Total Page-Views

Wednesday, September 4, 2019

संडे मिसळ (2014)


राजा – परधानजी, कसा आहे राज्याचा हाल-हवाल?

प्रधान – २० माणसे चेंगराचेंगरीत गेली, दरीत बस पडून ३० माणसे गेली , पण अशा किरकोळ घटना वगळता, ‘आल इस वेल’ बघा सरकार!

राजा – बडे-बडे राज्योमे ऐसी छोटी-छोटीबाते तो होती रहती है ना! पन आपल्याला तुमचं सकारात्मक बोलणं लय आवडतंय! बरं, आपली नवी घोषना म्हाईत हाये का? “गाव तितं इद्यापीठ”!!!

प्रधान – गाव तिथे विद्यापीठ? पण सरकार, अजून आपली “गाव तिथे पाणवठा” योजना चालूच आहे!

राजा – अवो, आता आपुन बाविसाव्या शतकाकड वाटचाल करतोय.  समदी बिस्लेरी पाणी पित्यात; कसला आलाय पाणवठा न काय? आपल्याला शिक्शणाचं फ्याक्ट्री मॉडेल काढायचंय बघा!

प्रधान  - ते कसं राजे?

राजा -  तुमी अगदीच कशे वो मंद आमच्या युवराजासारखे?आता बघा, गाव तितं इद्यापीठ, म्हंजी काय हुनार, मास्तरांची फौज लागणार, रोजगार वाडणार!! पोरगा केजी मधे घातला कि पीजी करूनच बाहेर पडला पाहिजे त्याच इमारतीमधून! गावा-गावात शिक्शन-महर्षी घडले पाईजे!

प्रधान – आपली दूरदृष्टी प्रशंसनीय आहे हुजूर!

राजा -  तसलं अवगड नका बोलू! नुसतं “सुपर-लाईक” म्हना!! आनी, या योजनेमुळे आणखी  एक मोठा प्रॉब्लेम सुटणार हाये. आपल्याकडची तमाम संत-वीरपुरुष-महापुरुष यांचं नेहमी स्मरन व्हावं म्हणून त्या सामद्यांची नावं द्यायची या इद्यापिठाना! आधी  एक नावं द्यायचं अन  मग वर्षांनी नाम-विस्तार करायचा! म्हंजी डब्बल चान्स, सगळे कव्हर व्हायला पाहिजेत! कसं?

प्रधान – अगदी खरं बोललात राजे! मी फाईल घेऊन येतोच तुमच्या सहीसाठी!


(05/01/14)

No comments:

Post a Comment