Total Page-Views

Sunday, January 18, 2026

आठवणींचा kaleidoscope (5)

 


दहावीची परीक्षा मार्चमध्ये संपली होती. जुनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालणारी उन्हाळ्याची लांबलचक सुट्टी सुरु झाली होती. माझे जवळचे मित्र पुणे आणि बंगळूरला आपापल्या नातलगांकडे सुट्टीला गेले होते.अस्मादिक मात्र तोपर्यंत सोलापूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांची शीव ओलांडून पलीकडे गेले नव्हते! (तेंव्हा मला कोणी सांगितलं असतं की "तू मोठेपणी १०-१२ देश हिंडशील, अमेरिका व सिंगापुरमध्ये वास्तव्य करशील" , तर त्या माणसाला वेड लागलंय किंवा माझी चेष्टा करतोय ,असंच मला वाटलं असतं!) मुरूम, अरळी, केळगाव व सोलापूरमधेच तेंव्हापर्यंत सुट्ट्यामध्ये गेलेलो (आजोळ/मावशी/आत्याकडे) ! पण तेंव्हा त्याचं मला फारसं वैषम्यही वाटायचं नाही. विजय वाचनालयातील पुस्तकं वाचणे (रोज एक या गतीने) , रेडिओवर हिंदी/मराठी गाणी ऐकणे , घरी भावाबहिणीबरोबर पत्ते, सोंगट्या खेळणे, अंगणात बॅाल खेळणे असे उपक्रम सुरु होते! मनात धागधुगही होतीच की परीक्षेचा निकाल कसा लागतोय , किती मार्क्स पडले असतील इ.

अशाच एका रणरणत्या दुपारी घरी मी सहज म्हणून गणिताचं पुस्तक परत एकदा चाळत बसलो होतो. सगळा अभ्यास झालेला, परीक्षा दिलेली , आता काय वाचणार , असं वाटत पुस्तकांच्या शेवटच्या पानांकडे वळलो व पाहिली एक यादी; गणितातील मराठी शब्द व त्याला पर्यायी इंग्रजी शब्द याची. उदा: चौकोन - quadrilateral , समांतरभुज चौकोन - parallelogram , लघुकोन - acute angle , गृहितक - postulate इ इ! माझ्या डोक्यात अचानक ट्यूब पेटली! अरेच्च्या, आपण हे शब्द पाठ केले तर? सोपं जाईल ना कॉलेज मध्ये इंग्रजीतून शिकताना ?

माझ्याकडे वेळ तर होताच! मग मी चक्क अंकगणित, भूमिती, जीव/भौतिक/रसायनशास्त्र या ५ ही पुस्तकांतील शब्दांची यादी(glossary!) लिहून काढण्यासाठी ५ वह्या केल्या; प्रत्येक पानाच्या मधोमध उभी रेषा मारली, डावीकडे मराठी शब्द, उजवीकडे त्याचा पर्यायी इंग्रजी शब्द; चालू झाला माझा स्वयंप्रेरित गृहपाठ! यादी पूर्ण लिहून झाली की पुढचा उपक्रम - पाठांतर! उभ्या रेषेच्या उजव्या बाजूवर हात ठेवायचा व पाठ झालंय का, ते पाहायचं! मला वाटतं ८-१० दिवसांत मी ते सगळे technical शब्द पाठ केले होते.

या पाठांतराचं महत्त्व मला ११वीला कॉलेजातील (वालचंद कॉलेज , सोलापूर) अगदी पहिल्या दिवसापासून कळलं! कारण सगळे गणित /विज्ञानाचे प्राध्यापक अस्खलित इंग्रजीमध्ये शिकवत होते (and some like Prof N V Shah in a special accent); मराठी माध्यमातून आलेल्या बाकीच्या विद्यार्थ्यांना , सर काय बोलतायत, काय शिकवतायत याची काही हवा पण लागत नव्हती पहिले २-३ महिने! मी मात्र पहिल्या दिवसापासून आत्मविश्वासाने वर्गात बसत होतो, इंग्रजी माध्यमातून (हरिभाई देवकरण शाळा!)आलेल्या मित्राबरोबर फारसा नं बुजता बोलत होतो, tutorial exam. मध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवत होतो! (By the way, दहावीच्या परीक्षेत मला गणितात १४९/१५० व इंग्रजी मध्ये ८९/१०० गुण मिळाले होते) लहान गावातील मराठी माध्यमाच्या शाळेत (तेही ‘जिल्हा परिषद शाळा’) शिकल्यामुळे भविष्यात इंग्रजीशी struggle वगैरे मला कधीच व कोणत्याच कॉलेजमध्ये करावा लागला नाही. मी इंग्रजीचा जागतिक मापदंड असलेल्या TOEFL/GRE परिक्षा चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालो होतो. आणि माझ्या सुदैवाने आजमितीला माझे २६ लेख (technical/management/miscellaneous) Times of India , Dataquest, Rediff. com , Corporate Citizen, Board Stewardship , EnterpriseIT world इ. मधे प्रकाशित झालेले आहेत)

.. आता चार दशकानंतर मागे वळून पाहता मी तेव्हा ते technical इंग्रजी शब्द पाहिले , list केले , गांभीर्याने पाठ केले , याची गंमत वाटते; थोडं आश्चर्यही वाटते!

आजकाल जी घोकंपट्टीच्या (rote learning )विरोधात ओरड चालू आहे , त्यात थोडं तथ्य असलं तरी मला वाटतं , आमच्या पिढीने पाठांतरबरोबरच चौकस बुद्धी/जिज्ञासू वृत्ती पण जिवंत ठेवली! आणि माझ्या मते पाठांतराचा सर्वात मोठा फायदा हा असतो की त्यामुळे तुमच्या स्मरणशक्तीला चालना मिळते, तुमची एकाग्रता वाढते! आजच्या युगातील भ्रमणध्वनी/समाज माध्यमांच्या (मोबाइल फोन /सोशल मीडिया) अतिरेकी वापरामुळे लोकांचा (खास करून पुढच्या पिढीचा) concentration span अतिशय कमी झालेला पाहतो, तेंव्हा पाठांतर पद्धतीचं आगळं महत्त्व नक्कीच अधोरेखित होतं!


..एक छान, अनोखी आठवण मात्र मनाच्या kaleidoscope मधे राहिली!

 

 

-प्रशांत पिंपळेकर


Sunday, December 21, 2025

कवडसे

आपण आपल्या आयुष्यात किती मश्गूल म्हणा किंवा आत्ममग्न असतो नां? जे काही आपलं सामान्य जीवन, माफक यश, कांही दु:खं आहेत त्यात आपण मध्यवर्ती व्यक्तिरेखा/नायक असतो! (म्हणजे, तसं आपण स्वतः:ला समजत असतो!) कुटुंबातील बाकीचे एकदम आतल्या वर्तुळात , कांही बाहेरच्या वर्तुळात , कांही आणखी बाहेरच्या वर्तुळाच्या परिघावर, बरेचसे परिघापलीकडे वगैरे असतात.. आपण ज्यांच्या जीवनाचा थोडासाही विचार करत नसतो! उदा. तुम्ही Uber ने गेलेल्या taxi चा ड्रायव्हर , तुमच्या सोसायटीचा वॅाचमन , घरी येणारी maid, रस्त्यावरचा पंक्चर काढणारा ! त्यांच्याही जीवनकथेत तुम्हाला असलंच तर नगण्य स्थान असतं!


आणि हो, त्या प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनात अनंत सुख-दु:खं आहेत. आनंद, आकांक्षा, स्वप्नं, वैफल्य, नैराश्य, सत्कर्म , कुकर्म नाना काळ्या, पांढ-या , करड्या , कधी रंगीबेरंगी छटांचं जीवन जगत असतो प्रत्येकजण! प्रत्येकाच्याच जीवनाचा पैस , आवाका हा तसा अफाटच असतो; मग भले तो माणुस कितीही सामान्य जीवन जगत असला तरी! फक्त एक दृष्टी लागते, निरिक्षणशक्ती लागते; ज्याला कल्पनाशक्ती शब्दसंपत्तीची जोड मिळाली की चांगली चारशे-पाचशे पानी कादंबरी लिहिता येईल एखाद्या सिद्धहस्त लेखकाला! (कल्पना करा रत्नाकर मतकरी, जयवंत दळवी, जी कुलकर्णी , पेंडसे , नेमाडे , शरणकुमार लिंबाळे अशी कादंबरी लिहितायत..!)

आणि गंमत म्हणजे , हे जे मी वर नमूद केलेलं realization आहे (की कोणाही त्रयस्थ माणसाचं आयुष्य तेवढंच गुंतागुंतीचं असतं , complex असतं जेवढं तुम्ही तुमच्या स्वत:च्या जीवनाला समजताय) हे इंग्रजी भाषेत फक्त एका शब्दातून ध्वनित होतं.

तो शब्द आहे sonder!


इथेच थांबतो या रविवार सकाळी!! 



-प्रशांत

Monday, December 1, 2025

रितेपण


आताशा आकाशातील रंगोत्सव 

 

मनाला तशी भुरळ घालत नाही

 

चुकार डोळे कुठे तरी ढगांची  

 

काळपट किनारच शोधत असतात..

 

गच्च हिरवाईचं जंगल तुडवताना

 

वानप्रस्थाश्रम आठवुन जातो उगाचच..

 

मग भकास डोळ्यांनी पाहत जातो 

 

उमलत्या फुलांवरील चंचल फुलपाखरं 

 

क्षणभंगुरतेची पाल मात्र चुकचुकत असते..

 

गोधुलीनं थरथरती सांज काळवंडताना 

 

पक्षी घराकडे थव्याने उडत जाताना..

 

मला रिकामं घरटं आठवत चर्र होत जातं

 

 

 

 

-प्रशांत 

 

सहज सुचलं म्हणुन..

 परवा गीतरामायणमधील एक गाणं ऐकत होतो आणि अचानक strike झालं की, राम-लक्ष्मण , ज्यांच्या अजोड बंधुभावाची गोडवी सारा हिंदुस्थान गातो , आजही आदर्श म्हणुन पाहतो ते दोघं सख्खे भाऊ नव्हे तर सावत्र भाऊ होतेतिकडे महाभारतात धर्म-भीम-अर्जुन हे तिघं नकुल-सहदेव द्वयीचे सावत्र भाऊ होते!!पण रामायणात असो वा महाभारतात , कुठेही त्या भावांच्या नात्यात सावत्र म्हणुन किंचितही खोट नव्हती!! 

मग वाटतं, या पार्श्वभुमीवर भावा-भावातील (ते पण सख्ख्या) भांडणं (ज्याला आपण भावकी म्हणतो अथवा भाऊबंदकी) कधीपासून सुरू झाली असेल? इतिहासात याची पहिली नोंद केंव्हा झाली असेल? (आणि मी हिंदू भावांची भांडणं म्हणतोय. मोघल राज्यकर्त्यातील भावकी सत्तेसाठी ते भावांना, जन्मदात्याला ठार मारुन सिंहासन बळकावत , हे तर सर्वश्रुत आहेच!) 

आजच्या काळात तर वडिलोपार्जित इस्टेट एक मोठं राज्य असो , मोठी कंपनी असो वा अगदी एक गुंठा जमीन; सख्ख्या भावांत वितुष्ट , आज ना उद्या , येत असतंच.. (वाटण्या झालेल्या असल्या तरी) कडाक्याचं भांडण होत नसेल अथवा कोर्ट-कचेरी पर्यंत जात नसेल पण अबोल्याचं शीतयुद्ध असतंच बहुधा घरोघरी!! ..आणि त्याच वेळेस चुलत/मावस/मामेभावंडाबद्दलचा प्रकर्षानं दाखविला जाणारा उमाळा..!!) 

मुलींना वडिलोपार्जित संपत्तीत समान हक्क (भावांबरोबर) मिळण्याचा कायदा झाला आणि घरोघरी एका नव्या भांडणाला तोंड फुटलं! यावर जास्त काही बोलता एवढंच म्हणेन की आता -याच बायकांची माहेरं दुरावली, …पोरांची आजोळं दुरावली!! 


नात्यांचे स्नेहरज्जू नाहीसे होतायत.. माणसं एकाकी बनत चाललीयत!!                                                                  Technology मुळे सारं जग जवळ आलं असलं तरी ‘water, water everywhere but not a drop to drink’ अशी समुद्रात अडकलेल्या माणसासारखी स्थिती झालीय!! 

 

 

-प्रशांत 

 

अडगळीत पडलेले शब्द

 मराठवाडा(मुख्यत्वे धाराशिव,लातूर)/सोलापुर ग्रामिण भागात वापरात असलेले (किंबहुना, केंव्हा तरी लहानपणी माझ्या कानावर पडलेले वा कधी काळी वापरलेले) कांही शब्द वानगीदाखल नमूद करतोय. (अर्थ सांगून / वाक्यात उपयोग करून. बरेच शब्द उर्वरित महाराष्ट्रातही वापरात असतील). गतस्मृतींना उजाळा नागरी पिढीस कांही नव्या शब्दांची ओळख होईल या उद्देशाने


पाचुंदा - कडब्याच्या धाटांची पेंढी

पेंड - गाई/म्हशी/बैलांना खाऊ घालण्याचा पदार्थ , जो तेलघाण्यातील by-product असतो.

कडबाकुट्टी - गुरांना चारा देण्यासाठी कडब्याचे बारीक तुकडे करण्याचे यंत्र 

कणिंग - धान्य साठवण्यासाठी बांबूचे बनवलेलं दंडगोलाकार मोठं पात्र (अशी कणिंग, धान्य पाखडायची सुपे, डाल, दुरड्या वस्तू बनविणा-या कारागिराला बुरूड म्हणत असत

गुम्मी - लहान कणिंग 

शिंकाळे - स्वयंपाकघरात टांगलेली विणलेली टोपली (ज्यात लोणी किंवा दह्याचं मडकं/सट अथवा कांदे/लसूण ठेवत

वाफसाजुन महिन्यामधे पहिल्या पावसानंतर पेरणी करण्यायोग्य झालेली शेतजमीन (गरम तापलेल्या नांगरलेल्या जमीनीवर जेंव्हा पहिला पाऊस पडतो तेंव्हा जी वाफ निघते त्याला वाफसा म्हणतात

वांबाळ पडली - वांबाळचा शब्दकोशातील अर्थ मळभ, ढग दाटून येणे असा आहे. पण व्यवहारात मात्रपाऊस पडून गेल्यानंतरचा हवेतील गारवा; थंडी पडलीया अर्थाने वापरतात

दिवस कासराभर वर आला - सुर्योदय होऊन बराच वेळ झाला . (कासरा - गाई-म्हैस-बैलाच्या गळ्यात बांधलेला दोर , ज्याने जनावर दावणीला बांधले जाते

कालवड - गाईचे वासरू (स्त्रीलिंग

बारदाना - हा शब्द सामान्यतः बैल-बारदाना या रूपात वापरला जातो. म्हणजे किती बैलं, गाई-म्हशी आहेत, धान्य किती होतं या अर्थाने. (In general, a term to denote agricultural assets of a farmer). याचा दुसरा अर्थधान्य साठवायची पोतीअसाही आहे

बळद - धान्य साठवण्याची मोठी जागा/कोठडी, घान्यागार, कोठार  

ढाळज- पडवी/ बैठकीची खोली 

वेळा अमावस्या - हा सण (ज्याचं मूळ उत्तर कर्नाटकात आहे) मराठवाडा आणि सोलापुर या भागांतील शेतकऱ्यांचा एक कृषिप्रधान सण आहे. या दिवशी शेतात कडब्याची खोप करून 'शेतातल्या लक्ष्मीची' पूजा केली जातेआंबील उंडे यांचा नैवेद्य दाखवला जातो

पाणंद - गावाच्या बाहेरील/ओढ्याजवळील अरुंद/चिंचोळा रस्ता (अपभ्रंश - पांद

डहाळा - कोवळा हरभरा 

राकुळ- लहान गावांत घरच्या गाय/म्हशीला गावातील गायरानात चारून आणण्यासाठी एक माणूस असायचा (जो सकाळी गाईला घरातून नेईल संध्याकाळी परत आणुन सोडेल ) . त्याला राकुळ म्हणतात. (गुरे राखणे वरून राखुळ/राकुळ असा शब्द आला असेल

घोंगडं - लोकरीचं blanket ( जे उबदार असतं पण मऊ नसतं

फणेरपेटी - फणी वगैरे ठेवण्याचा बायकांचा makeup box.

घंगाळे - स्नानासाठी वापरायचे पात्र (तांब्याचे/जस्ताचे

दादरा - जीना 

दिवस शाळू झाला - हिवाळ्यात दिवस लहान होतो , त्या अर्थाने 

परस , परसाकडे जाणे (म्हणजे शौचास जाणे या अर्थाने ) . पण कालौघातपरसाकडे जाणेया क्रियेचं परसाकड असं चक्क सामान्यनामात रूपांतर झालं! (म्हणजेपरसाकड लागली!’) 

अनुशापोटी - उपाशी पोटी (एखादं औषध सकाळी काही खाता घेणं . अनशन वरून अनुशापोटी आलं असावं

नम्म होणे - मऊ पडणे (पोळी /भाकरी / पापड . सर्द हवेने मऊ पडणे

धान्य मोजण्याची मापं/एककं - (जी आता जवळपास कालबाह्य झाली आहेत) चिपटं, कोळवं , शेर, पायली , मण 

उखळ / पहार - शेंगदाण्याचे कूट करण्यासाठी वापर व्हायचा 

(सध्याचा संततधार पाऊस पाहुन गावाकडील एक म्हण आठवली ..”मघा आणि चुलीपुढे हागा’ ! :-) ..कारण मघा नक्षत्रात पडणारा संततधार पाऊस..! याच्यावरून आणखी काही म्हणी आठवल्या. ‘पडतील स्वाती तर पिकतील मोती’, ‘पडला हस्त तर शेतकरी होईल मस्त’, ‘नाही पडल्या उत्तरा तर भात मिळेना पित्तरा!’) 

 

आणखी काही असेच वैशिष्ट्यपूर्ण शब्द (मराठवाड्यातील) आठवले तर सुचवा..! (आणि हो, तुम्ही किती शब्द प्रथमच ऐकले?)

 

 

 

-प्रशांत 

Sunday, November 16, 2025

Corporate Governance and the pivotal role of Independent Directors

https://boardstewardship.com/?r3d=vol-3-issue-8-november-2025#44 


(Published by Board Stewardship - Nov’25)



राधा

दै. दिव्य मराठी मध्ये  प्रकाशित - १३ ऑक्टोबर  २०२०.
(कविता वाचण्यासाठी image वर क्लिक करा)