Total Page-Views

Friday, September 27, 2019

चरैवेति, चरैवेति !


रांगतं मुल पाहताना भारी गंमत वाटते ना? काही महिन्यांनी ते बसु लागतं आणि काही महिन्यांनी कशातरी आधाराला धरून उठायचा प्रयत्न करू लागतं आणि एकदा पहिलं पाऊल टाकतं!

आई-वडिलांच्या आनंदाला पारावार उरत नसतो. आपण काही तरी फार भारी केलंय (ज्यामुळे माऊली जबरी खुष आहे) एवढंच त्या लहानग्याला नेमकं उमगतं आणि ते आणखी चालायचा प्रयत्न करू लागतं. आई-वडील आता धरू पाहत असतात, हातात/काखेत घेऊ पाहत असतात पण बाळाला आता आख्खं जग सापडल्याचा आनंद झालेला असतो! दुडक्या पावलानं किती चालू आणि किती नको, असं झालेलं असतं!

तेंव्हा त्या अजाण बालकाला यत्किंचितही कल्पना नसते की.. ....चालायला तर शिकलो पण ‘आपल्या पायावर उभं राहायला’ खूप काही शिकायचंय, आपली नेमकी वाट कोणती, हे आपणच शोधायचंय. अवघड वळणे ,चढ, खाच-खळगे, काटे-कुटे, उन्ह, वारा, पाऊस साऱ्यांना सामोरं जायचंय. कधी पडलं तर जोमानं परत उठायचंय आणि चालत राहायचंय, कधी चकवा लागेल, वाट चुकेल, कधी कोणी वाट चुकवेल, पुन्हा योग्य वाट शोधायचीय, साथ देणारे सोबती शोधायचेत व नव्या दमानं पावलं टाकायचीत. वर्षामागून वर्षे आणि दशकामागून दशके चालत राहायचंय, नं थकता, हसऱ्या चेहऱ्याने मार्ग-क्रमण करायचंय. चालण्यातला आनंद शोधायचाय, चालण्यातला आनंद उपभोगायचाय, सोबत्यांना तो आनंद वाटायचाय आणि पुनश्चः पाऊल पुढे टाकायचंय.. काही तरी नविन करायचंय!!


चरैवेति, चरैवेति!!!

No comments:

Post a Comment