काही महिन्यापूर्वी
सोलापूरला जाण्याचा योग आला. हडपसरच्या आसपास विजेच्या प्रत्येक खांबावर
पोस्टर्स होते, एक शब्द खटकत होता, ‘प्रतिष्ठाण’! जवळपास पन्नास-एक पोस्टर्स पाहिली ...आणि मलाही वाटू लागलं, आपलंच चुकतंय बहुतेक! प्रतिष्ठाणच असेल J
मला वाटतं सुज्ञांना
नक्की कळलं असेल मी काय म्हणतोय ते. एखादी गोष्ट, चुकीची का असेना, जर सारखी कानावर आदळत राहिली तर कालांतराने आपल्याला ती बरोबर वाटू लागते. तेच होतंय सध्या. मी एक उदाहरण दिलं, अशा असंख्य चुका आजकाल
पदोपदी आढळतात. दुसरी एक वेगळीच तऱ्हा; वर्तमानपत्र उघडा, बातमी असते , “मंत्र्यांना क्लीन चीट दिली’ ! दुसरी बातमी असते, ‘कल्याणमध्ये कांटे की टक्कर’! कल्याण आहे हो मराठीचं! अहो, मराठी पेपर आहे, मराठी प्रती-शब्द वापरा नां! बरे ते तर पुण्यातलं अग्रणी वर्तमानपत्र, बाकीच्यांचं तर काही बोलूच नये. अशुध्दतेचा महापूर आणि इंग्रजी-हिंदीची सरमिसळ नुसती!!
टिव्हीवर आणखी कहर असतो. सध्या चालू असलेल्या मालिकेमधल्या मराठीचा हा एक नमुना बघा, नायक नायिकेला म्हणतो, “Relationship चा
base transparency हवा! ..
वावा!! फक्त विभक्ती प्रत्यय आणि क्रियापद मराठी, बाकी सगळं इंग्रजी! “अमृताते पैजा” जिंकू पाहणाऱ्या माझ्या मराठीची ही अवस्था!! अरे, काय चाललंय काय? मी काही अगदी सावरकरी मराठी (अग्नीरथपथ आगमनसूचक
हरितपट्टिका इ. इ! ) वापरा असं म्हणत नाही, पण जिथे शक्य आहे तिथे
योग्य मराठी शब्द वापरा नां! पत्ता विचारताना मी खुपदा असं काहीतरी ऐकतो, “थोडं पुढे गेलंकी एक शॉप भेटेल,तेथे लेफ्ट घ्या’. “भेटेल” काय?? (ती काय मोदी-उद्धवची भेट आहे :-?) दुकान दिसेल असं म्हणा ना! बरं, उकार पहिला की दुसरा, वेलांटी पहिली की दुसरी वगैरे लांबचं झालं, पण श आणि ष मधील फरक
आजच्या पिढीतील किती जणांना माहित आहे? भाषा दहा मैलावर बदलते, गावागावाचा बोलण्याचा हेल वेगळा असतो, हे सगळं मला मान्य आहे, पण काही ठिकाणी आपण तडजोड करता कामा नये. शब्द योग्य जागी, योग्य रीतीनेच वापरले गेले पाहिजेत.
आणि हो, मराठी कोणा एका शहराची (किंवा एखाद्या समूहाची) मक्तेदारी वगैरे नाही आणि
कधीच नव्हती! आणि असा वृथा आरोप कोणी केलाच तर त्या बापड्यास संत
तुकाराम, संत नामदेव, जनाबाई पासून ते बहिणाबाई, आणि भालचंद्र नेमाडे, शिवाजी सावंत, शिवाजीराव भोसले, आनंद यादव, शांता शेळके, महानोर, सरोजिनी बाबर, विश्वास पाटील, जगदीश खेबुडकर, सदानंद मोरे, प्रवीण दवणे, उत्तम कांबळे इ. शेकडो साहित्यिकांचं सकस आणि
सुंदर साहित्य बिलकुल माहिती नसावं!
जागतिकीकरणाच्या वाढत्या रेट्यामुळे नोकरी असो वा व्यवसाय, इंग्रजीचे उत्तम ज्ञान
गेल्या काही दशकापासून अनिवार्य झालंय, आणि ते सर्वांनी मिळवावच
या मताचा मी आहे. पण ते करताना मराठीची कास सुटू नये. (मावशी खूपच श्रीमंत असली तरी आपली आई आपल्याला प्राणप्रिय असतेच नां?) मातृभाषेकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी आपल्या पिढीने घेतली पाहिजे. आणि ते अवघड बिलकुल नाही. मराठी मित्रांशी बोलताना तरी शुद्ध मराठी बोला, मराठी-हिंदी-इंग्रजीची उगीच भाव मारायचा म्हणून
सरमिसळ करू नका, भाजीवाल्याशी/विक्रेत्यांशी/किराणा दुकानदाराशी मराठीमध्ये बोला (उगीच मोडकं-तोडकं हिंदी झाडू नका; त्यांना मराठी चांगलं कळत
असतंJ) , आपल्या मुलांशी शुद्ध मराठीमध्ये बोला, तुमच्या बोलण्यात वाक्प्रचार, म्हणींचा वापर करा, नकळत शिकवलेलं मुलांच्या
मनावर चांगलच ठसतं! वर्षाकाठी चार-पाच तरी मराठी पुस्तकं
विकत घ्या, दिसामाजी नाही, तर किमान महिनाकाठी
काहीतरी पांढऱ्यावर काळे (मराठीमध्ये J) करण्याची सवय बाळगा, मुलांना तुमचं लिहिलेलं वाचायला द्या, चांगली मराठी नाटकं/चित्रपट दाखवा, त्यांना बरोबर मराठीची गोडी लागेल! त्यांना पण मराठी लिहीण्याला उद्युक्त करा, त्यांना प्रोत्साहन द्या. तुमच्या स्मार्ट-फोनवर मराठी लिहिण्यासाठी मराठी कि-बोर्ड वापरा.
आणि हो, हे सगळं सुरु करायला मराठी-दिनाची अथवा नामदार फडणवीसांच्या किंवा
साहित्यमंडळाच्या एखाद्या सरकारी उपक्रमाची वाट कशाला पाहायची? शुभस्य शीघ्रम! पटतंय नां?? (आणि हो, मराठीमध्येच भाष्य करा हं या लेखावर J)
-
प्रशांत
No comments:
Post a Comment