Total Page-Views

Monday, September 2, 2019

नाट्यछटा


चिंगे, अगं ‘मोदीकाका कोठे आहेत’, ‘मोदीकाका कोठे आहेत’, अशी भुणभुण का माझ्या मागे लावतेस?
ते नाही का गेले विश्व-प्रदक्षिणेला? त्यांनी पृथ्वीभोवती सात फेरे मारण्याचा संकल्प सोडला होता, आताशी पहिली पूर्ण होतेय. आहेत अजून चार वर्ष बाकीच्या पूर्ण करायला! आणि अगं परराष्ट्रमंत्री भारताबाहेर पडल्याच नाहीत, असं काय म्हणतेस? त्यांना पाहून मला माझी सात्विक चेहऱ्याची काकू आठवते बघ! तशाच मानवतावादी! केवढी मदत केली त्यांनी भारतात बसल्या-बसल्या दुसऱ्या मोदीला! आणि राजस्थानचा रिमोट लंडनला आहे असं काही तू ऐकलं असशील तर ते साफ चुकीचं आहे हो पोरी ! आपल्या नमोकाकांना केवढा राग येईल? आणि शहाकाका परवा अगदी बरोबरच बोलले. जाहीरनाम्यात त्यांनी चांगलं २५ वर्षं लिहिली होती ‘अच्छे दिन’ आणायला! त्या प्रिंटवाल्यांनी २ चुकून लहान font मधे छापलं, हि काय त्यांची चूक आहे का, सांग बरे? चहाटळपणे पुन्हा-पुन्हा त्या व्यापम की भ्रष्टमचा उल्लेख करु नकोस बरे, सांगून ठेवतो एकदाच चिंगे! अगं आपले आबा सांगूनच गेलेत ना, बडे बडे देशोमे छोटी-छोटी बाते होती रहती है! झालं तर मग! आणि त्या भुजबळांचं काय झालं विचारतेस? शरदकाकांनी भृकुटी वक्र केली आणि देवेन्द्राची पाचावर धारण बसली ना गं ! पुराणकाळापासून तसच चालत आलंय ना  गं चिंगे! आता अशी फुरंगटू नकोस. पंकजा-मावशीची चिक्की खायची ना बाळीला माझ्या! चल तर मग..


(Written in 2015)

माझ्या नावाची ‘ष्टोरी’


पिंपळेकर-कुलकर्णी नावावरून बऱ्याचं पृच्छा आल्या, मागेही काही मासलेवाईक comments आले, तेंव्हा वाटलं आता सांगावीच ‘ष्टोरी’, माझ्या नावाची!

वाढली नां उत्सुकता  :-?

काही नाही हो, आम्ही मुळचे पिंपळा (बुद्रुक) या गावचे. तुळजापूर तालुक्यात आहे एक छोटं खेडं! हो, तिथे आमची थोडीशी शेत-जमीन आहे अजूनही (कोरडभू हो!). गावाचे कुलकर्णी & पिंपळा गावचे रहिवासी म्हणून पिंपळेकर , अशा दोन्ही नावानी आमचे पूर्वज आणि वडील ओळखले जायचे. सर्व भावांचं official (i.e. on records) आडनावही कुलकर्णी आहे. माझं पण सात-बारा वर आडनाव कुलकर्णी! पण शाळा-प्रवेशावेळी मात्र माझं नाव पिंपळेकर लावलं गेलं. नक्की कारण मला माहित नाही. (बहुधा ब्राह्मण-द्वेष त्या काळात असल्याने तसं केलं गेलं असेलही). पण एकदा एक आडनाव चिकटलं की ते बदलणं अवघड असतं (मुलांना तरी). सर्व भावांचं आडनाव कुलकर्णी आणि आपलं मात्र पिंपळेकर, हे बरोबर नाही असं वाटून मी काही दिवस officially नाव बदलण्याचा विचार करत होतो. पण तोपर्यंत पिंपळेकर नाव त्रिखंडात पोहोचलं होतं! (म्हणजे, Thanks to my disgruntled SAP customers spread all over the world J) फेसबुकवरती म्हटलं चला, आपलं कुलकर्णीपण फार काही कष्ट न करता सांगता येईल, सगळया नातलगाना पण easily relate होता येईल, अशा भावनेनं मी माझा ‘नाम-विस्तार’ केला फेसबुकवर! आणि तसं हि आमच्या मराठवाड्यात दुहेरी आडनावं नावं लावायची सवय आहेचं की! शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख बाभळगावकर, शिवराज पाटील चाकूरकर, साहेबराव पाटील डोणगावकर.. किती उदाहरणं सांगू? पण माझ्या पुण्या-मुम्बईच्या  (काही) मित्राना याचा पत्ताच नसल्याने बिचारे उगीचच हैराण होते माझ्या नावावरून! इतके कि, FB वर माझा एखादा लेख वाचून त्या विषयी काही तरी बरी-वाईट comment करण्याऐवजी, “...ते लेख वगैरे time pass ठीक आहे रे प्रशांत, पण तुझ्या आडनावाचं काय?’ J J  असो!

मंतरलेले दिवस


ते दिवस आणीबाणीचे होते. मी असेन ९-१० वर्षांचा. पण बरचसं कळायचं आणि बरचसं अजूनही आठवतंय. इंदिरा गांधीनी वीस कलमी कार्यक्रम जाहीर केला होता. रेडिओवर , लाउडस्पीकरवर आणीबाणीची स्तुतीपर गाणी वाजवणं चालू होतं. अचानक सर्व मोठी माणसं मोठ्यानं बोलायला घाबरू लागली, कुजबुजत्या आवाजात चर्चा करू लागली होती.  एक दिवस कळलं कि आमच्या समोरच्या डॉ. कांबळेना अटक झालीय! गावातील बरीच माणसं तुरुंगात गेली. नंतर आणीबाणी मागे घेतली गेली व लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या! अटक झालेली माणसं सुटून परत आली व जोमाने प्रचाराला लागली! जयप्रकाश नारायणांचं नावं पेपरात पहिल्या पानावर येत होतं. जनता पक्षाची स्थापना झाली होती. वर्तमानपत्र, मासिकातून निवडणुकीची धूम कळत होती. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई, अटलबिहारी वाजपेयी, मधु दंडवते, मृणाल गोरे, जॉर्ज फर्नांडीस, नानासाहेब गोरे, मोहन धारिया, बापूसाहेब काळदाते अशी नावं ओळखीची वाटू लागली होती. (मनोहर मासिकातील उमेदवारांच्या slogans वाचून मी पण दोन ओळी जुळवलेलं मला आठवतय, “जय जगदंबे माते, निवडून येऊदे काळदाते!”) . आमच्या शेजारच्या माझ्या वयाच्या एका मुलांने तर मोहन धारीयाचं एक भाषण तोंडपाठ केलं होतं! माझे मामा (कै. वसंतराव कुलकर्णी) जनता पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते होते. ते घरी आले कि, वडिलाबरोबर, मोठ्या भावाबरोबर बोलताना त्यांच्या चर्चेत मधु दंडवते, मृणाल गोरे, जॉर्ज फर्नांडीस, मधु लिमये, एसेम जोशी अशी नावं सहजपणे यायची! मला ऐकूनच फार भारी वाटायचं!! निवडणुका झाल्या, मी वडिलांबरोबर शेजाऱ्याकडे रेडीओवर निकाल ऐकायला गेलो.  एक एक निकाल बाहेर येऊ लागले आणि ...बाहेर फटाक्यांचे आवाज सुरु झाले होते! चक्क इंदिरा गांधीना राजनारायणनी हरवलं होतं! कॉंग्रेसचे सर्व दिग्गज हरले होते, कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला होता! गावात (& आणि देशातही) एक चैतन्याचं वातावरण होतं! मी व माझा बालमित्र (प्रवीण पुराणिक) मंत्रमुग्ध होऊन, भारून जाऊन गावातून, गल्ली-बोळातून जल्लोष पाहत फिरत होतो! सर्वत्र उत्साह सांडून वाहत होता, मंतरलेले क्षण होते ते! असं वाटत होतं कि जणू काही स्वातंत्र्य पुन्हा मिळालंय!!...
… … …
… … .. .. ...
परत एकदा ते मंतरलेले दिवस अनुभवण्याची सुवर्णसंधी येणार आहे!
परिवर्तनाची पहाट परत एकदा पाहूया !!
चला , तो बदल घडवूया! मतदान करूया !!!



(2014)

जगद्नियंता


अहो, ठाऊक आहे काय?
जगद्नियंता आहे मद्यपी!
या मद्यपानाच्या झिन्गेत त्यानं काय नाही केलंय?
त्यानं निर्मिलेल्या प्रत्येक मूर्तीतआहेत दोष
जशी असतात defective castings!
कोणाला केलंय नवकोट नारायण
तर कोणाला मृत्त्यू-शय्येवरही असते चिंता
‘कोण पुरवील सरण’?
दारिद्द्र्याचं वस्त्र सावरत पतिव्रता
भक्तीभावे वड पुजत असते
अन कोठे ‘page three’ lady
रोज नवी शय्या सजवत असते
सत्तेसाठी पित्यास जीवे मारणाऱ्या औरंगजेबास यांनाच निर्मिलंय,
पित्राज्ञेसाठी वनवास भोगणाऱ्या रामासम विभूती बनवणं मात्र थांबवलंय!
सायंकाळ होताच चालू  होतात जगद्नियंत्याची आचमनं
सागर लाटावर खेळणारी लाल-नारिंगी किरणं
भासवितात जणू मद्यांनं हिंदकळणारा प्याला
अन गरज नसतानाही उभा असतो,
‘Ice Sir?‘ म्हणून बिचारा हिमालय भोळा!

आठवतंय तुला?


अगदी लहानगी होतीस तू,
वाढदिवशी satin च्या गुलाबी frock मध्ये
दिवसभर बागडत होतीस तू,
त्यादिवशी मी परी पाहिली होती!
...आठवतंय तुला?

यौवनाच्या तू उंबरठ्यावर असताना,
मुग्ध कळीचे टपोरे फुल होत असताना,
सरळ नासिका, अन भावदर्शी डोळे ते,
कित्येक कलिजे खल्लास झाले होते,
...आठवतंय तुला?

अवचित एकदा रस्त्यात भेटलो होतो,
पुढे गेलीस तू मंद हसून,...
मागे वळून पाहिलं, ..तू पण होतीस पाहत वळून,
ग्रीष्माच्या उन्हात शरदाचं चांदणं जणू!
...आठवतंय तुला?

अबोल प्रेमाच्या कैक आठवणी
उफाळून येती अजूनही मनी
संध्याछायेच्या उदास एकांती
जर-तरची कोडी सोडवी!
...आठवतंय तुला?
...आठवतंय तुला??


स्पर्श


Adam च्या apple मधील वासनेचा तो सर्प

हजारो वर्षापासून मारतोय जागोजागी डंख
ऑफिसमध्ये सहकाऱ्यांचे सहेतुक स्पर्श
बस-लोकल मधील घामट, ओंगळ स्पर्श
देवालयाच्या महन्मंगल गाभाऱ्यातही
वासनेनं लडबडलेले तेच ते बीभत्स स्पर्श
आशीर्वाद देणारे हात सुद्धा जेंव्हा
जरा जास्तच वेळ रेंगाळतात..
संतापून वाटून जातं  मग,
नर व मादी या दोनच हिडीस नात्यात
आदिमाता ही संकल्पनाच विसरलीय आपण!
वासनारुपी पालीच्या ओंगळ स्पर्शापासून
उन्मुक्त होण्यासाठी मी शोधतेय…..
एक शांत, स्निग्ध, स्नेहार्द्र निरामय स्पर्श!

शून्य


कैक कोटी वर्षापूर्वी

कुठून तरी सुरु झालं Big Bang,

आली जन्माला आकाशगंगा,

म्हणा deterministic theory वा goldilocks zone,

जन्मली मग पृथ्वी अन काही जिवाणू,

सरली मग दशलक्ष वर्षे,

झाली मानवी उत्क्रांती

तप्तता तीव्र होत जाणारा सूर्य

मात्र विझेल काही लक्ष वर्षांनी,

मिटेल आपली सौरमाला,

व उरेल केवळ अंधारं विवर

अन मी इथं मांडतोय हिशेब,

पैशाचा, Likesचा अन साठ-सत्तर वर्षाच्या

......पांढरपेशी सप्पक आयुष्याचा!