बातमी, ‘वाढत्या
उष्म्याने पुणेकर हैराण’! एखादी अवकाळी
पावसाची सर येऊन गेली की, ‘पुणेकर सुखावले’! जून सुरु होऊन हि पाऊस पडत नसला की बळीराजा
आभाळाकडे चातकाप्रमाणे डोळे लाऊन वाट पाहणारा फोटो, खाली भेगाळलेली जमीन! (भेगाळलेली
जमीन, खड्डे यावरून आठवलं, एका जिल्हास्तरीय वर्तमानपत्रानं चंद्राचा पृष्ठभाग
म्हणून असाच एक खड्डे-युक्त गावाकडच्या रस्त्याचा फोटो पोस्ट केला होता म्हणे, असं
माझा एक पत्रकार-मित्र हसून-हसून सांगायचा!) ‘फुले मंडईत मटारची प्रचंड आवक’ पासून
ते ‘सवाई गंधर्व संगीत महोत्सवात गर्दी करणारे ‘रसिक पुणेकर’ बातम्यांत नेहमीच
असतात. हिवाळा आला की रस्त्यावर शेकोटी पेटवलेला फोटो पाहिजेच! होळी, दहीहंडी आणि
३१ डिसेम्बर दिवशी ‘तरुणाई’ चा उल्लेख बातमीत पाहिजेच!
टीम-इंडियाच्या गेल्या विजयी दशकानंतर ‘भारताचा दारूण
पराभव’ वगैरे बातम्या येणं मात्र आता थांबलेलं आहे! पण मी लहान असताना तर एक बातमी
क्रीडा-विश्वात ठरलेली असायची, ‘रमेश कृष्णन उप-उपांत्य फेरीत’. दुसऱ्याच दिवशी
बातमी असणार, ‘रमेश कृष्णनचे आव्हान संपुष्टात’! ..ती जागा आता सानिया मिर्झाने (एकेरीमधे तरी )घेतलेली आहे, असं दिसतंय J
तुम्हाला कोणत्या अशा
पुनरुक्ती-प्रत्यय देणाऱ्या बातम्या / मथळे / cliché
आठवतायत?
अवश्य comments post
करा!
No comments:
Post a Comment