Total Page-Views

Tuesday, October 8, 2019

दिवाळी …nostalgia

दरवर्षी नवं कालनिर्णय घरी आणलं कि मी प्रथम दिवाळी नक्की केंव्हा आहे, किती दिवस आहे हे पाहतो! मनात उगीचच एक वेगळा आनंद होत असतो,नुसत्या त्या तारखा पाहून!  मग माझी अवस्था बालपणी कशी असेल तुम्ही कल्पना करू शकता! J

बालपण...!

...दिवाळी येते आहे याची चाहूल लागायची जेंव्हा घर-दार लख्ख स्वच्छ व्हायचं, भिंतीवर रंगाचं नवा हात फिरायचा. आई गुळ-पापडीचे लाडू करणं सुरु करायची (जे मला बिलकुल आवडायचे नाहीत. मी बेसनाच्या लाडूंची वाट पाहत असायचो. आई ते बहुतेक मुद्दाम दिवाळीच्या अगदी एक दिवस आधी करायची!) . मोठा भाऊ प्रफुल्ल आकाश-कंदील बनवायला सुरु करायचा. कामठ्या, glazeचे रंगी-बेरंगी कागद, वायरिंग वगैरे. मी आपलं खळ आणून दे, कात्री दे वगैरे फुटकळ कामं करत असे  त्याच्या देखरेखीखाली. एकदा आकाश-कंदील झाला आणि बल्ब लावला की केवढा आनंद व्हायचा! वाणी-सामानासाठी वडिलांबरोबर किराणा दुकानात जायचो. नव्या कपड्यांची खरेदी व्हायची.  आणि ज्या खरेदीची मी अगदी आतुरतेनं वाट पाहायचो, ती फटाक्यांची खरेदी व्हायची आणि मग काय विचारता महाराजा!!

पण आनंदाच्या एवढ्या उन्मनी अवस्थेत असताना पण माझ्यातली budget-conscious / planning ची सवय जागी व्हायची. मी अगदी टोटल फटाके किती आणलेत, किती दिवस दिवाळी आहे याचं गणित मांडून रोज कोणत्या प्रकारचे किती फटाके उडवायचे हे लिहून ठेवत असे वहीत! (ते बघून माझा मोठा भाऊ प्रफुल्ल मला चिडवायचा आणि त्याच्या मनाला येईल तेंव्हा कोणताही फटाका/फटाके उडवून थोडी गंमत करायचा. पण ते न कळता, मी मात्र अगदी रडकुंडीला यायचो!) Plastic च्या मग खाली फटाका/बॉम्ब ठेऊन उडवणं वगैरे प्रयोग चालू असायचे (आणि मग आईचं रागावणं!)

दिवाळीच्या पहिल्या दिवशी अगदी पहाटे मी alarm न लावता जागा व्हायचो. (गल्लीतील पहिला फटाका फोडण्याचा मान मिळवण्यासाठी!). पण आई, ‘झोपरे, खूप लवकर आहे’ असं दटावायची. तरीही मी पाचच्या आसपास उठायचोच. (पण तो पर्यंत कोणीतरी already फटाके उडवलेले असायचे गल्लीत). प्रदूषण वगैरे शब्द पण कानावर पडले नव्हते त्या काळी. फटाके उडवून घरासमोर maximum कचरा करणे म्हणजे अगदी अभिमानाची गोष्ट होती तेंव्हा!  (फटाक्यांचा तो वास मला अजूनही आवडतो!) उडालेल्या फटाक्यांच्या कागदांच्या गर्दीत बहीणीने कष्टाने काढलेली रांगोळी मात्र झाकली जायची.

फटाक्यांच्या आवाजात  आणि बोचऱ्या थंडीत अभ्यंग-स्नान (रंगीत सुवासिक तेल, उटणे आणि मोती साबण!) करायला फार मजा यायची. मग नवे कपडे घालून देवीच्या मंदिरात जायचं, तिथे मित्र भेटायचे. मग फराळाला एकमेकाला घरी बोलवणं, जाणं!  घरी भावंडाबरोबर लटके भांडण करत (म्हणजे ते करायची, मला खरच वाटायचं!) अगदी स्पर्धा करतफराळ संपवायचा. मग प्रतीक्षा असायची दुपारची; main menuची!  मी एकदा जेऊन लगेच परत आईच्या पंगतीला जेवायला बसत असे!  त्यामुळे दिवाळी संपता-संपता माझं पोट पुरतं बिघडलेलं असे दरवर्षी! J


..अशी grand दिवाळी संपली की मला असं दु:ख व्हायचं म्हणून सांगू!


बालपणातला तो आनंद (किंवा तेवढ्या प्रमाणात) आता मिळत नाही पण तरी आजही  दिवाळी मनात एका वेगळ्याच आनंदाचे कारंजे नाचवते. प्रकाशाचा सण, मनातील तिमिर दूर करायचा सण, काही तरी नवीन सुरु करायचा सण, स्नेहांकिताना भेटायचा सण, अशी नवी ओळख असते आता दिवाळीची!  खरंय नां?


तुम्हा सर्वाना दीपावलीच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा!!




(*दिवाळी दोन दिवसांवर असताना मी  हा लेख लिहिलाय. वाट पाहतोय दिवाळीसाठी केंव्हा एकदा घरी जाईन!..)

अनुभूती


फुलपाखरांचे रंग निरखत बालपणात डोकावावं,

कधी एका मुग्ध अबोल कळीत रुतून बसावं,

तर कधी सुरकुतलेल्या हातांच्या दुलईत लपेटून जावं,

कधी नातवाच्या साखरपाप्यात विरघळून जावं,

मावळतीच्या रंगोत्सवात रंगबावरी मुद्रा आठवावी,

मृदगंधाच्या उन्मादात वेडं होऊन जावं,

गारठलेल्या चांदणीवर चंदेरी शेला  ओढावा,

कोकिळेच्या आर्त सुरात मनीचा सूर मिळवावा,

प्रपाताच्या मस्तीत स्वतःला झोकून द्यावं,

हिमालयाच्या धवलतेत विकारांना स्नान घालावं,

आकाशाच्या घननिळाईत मीपणा हरवून जावा,

सागराच्या कल्लोळात बिंदू होऊन भरभरून जावं,


.... आणि एक दिवस......

.... शिशिराच्या पानगळीत अलगद गळून जावं!

काही कळलंच नाही


H1B ची तार छेडता-छेडता
Greencard  चा सूर कधी लावला,
.... काही कळलंच  नाही!

Youtube वरती क्रिकेट पाहता पाहता,
American football मध्ये कधी घुसलो,
.... काही कळलंच  नाही!

Sight-seeing ची नवी नवलाई संपल्यानंतर,
Hindu temple ची अध्यात्मिक बॉलीवूडची रंगीत गोळी लावत,
weekends (आणि वर्षे) कधी संपू लागले,
.... काही कळलंच  नाही!

दुसऱ्यांना नावे ठेवता ठेवता,
स्वतः stereotype NRI कधी बनलो,
.... काही कळलंच  नाही!

लोकांच्या पोरांना नाकं मुरडत मुरडत
आपली मुलं 'ABCD' कधी  बनली,
... काही कळलंच  नाही!

'परत जायचंय', 'परत जायचंय' घोकत
सोनेरी पिंजऱ्यात कधी अडकून पडलो
... काही कळलंच  नाही!
... काही कळलंच  नाही!

पु.लं. नां लिहिलेलं पत्र व त्यांचं उत्तर






कराड
०५/०४/१९८६

प्रिय पु.लं.,
                        सा..

खरं तर आदरणीय पुलं  असंच लिहायला हवं होतं. पण आपण, आपल्या लेखनामुळे लाखो मराठी मनाच्या सिंहासनावर विराजमान आहात, आपल्या अज्ञात स्नेहरज्जुनी आम्ही जखडलेलो आहोत त्या जवळीकीमुळेच आदरणीय या जराशा दुरावा निर्माण करणाऱ्या शब्दापेक्षा प्रिय हा शब्द जास्त समर्पक वाटला!

मी आपलं सारं साहित्य काही नाही वाचलं! (किंबहुना आमच्या ग्रंथालयातील काहीशा अनुपलब्धतेमुळे असेल) पण जी पुस्तकं वाचली, ती फारच आवडली! आम्हा  मित्रांच्या कंपूनं तर त्याची अक्षरशः पारायणं केली आहेत. पुलंचं नवं पुस्तक कोणाला आधी वाचायला मिळणार , याबद्दल अगदी अहमहिका असते आमच्यात!
समाजातील , माणसांच्या स्वभावरेखेतील, चाली-रीतीतील विसंगती हेरून त्याला कोपरखळ्या मारणारा तुमचा उच्च अभिरुचीचा नर्म विनोद आम्हाला फार आवडतो! आपलं कोणतंही पुस्तक याचीच साक्ष पटवते! अर्थात अशी समीक्षा करण्याचा अधिकार  कुरुंदकर , गं.बा.सरदार, माडखोलकर सारख्या प्रभृतींचा आहे! (सूर्याचं तेज मम यत्किंचित काजव्याला काय ते कळणार ?)

आजकाल मराठी साहित्य दरबारात अनेकांची खोगीरभरती होत आहे , पण आपल्या कर्तृत्वाची अपूर्वाई काही औरच ! मराठी विनोदी  साहित्याच्या इतिहासाचा गडकरी , कोल्हटकरांचा पूर्वरंग सोडला तर नंतरच्या साहित्यिकांच्या अक्षर कलाकृतींच्या गोळाबेरीजे आपला सिंहाचा वाटा आहे!  (एवढं वाक्य लिहून झालं की , अर्धा फुलपात्र पाणी पिलं!)
एक मात्र खरं की आम्हा मुलांना फुलं पुलं फार आवडतात! एकदा मित्रांना मी असाच एक विनोदी चुटका सांगितला; पण एका बहाद्दराची दंतपंक्ती विलग झाली असेल तर शपथ! शेवटी मी तो चुटका पुलंचा आहे असं सांगताच तिथे हास्याचे फवारे उडाले! (पण तसं सांगण्यापूर्वी मनातल्या मनात मी तुमची क्षमा मागितली होती हं !) रामनामाने तुळशीपत्रही  तरून जावं , तसं झालं हे !

खरं पाहिलं तर ,आमच्या engineering college च्या submission, workshop, drawings च्या धबडग्यात आणि अवाढव्य मशीन्सच्या गोंगाटात साहित्यिक अंकुर निर्भेळ हसू जपून राहिलं गेलंय , याचं बरंचसं श्रेय माझ्यामते तरी तुम्हालाच आहे!

माझ्या मित्रांनी यापूर्वीही तुमच्याशी पत्र-व्यवहार केला, पण एकालाही तुमचं उत्तर आलं नाही. अर्थात तुम्हाला लेखन, सभा-संमेलन, काव्य-वाचन प्रकृती  यामुळे वेळ मिळाला नसेल. त्यामुळे पुलंचं पत्र म्हणजे उंबराचं फूल असं इथे समज  झाला आहे , पण ते फूल निदान मला तरी प्राप्य व्हावं  हीच तीव्र अंतरिक इच्छा! तुमचं चार ओळींचं का होईना पण स्व-हस्ताक्षरातील पत्र आलं तर मी स्वतः ला धन्य समजेन! आता बस करतो. एवढं लांबलचक पत्र वाचून खचितच कंटाळले असणार, त्यामुळे  हे मारुतीचं शेपूट आता आवरतं घेतो!

सौ. सुनिता-काकूंना सा..

पत्रोत्तर नक्की द्याल अशी अपेक्षा!


आपला कृपाभिलाषी,


प्रशांत